OPINIONMAKER

Tuesday, April 8, 2008

आमचे हीरो


ही सर्व मुले सामान्य कुटुंबातून आलेली होती. माझ्या भावंडाचे शिक्षण होऊ देत, मला जर नीट सेटल होऊ देत मग भ्रष्टाचाराविरुद्ध लढू, असे त्यांना कधी वाटले नाही. मनात आणले असते तर त्याच यंत्रणेचा भाग होऊन त्यांना त्यांचा वाटा मिळत राहिला असता. त्यांनी वाट्याचा विचारही केला नाही. भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध आवाज उठवला. त्यासाठी प्राणाची किंमत मोजली. असा आवाज उठवणाऱ्यांना...
विशेष संरक्षण देण्यासाठी कायदा तातडीने कायदा करण्याची गरज आहे.




मंजुनाथ षण्मुगम, सत्येंद्रकुमार दुबे, चंद्रशेखर प्रसाद ही नावे आहेत भारताच्या दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांची. भ्रष्टाचाराच्याविरोधात बलिदान देण्याची तयारी असलेल्या आणि वेळ आल्यावर खच न खाता धैर्याने मरणाला सामोरे जाणाऱ्या तरुण पिढीचे हे प्रतिनिधी आहेत. तिघेही अत्यंत बुद्धीमान. मंजुनाथने म्हैसूरच्या श्री जयचामराजेंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. त्यानंतर त्याने लखनौच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेतून "एमबीए'ची पदवी घेतली होती. सत्येंद्र इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉनलॉजीचा (आयआयटी, कानपूर) विद्यार्थी. चंद्रशेखर प्रसाद हा सैनिक स्कूल आणि नंतर पाटणा विद्यापीठ व दिल्लीतील प्रसिद्ध जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा विद्यार्थी. मनात आणले असते तर तिघांनाही मळलेल्या वाटेवर रुळलेली नोकरी करुन बक्कळ पैसा मिळवता आला असता. गेला बाजार इथल्या भ्रष्ट यंत्रणेला शिव्या देत, आपल्या बुद्धीमत्तेची इथे कदर होत नसल्याची तक्रार करत अमेरिकेत जाऊन सर्व सुखांचा यथेच्छ उपभोग घेता आला असता. पण या तिघांचे इमान इथल्या मातीशी होते. त्यामुळेच भ्रष्ट यंत्रणेशी लढताना मरण पत्करावे लागले तरी हार मानण्याची त्यांची तयारी नव्हती. कोण होते हे तरुण. कुठुन त्यांच्यात ही धग निर्माण झाली. शहीद भगतसिंग, राजगुरु, चंद्रशेखर आझाद यांच्याप्रमाणे सर्वस्वाचा होम करण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली? खरे तर ही सर्व सामान्य कटुंबातून आलेली मुले. चंद्रशेखर प्रसादच्या विधवा आईने त्याला शिकवण्यासाठी अगदी पडेल ती कष्टाची कामे केली. तो त्या माऊलीचा एकुलता एक मुलगा होता. भ्रष्टाचाराच्याविरोधात लढणाऱ्या चंद्रशेखरची राष्ट्रीय जनता दलाचा सिवानमधील गुंड आणि खासदार शहाबुद्दीनच्या समर्थकांनी 31 मार्च 97 रोजी भरदिवसा हत्या केली. या घटनेला आता दहा वर्षे होतील. गुंडगिरी, खून, दरोड्याच्या वेगवेगळ्या प्रकरणात तुरुंगातून आतबाहेर करणाऱ्या शहाबुद्दीनला अद्याप शिक्षा झालेली नाही. 


गुप्त पत्राला पाय कसे फुटतात?
शांत, विनयशील आणि नम्र स्वभावाचा सत्येंद्र भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधातील धगधगता निखाराच होता. बिहारमधील शाहपूर नावाच्या छोट्या खेड्यात जन्मलेल्या सत्येंद्रने स्वतःच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर आयआयटीतून अभियंता होण्यापर्यंत मजल मारली. त्याला पाच बहिणी आणि दोन भाऊ. त्याचे वडील जवळच्याच साखर कारखान्यात लिपिक होते. मग स्थापत्य अभियंता म्हणून देशातील सुवर्णचौकोन महामार्ग या महत्वाकांक्षी प्रकल्पात बिहारमधील कोडेरमा येथे प्रकल्प अधिकारी म्हणून सर्वाधिकार मिळाल्यावर कटुंबाला सुखी(?) करण्यासाठी नेहमीच्या मार्गाने त्याला खोऱ्याने पैसा ओढता आला असता. पण त्याची बांधिलकी तत्त्वांशी होती. त्यामुळेच कंत्राटदार महामार्गाच्या कामातील उपकंत्राटे कोणताही अनुभव नसलेल्या स्थानिक माफियांच्या संस्थांना आणि पाठिराख्यांना देत असल्याचे लक्षात येताच सत्येंद्रने त्याविरुद्ध आवाज उठवला. कोणतेही तंत्राज्ञान, गुणवत्ता, दर्जा नसलेल्या या माफियांकडून जनतेच्या पैशाची कशी लूट होत आहे हे त्याने दाखवून दिले. त्यावर त्याला वेळोवेळी धमकावण्यातही आले. प्रकल्पातील भ्रष्टाचाराची माहिती त्याने त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना लेखी स्वरुपात कळवली. त्या पत्रावर त्याने स्वाक्षरी केली नव्हती तर विषयाचे गांभीर्य कळावे म्हणून स्वतःची माहिती वेगळ्या कागदावर लिहून जोडली होती. आपले नाव गुप्त ठेवण्यात यावे अशी विनंती त्याने केली होती. त्याची प्रत रस्ते वाहतूक मंत्रालयाला आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठवले. दुर्दैवाने पत्राला पाय फुटून ते माफियांपर्यंत पोचले आणि 27 नोव्हेंबर 2003 रोजी सत्येंद्रचा मृतदेह गया रेल्वेस्टेशनजवळ सापडला. 


याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सनत साह आणि मुकेंद्र पासवान यांची चौकशी केली. त्यानंतर 25 तासातच विषप्रयोग होऊन दोघांचा मृत्यू झाला. सत्येंद्रचा मारेकरी मंटुकुमार पोलिसांच्या हाती लागला होता; पण पोलिसांच्या ताब्यात असताना तो न्यायालयाच्या आवारातून पळाला. सध्या त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस आहे.ं


इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये विक्री अधिकारी असणाऱ्या मंजुनाथने तर पेट्रोलमध्ये रॉकेलची भेसळ करण्याचे गंभीर प्रकरण उजेडात आणले होते. भेसळ करणाऱ्या दोन पंपांना त्याने टाळे ठोकले होते. महिनाभराने पंपांचे कामकाज सुरु झाल्यावर त्याने अचानक छापा घातला. त्याचवेळी त्याचे अपहरण करण्यात आले आणि नंतर अमानुष मारहाण करुन शेवटी गोळ्या घालून त्याला ठार मारण्यात आले. या प्रकरणातील पेट्रोल पंपाचा मालक मोनू मित्तल याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली हीच काय ती समाधानाची बाब.पण सत्येंद्र आणि चंद्रशेखरचे काय? चंद्रशेखर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (मार्क्‍सवादी-लेनिनवादी) कार्यकर्ता. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा. त्यांचे मारेकरी अजून मोकाटच आहेत....तर दोष आपला असेलही सर्व मुले सामान्य कुटुंबातून आलेली होती. माझ्या भावंडाचे शिक्षण होऊ देत, मला जर नीट सेटल होऊ देत मग भ्रष्टाचाराविरुद्ध लढू, असे त्यांना कधी वाटले नाही. मनात आणले असते तर त्याच यंत्रणेचा भाग होऊन त्यांना त्यांचा वाटा मिळत राहिला असता. त्यांनी वाट्याचा विचारही केला नाही. भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध आवाज उठवला. त्यासाठी प्राणाची किंमत मोजली. असा आवाज उठवणाऱ्यांना विशेष संरक्षण देण्यासाठी कायदा तातडीने कायदा करण्याची गरज आहे. त्यापुढे जाऊन त्यांच्या जीवाचे बरेवाईट झाले तर विशेष तपास पथकांद्वारे तपास आणि खटले वेगाने चालवून दोषींना जरब बसेल अशी शिक्षा देण्याची तरतूद झाली पाहिजे. गुन्हेगार आणि भ्रष्टाचाऱ्यांना कायद्यांची आणि न्याययंत्रणेची भीती वाटत नाही हीच खरी शोकांतिका आहे. त्यात बदल झाला पाहिजे अन्यथा समाजासाठी, देशासाठी लढणाऱ्या आणखी सत्येंद्र आणि मंजुनाथना आपल्या प्राणाची किंमत मोजावी लागली तर तो दोष आपला असेल.

-----------

चॉईस तुमचा आहे...महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य मानले जात असल्यामुळे कदाचित एवढे भीषण प्रकार इथे घडत नाहीत, पण भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रसारमाध्यमांतून चव्हाट्यावर येतच असतात. भ्रष्टाचार, भेसळ करणारे समाजद्रोही सभ्यतेचा बुरखा पांघरून आपल्या आजूबाजूला फिरतच असतात. महामार्ग प्रकल्पातील भ्रष्टाचाराचे सोडा पुण्यातील रस्त्यांवर प्रत्येक पावसाळ्यात खड्डे का पडतात याचे उत्तर सगळ्यांना माहित असले तरी योग्य ती उपाययोजना होऊ शकत नाही. महत्त्वाचे म्हणजे भ्रष्ट मार्गाने घरात येणाऱ्या पैशाची दखल घरातील गृहिणीने घेतली पाहिजे. कारण कष्टाचे मोल कळले नाही आणि तुमच्या मुलांच्या हातात सहजपणे पैसा पडू लागला तर त्यांची पावले पबकडे किंवा रेव्ह पार्टीकडे वळणारच नाहीत, असे तुम्ही ठामपणे सांगू शकणार नाही. चॉईस तुमचा आहे!

-सुहास यादव

----------------------------------------------

1 comment:

Arvind Dorwat said...

The most welcome information, which is positive and motivating for struggle you have posted.

Hats off to these heroes.

Our education system, that includes teachers as well as contents is wrong. Increasing salary of teachers will not give results.

We need Anna Hazare, Baba Amte, Sane guruji, Netaji Subhash Chandra Bose, Mahatma Gandhi like personalities here. (Again)

They will change the picture. They will transform the whole system and refresh our blood.

This will definetly clean our vessels. A winning spirit will come alive.

Let us back our past president A.P.J. Abdul Kalaam. Follow his path. We will get success.

Thanks and regards
arvinddorwat (at) gmail .com