साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, ठिकाण, संयोजन, खर्च यावर वाद घालत बसण्यापेक्षा साहित्यिकांनी स्वतःला इथल्या समाजाशी, त्यांच्या प्रश्नांशी जोडून घेणे महत्त्वाचे आहे. तरच लोकांना साहित्यिकांबद्दल आत्मीयता वाटेल. संमेलनासाठी शासन आणि नेतेमंडळींकडून घाऊक स्वरुपात निधी मिळवणे सोपे आहे. त्याउलट लोकांनी संमेलनांसाठी उत्स्फूर्तपणे निधी द्यावा, यासाठी त्यांच्यात विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे। आपण शासनदरबारी की लोकांच्या दरबारात उभे राहायचे याचा निर्णय साहित्यिकांना घ्यावा लागेल.
------
दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून जोरदार रस्सीखेच आणि वाद होतात। साहित्यावर प्रेम करणाऱ्या सामान्य वाचकांना यात फारसा रस नसतो। अध्यक्ष कोण झाला यावरून वाचकाच्या अभिरूचीमध्ये काहीही फरक पडत नाही। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही साहित्य संमेलन असले तरी मराठी माणूस तुडुंब गर्दी करतो।