OPINIONMAKER

Saturday, July 16, 2016

लखोट्याचे राजकारणकोल्हापुरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्याची भारतीय जनता पक्षाची चाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सगळ्यात जास्त घायाळ करून गेल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट झाले. त्याचबरोबर ही नियुक्ती सेवकाने लखोटा पोचवण्यापुरती मर्यादित नसून त्यामागे कवेत न येणाऱ्या मोठ्या वर्गाला व्यवस्थितपणे समरसतेच्या पंखाखाली घेण्याच्या दीर्घकालिन मांडणीतील हा एक छोटासा प्रयत्न आहे ही बाबही अधोरेखित झाली.
या नियुक्तीने अस्वस्थ झालेल्या पवारांनी अतिशय मार्मिक टिप्पणी केली. पूर्वी छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करायचे आणि पेशवे पुढे फडणविस नेमायचे असा इतिहासातील दाखला पवारांनी दिला. हा दाखला मर्मावर बोट ठेवणारा होता हे मुख्यमंत्र्यांच्या नंतरच्या प्रतिक्रियेवरून दिसून आले. त्यांनी घाईघाईने आपण छत्रपतींचा सेवक असल्याचे आणि केवळ लखोटा पोचवण्याचे काम केल्याचे सांगून टाकले.

`ऐवजी नियुक्ती
मुळात संभाजीराजेंची नियुक्ती होण्यापूर्वी त्या जागेवर अखिल विश्व गायत्री परिवाराचे (एडब्लूजीपी) प्रमुख डॉ. प्रणव पंड्या यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आपल्या हातून काही चांगले घडेल असे वरच्या सभागृहातील वातावरण नसल्याचे सांगून डॉक्टरांनी या नियुक्तीला नम्रपणे नकार दिला. डॉ. पंड्या हे अध्यात्मिक क्षेत्रातील अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व आहे. आधुनिक काळात सामान्य माणसालाही `वसुधैव कुटुंबकम हे तत्वज्ञान अंगी बाणता येऊ शकते यासाठी गायत्री परिवार गेली अनेक वर्षे कार्यरत असून त्यांचे मुख्यालय हरिद्वार येथे आहे. खरे म्हणजे संबंधित व्यक्तीची संमती घेऊनच राज्यसभेवरील नियुक्ती जाहीर केली जात असते. तरी देखील डॉ. पंड्या यांनी नाव जाहीर झाल्यावर नकार दिला. त्यानंतर नव्या नावाचा शोध सुरु झाला. संसदेत भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या भगव्या कपड्यातील मोजक्या वाचाळांनीच प्रसिद्धीचा झोत स्वतःवर घेतला आहे. त्या तुलनेत डॉ. पंड्या हे खरोखरच धर्माचारणाला व्यावहारिक पातळीवर प्राधान्य देणारे, अतिशय सभ्य, निरलस, संतुलित असे व्यक्तिमत्व आहे. निरर्थक आणि तर्कहीन विधाने करणाऱ्या साध्वी आणि साधूंपेक्षा समाजाला, संसदेला आणि भाजपलाही डॉ. पंड्या यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांची गरज आहे. पण ते साध्य न झाल्याने भाजपने नव्या चेहऱ्याचा शोध सुरु केला आणि तो कोल्हापुरात येऊन थांबला. छत्रपती संभाजीराजेंचे व्यक्तिमत्व खरोखरच सभ्य, संतुलित, विचारी आणि सामाजिक जाणीवा असणारे असे आहे. त्यामुळेच थेट निवडणुकीच्या राजकारणात पैसा, बळ आणि सगळ्या भ्रष्ट मार्गांचा अवलंब करणाऱ्यांपुढे त्यांना यश येऊ शकले नाही. संभाजीराजांना जेव्हा पवारांनी लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तिकीट दिले होते तेव्हा छत्रपतींच्या पराभवासाठी जंगजंग पछाडणाऱ्या धनदांडग्यांचे सगेसोयरे आता भाजपमध्ये येऊन शुद्ध झाले आणि त्यांनी सुभेदाऱ्याही मिळवल्या. त्यामुळे आम्हीच फक्त शुद्ध आणि स्वच्छ आहोत या नौंटंकीला फारसा अर्थ नाही.

स्वाभाविक दुर्गंधी आणि कृत्रिम सुगंध
गेली पाच-सहा वर्षे छत्रपती संभाजीराजे हे सातत्याने संभाजी ब्रिगेडच्या संपर्कात होते. संघटनेच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन स्पष्टपणे त्यांची मते मांडत होते. संभाजी ब्रिगेडविषयीची भाजप-संघ परिवाराची मते सर्वश्रुत आहेत. कुप्रसिद्ध जेम्स लेन प्रकरणी संभाजी ब्रिगेडने नेमके प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना अनुल्लेखाने मारता येऊ शकते. पण, त्या प्रकरणातून उघड झालेली अन्य जातींना कमी लेखण्याची चातुर्वर्ण्यीय मानसिकता कशी संपवणार? राजकारणाच्या परिघाबाहेर असलेल्या सुशिक्षित आणि नोकरी-व्यवसाय करणाऱ्या मोठ्या वर्गाला याची व्यवस्थित जाणीव झाली आहे. जातीश्रेष्ठतेच्या दुर्गंधीवर हिंदूऐक्याच्या कथित सुगंधाचा स्प्रे फवारत राहिल्याने तयार होणारा कृत्रिम सुगंध तात्पुरता ठरतो. त्यामुळेच छत्रपती संभाजीराजांसारख्या तजेलदार आणि सुगंधी व्यक्तिमत्वाची मदत घेण्याची चाल खेळावी लागते. हे सगळे कोठून येते आणि कसे घडते याची छत्रपती संभाजीराजांना जाणीव नसणार असे म्हणण्याचे धाडस कुणीच करू शकणार नाही.

तुमचा तो जातीवाद, आमची ती समरसता
राष्ट्रीय विचारांचा पक्ष म्हणून भाजप स्वतःचा कितीही गवगवा करत असला तरी कुठल्याही राजकीय पक्षाला शेवटी निवडणुका जिंकायच्या असतात. त्यासाठी राष्ट्रीय विचारांची नव्हे तर जातीय विचारांची गणिते मांडावी लागतात आणि सर्वच पक्षांप्रमाणे भाजपही वेळोवेळी जातीची गणिते मांडूनच निवडणुकीतील जय-पराजयाचा हिशेब मांडत असतो. अपवाद फक्त शिवसेनेचा. शिवसेनेत कधीच जातीच्या निकषांवर उमेदवारी किंवा पदे दिल्याचे अजून तरी पाहायला मिळत नाही. स्वतःभोवती कथित राष्ट्रवादाची भक्कम तटबंदी उभी करायाची, त्या दिशेने कुणी चुकून पाहिले तरी त्याला देशद्रोही ठरवायचे आणि मग स्वतः खुशाल जातीची समीकरणे मांडत जातवादी नेत्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा वापर करून घ्यायचा अशी चाल भाजपने राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी खेळली आणि ती यशस्वी करून दाखवली. ते करत असताना आणि आजही पवारांवर जातवादी असल्याची टीका करून आपले सगळे झाकता येते असा समज भाजपमधील चाणक्यांचा झाला आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला जोरदार हवा देण्याचे काम भाजपच्या नेत्यांनी केले. धनगर समाजाला आदिवासीमध्ये म्हणजेच अनुसूचित जमातींमध्ये मोजता येणार नाही हे पुरेपूर माहित असूनही आगीशी खेळण्याचे साहस भाजपने केले. धनगर समाजाच्या मागणीसंर्दभात त्यावेळचे आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड जी भूमिका मांडत होते तीच भूमिका आज भाजपच्या मंत्रिमंडळातील आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा मांडत आहेत. मग पिचड धनगर विरोधी आणि सावरा समरसतावादी हे कसे काय? त्यावेळी प्रदेशाध्यक्ष असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात भाजप सत्तेवर आल्यास शंभर दिवसात धनगर समाजाची मागणी पूर्ण करण्याची गर्जना केली होती. एवढ्यावर भागणार नाही असे वाटल्यामुळे धनगर समाजाच्या मागणीला पवारांचाच पर्यायाने मराठ्यांचा विरोध आहे असे चित्र निर्माण करण्यात आले. धनगर आणि आदिवासींमध्ये अविश्वासाचे वातवरण तयार झाले. शंभर दिवस नव्हे आता दोन वर्षे होतील तरी आयोग आणि अहवालाचे काम नेमके कुठे अडले आहे आणि धनगर समाजाची मागणी कधी पूर्ण होणार याची कुणालाच कल्पना नाही. आता तर या सगळ्याच्या अभ्यासाचे काम टाटा समाजविज्ञान संस्थेकडे देण्यात आल्याचे भाजपचे नवनियुक्त खासदार डॉ. विकास महात्मे यांनी सांगून टाकले आहे. एकूणच  घटनेच्या चौकटीत मराठा समाजाला अन्य मागासवर्गातील आरक्षण देता येणार नाही हे पक्के माहित असूनही कॉंग्रेसप्रमाणेच केवळ सत्तेसाठी भाजपने मराठा आरक्षणाच्या मागणीलाही निवडणुकीपुरते खतपाणी घातले.  धनगरांच्या मागणीचेही तसेच होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपचे हे सगळे वागणे व्यापक समाजाहितासाठी आणि हिंदूऐक्यासाठीच होते का?

सरसंघचालकांचे चिंतन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक अधूनमधून आरक्षणावर निवेदन-चिंतन करत असतात. देशासमोरील, समाजासमोरील प्रश्नांविषयी भाष्य करत असतात. राजकारणविरहीत संघटनेचे प्रमुख म्हणून विविध राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना मार्गदर्शन करत असतात. मग भाजपसारख्या घरच्याच पक्षाचे नेते आरक्षणाच्या आगीशी खेळ करत होते तेव्हा व्यापक समाजहित म्हणून सरसंघचालकांनी भाजपच्या नेत्यांचे कान धरणे आवश्यक होते. काय सांगावे, कदाचित सरसंघचालकांनी सांगितले देखील असेल पण, सत्तासुंदरीच्या प्राप्तीसाठी निवडणुकीच्या बोहल्यावर चढलेली कालची पोरं त्यावेळी त्यांचे ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हती असे मानायला वाव आहे. असे असले तरी त्यामुळे संघाच्या समरस समाज निर्मितीच्या कार्याची दोन पावले पुढे आणि शंभर पावले मागे अशी स्थिती होते हे नक्की.
शेवटी संत तुकाराम सांगून गेले आहेत, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांप्रमाणेच राजघराण्यालाही हे लागू पडते.

-सुहास यादव
No comments: