OPINIONMAKER

Friday, April 18, 2008

नेत्यांचे प्रेम


एकीकडे स्त्री-पुरुष संबंधांमधील खुलेपणा आणि त्यामुळे निर्माण होणारे कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्‍न पाश्‍चात्य देशांना सतावत आहेत, तर दुसरीकडे स्त्री-पुरुष संबंधांना नैतिक-अनैतिकतेचे पांघरूण घातल्यामुळे आपल्या देशातही अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत. आपल्याकडे त्याचा सर्वाधिक त्रास स्त्रियांना होतो. कारण सुसंस्कृतपणा, नैतिकता, नियम पाळण्याची जबाबदारी स्त्रियांवर टाकून
आपला समाज मोकळा झाला आहे.


रशियाचे मावळते अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी त्यांच्या 50 वर्षांच्या पत्नीला दोन महिन्यांपूर्वी गुप्तपणे घटस्फोट देऊन 24 वर्षांची मॉडेल आणि ऑलिंपिकमध्ये एकेकाळी सुवर्णपदकांची लयलूट करणारी जिम्नॅस्ट ऍलिना कॅबिवा हिच्याशी लग्न करण्याचा घाट घातला असल्याच्या बातम्या आल्या आणि दुसऱ्याच दिवशी त्यासंदर्भातील इन्काराच्या बातम्याही आल्या। त्यात ही बातमी प्रसिद्ध करणाऱ्या मॉस्कोवस्की कॉरस्पॉन्डन्ट या वृत्तपत्राच्या संपादकाचाही बळी गेला अर्थात पाश्‍चात्य देशांमध्ये अशा प्रकारच्या घटनांची चर्चा होत असली, तरी फारशी खळबळ उडल्याचे कधीच दिसत नाही. दुसऱ्याच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा आगाऊपणा करण्याची वृत्ती किंवा आवड त्यांच्याकडे नसते. तरीही आता प्रसारमाध्यमांमधील तीव्र स्पर्धेमुळे वर्तमानपत्रे आणि इंटरनेटवर अशा बातम्या धुमाकूळ घालू लागल्या आहेत
रशियाची गुप्तहेर संस्था "केजीबी'मध्ये 15 वर्षे काम करीत लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत पोचलेले पुतिन 1998मध्ये याच संस्थेचे प्रमुख झाले तेव्हा तिचे नाव होते फेडरल सिक्‍युरिटी सर्व्हिस (एफएसबी). गुप्तहेर संस्थेत काम केलेल्या पुतिन यांचा चेहरा नेहमीच करारी दिसतो. मार्शल आर्टची आवड असलेला हा नेता रोजच्या धावपळीतही तंदुरुस्ती टिकवून आहे. अशा या नेत्याला रशियाच्या संसदेत गेल्याच वर्षी निवडून आलेल्या ऍलिनाने भुरळ पाडली. रिदमिक जिम्नॅस्टिक प्रकारातील सम्राज्ञी समजल्या जाणाऱ्या ऍलिनाने 2000ला झालेल्या सिडनी ऑलिंपिकमध्ये ब्रॉंझपदक, तर 2004 मध्ये अथेन्स येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. अन्यही अनेक आंतरराष्ट्रीय आणि जागतिक स्पर्धांमध्ये तिने पदकांची लयलूट केली आहे. 2005मध्ये निवृत्ती स्वीकारल्यानंतर लगेचच, 125 सदस्यांचा समावेश असलेल्या "पब्लिक चेंबर ऑफ रशिया'मध्ये सदस्य म्हणून काम करण्याची संधी तिला मिळाली. रशियातील संसदेचे कामकाज, अन्य सरकारी संस्थांचे कामकाज, घटनात्मक संस्थांच्या कामाचे नियमन करण्याचा अधिकार पब्लिक चेंबर ऑफ रशियाला असतो. 2001मध्ये तिने "रेड शॅडो' या जपानी चित्रपटात काम करताना स्वतःचे जिम्नॅस्टिकमधील कौशल्य दाखवले आहे. 2007मध्ये ती रशियाच्या संसदेत निवडून आली आणि पुतिन यांच्याशी असलेली तिची जवळीक वाढली, असेही या दैनिकाने बातमीत म्हटले होते। अर्थात ह्या सर्व बातम्या चुकीच्या असल्याचे नंतर जगासमोर आणण्यात आले.
निकोल सारकोजी- कार्ला ब्रुनी
फ्रान्सचे अध्यक्ष निकोल सारकोजी यांनी काही महिन्यांपूर्वीच निवडून आल्यावर लगेचच पत्नीला घटस्फोट देऊन इटालियन मॉडेल कार्ला ब्रुनीशी विवाह केला. या विवाहापूर्वी सारकोजी भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर तेव्हा मैत्रीण म्हणून वावरणारी कार्ला आली तर राजशिष्टाचारानुसार तिचे स्वागत कसे करायचे, असा प्रश्‍न दिल्लीत राजशिष्टाचार खात्याला पडला होता. अर्थात ती त्यावेळी भारतात आलीच नाही आणि तिच्या स्वागताचा प्रश्‍न आपोआप सुटला. विवाहानंतर गेल्या महिन्यात अध्यक्षांची पत्नी म्हणून ती अधिकृतपणे ब्रिटनच्या दौऱ्यावर गेली. त्यावेळी तिथला तिचा प्रभावी वावर, राणी एलिझाबेथ आणि पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांच्याबरोबरील भेटीच्यावेळी शिष्टाचार पाळण्याबाबत तिने घेतलेली काळजी, भेटीच्यावेळी घालण्याचा पोशाख निवडण्यातील तिचा चोखंदळपणा यांमुळे या दौऱ्यात तिला मोठी सकारात्मक प्रसिद्धी मिळाली. या पंधरवड्यात तर फ्रान्समधील अनेक मासिकांच्या मुखपृष्ठावर तिची छबी झळकली आहे. तिची तुलना युवराज्ञी डायनाशी करण्यापर्यंत अनेक मासिकांची मजल गेली आहे।
तुझ्याशीच लग्न
इटलीचे सध्याचे नियोजित पंतप्रधान सिल्व्हियो बर्लसोनी यांनी तर जानेवारी 2007मध्ये दोन देखण्या मॉडेलशी सार्वजनिक ठिकाणी केलेल्या प्रेमाच्या संभाषणामुळे मोठीच खळबळ उडाली होती. "मी विवाहित नसतो तर आता लगेच मी तुझ्याशीच लग्न केले असते,' असे ते मारा कारफॅग्ना हिला म्हटले होते, तर आयदा येस्पिका हिच्याबरोबर कुठेही जाण्याची भाषा त्यांनी जाहीरपणे केले होती. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांच्यामागे इटलीचे माजी पंतप्रधान असे बिरुद होते. यावर त्यांची पत्नी व्हेरोनिका लॅरियो यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेऊन सिल्व्हियो यांनी माफी मागावी असे खुले पत्र लिहिले. पतीच्या वर्तनामुळे आपल्या सन्मानाला धक्का लागला आहे, असे त्यांचे म्हणणे होते. अखेरीस सिल्व्हियो यांनी नमती भूमिका घेऊन माफी मागितली.अर्जेंटिनाचे माजी अध्यक्ष कार्लोस मेनेम तर त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेल्या सेसिला कॅरोलिना या माजी "मिस युनिव्हर्स'च्या प्रेमात पडले. सेसिला त्यावेळी दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी काम करत होती. 2001मध्ये त्यांचे लग्न झाले आणि एप्रिल 2007मध्ये ते संपुष्टातही आले।"
"मिस पाकिस्तान' किताब मिळवणाऱ्या महलिज सरकारी हिने अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याशी डेटिंग करणे आपल्याला आवडेल असे सांगून मुशर्रफ यांच्या वेगळ्या क्षेत्रातील लोकप्रियतेची झलक जगाला दाखवून दिली आहे. मात्र, आपल्या उपखंडात आणि विशेषतः भारतातील राजकारणात नेत्यांच्या अशा संबंधांबाबत फक्त खासगीत चर्चा होते. अपवाद जवाहरलाल नेहरू आणि एडविना यांच्या हळुवार, भावनिक संबंधांचा. अन्यथा सत्तेशी असलेल्या जवळीकीतून मिळणाऱ्या सुरक्षिततेमुळे नेत्यांच्या पत्नीही पतीच्या अशा संबंधांबाबत चर्चा करत नाहीत किंवा त्यांना आव्हान देण्याचा विचारही करत नाहीत. उलट उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादव यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या अमरमणी त्रिपाठी या मंत्र्याने त्याची मैत्रीण आणि कवयित्री मधुमिता शुक्‍ल गर्भवती राहिल्यानंतर तिचा खून केल्यावरही अमरमणीच्या पत्नीने त्याची न्यायालयात पाठराखणच केली. एकीकडे स्त्री-पुरुष संबंधांमधील खुलेपणा आणि त्यामुळे निर्माण होणारे कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्‍न पाश्‍चात्य देशांना सतावत आहेत, तर दुसरीकडे स्त्री-पुरुष संबंधांना नैतिक-अनैतिकतेचे पांघरूण घातल्यामुळे आपल्या देशातही अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत. आपल्याकडे त्याचा सर्वाधिक त्रास स्त्रियांना होतो. कारण सुसंस्कृतपणा, नैतिकता, नियम पाळण्याची जबाबदारी स्त्रियांवर टाकून आपला समाज मोकळा झाला आहे.
 

- सुहास यादव

1 comment:

Arvind Dorwat said...

Dear friends,
Don't be so amazed and involved in affairs. If you can't make one successful, do not disturb others.
-Arvind D.