
सध्याच्या स्थितीत महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या राजकारणात एखादा ब्राह्मण किती आत्मविश्वासाने वावरु शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी. पुण्यातील कॉंग्रेसमध्ये प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष पक्षांतर्गत संघर्ष केला. सर्वच कॉंग्रेसजनांमध्ये श्रद्धा आणि सबुरीचा जो महत्त्वपूर्ण गुण असतो तो त्यांच्यातही मुरलेला आहे. त्यामुळे हार-जीत त्यांच्याही वाट्याला आली तरीही ते पुन्हा उसळून उभे राहिले. अगदी पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर पुणे विकास आघाडी स्थापन करुन त्यांनी महापालिकेतील सत्ता ताब्यात ठेवली. लोकसभेची निवडणूक लढवली. त्यासाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या वळचणीला गेले. पराभव पत्करला. पण कधीच कायमची हार मानली नाही. मोठी स्वप्ने पाहायची आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यायची ही त्यांची कार्यपद्धती आहे. पुण्यात 1994 मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा असोत किंवा नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडास्पर्धा. डोळे दिपवून टाकणारे भव्यदिव्य कार्यक्रम घडवून आणणे ही त्यांची खासियत.