आपण श्रेष्ठ आहोत तर मग आपल्याला मान-सन्मान का मिळत नाही? मान राहू द्या, उलट संधी मिळेल तेव्हा टिंगलटवाळी आणि चेष्टा का केली जाते, असे प्रश्न इथल्या ब्राह्मणांना पडले आहेत. सामाजिक एकजिनसीपणाच्या दृष्टीने विचार केला तर इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आपले श्रेष्ठत्व कसे बाजूला ठेवायचे आणि इतर जातींना विश्वासात कसे घ्यायचे हा खरा प्रश्न आहे.
----
गेल्या काही वर्षांत ब्राह्मणांची संमेलने आवर्जून आयोजित करण्यात येत आहेत. त्यांना प्रतिसादही मिळतो आहे. जातींची संमेलने घेण्याला कुणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु, आपण सर्वश्रेष्ठ आहोत असे ब्राह्मण आपल्या प्रत्येक पिढीला सांगत आले आहेत. आजही हे ठामपणे सांगितले जाते. ज्ञान आणि बुद्धीमत्तेबाबत आपण इतरांपेक्षा श्रेष्ठच आहोत, अशी स्थिती असताना मग असे काय घडले आहे किंवा घडत आहे की संमेलने घ्यावी लागत आहेत आणि आपले प्रश्न, व्यथा मांडाव्यात, असे वाटू लागले आहे?