OPINIONMAKER

Tuesday, June 14, 2016

चमच्यांची गर्दी

आधुनिक काळात विविध सरकारी कार्यालयांमध्ये किंवा अगदी खासगी क्षेत्रातही खुशमस्करे वेगवेगळ्या नावांनी वावरत असतात. 'चमचे' हा त्यातीलच एक प्रकार. निर्ढावलेल्या खुशमस्कर्‍यांना अधिक टोचून बोलण्यासाठी हा शब्दप्रयोग वापरात आला असावा. आता तर या शब्दाचा नेमका अर्थ, त्यातील अशिष्टपणा हे जाणून घेण्याच्या भानगडीत न पडता स्वत:ला कुणाचा तरी 'चमचा' म्हणून घेण्याची स्पर्धाच लागली आहे. 

मानवाच्या उत्क्रांतीमध्ये टोळीशाही, सरंजामशाही, राजेशाही, हुकूमशाही किंवा लोकशाही अशी कुठलीही व्यवस्था असली तरी चमच्यांचे अस्तित्व कायम राहिले आहे. व्यवस्थेच्या प्रमुखाच्या स्वभावानुसार त्यांचे प्रमाण आणि प्रकटीकरण कमी जास्त होत असते एवढेच. अगदी आदिम काळापासून स्वत:ला असुरक्षित मानणारा मोठा वर्ग समाजात वावरत आला आहे. आपले अवगुण, अकार्यक्षमता, गैरवर्तन झाकण्यासाठी किंवा आपल्या पात्रतेपेक्षा अधिक काही मिळवण्यासाठी हा वर्ग कायम हुजरेगिरी करत असतो. त्यांना भाट किंवा खुशमस्करे असेही म्हटले जाते. अस्तित्वात नसलेल्या गोष्टी असल्याचे भासवणे किंवा खोटी स्तुती करणे, खोट्या कहाण्या खर्‍या म्हणून सांगणे हे काम ही मंडळी अगदी बेमालूमपणे करतात. त्यामुळेच राजेशाहीत अनेक राजे-महाराजे या कामासाठी अधिकृत भाट नेमत असत. कदाचित राजांनाही असुरक्षित वाटत असावे आणि आपली प्रजा सुखी-समाधानी आहे, असा समज करून घेण्यासाठी किंवा लोकांना पसंत नसलेला पण आपल्याला हवा तो निर्णय घेण्यासाठी वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने असे खुशमस्करे पदरी बाळगणे सोयीचे ठरत असावे. आधुनिक काळात विविध सरकारी कार्यालयांमध्ये किंवा अगदी खासगी क्षेत्रातही असे खुशमस्करे वेगवेगळ्या नावांनी वावरत असतात. हे सगळे झाले खुशमस्कर्‍यांचे शिष्टसंमत वर्णन पण त्यांच्या वागण्याचा अतिरेक झाला की, त्यांचे वर्णन करण्यास शिष्टसंमत शब्द अपुरे पडू लागतात. त्यामुळे आपोआपच लोकभाषेतून अधिक धारदार आणि टोचणारे शब्दप्रयोग पुढे येतात. अशा शब्दांच्या वापरातून जनमानसातील राग, संताप व्यक्त होत असतो. 'चमचेगिरी' हा त्यापैकीच एक अशिष्ट शब्दप्रयोग. या शब्दाची ग्रामीण भागातील व्युत्पत्ती तर अश्लिलतेकडे जाणारी आहे. कदाचित त्यामुळेच निर्ढावलेल्या खुशमस्कर्‍यांना अधिक टोचून बोलण्यासाठी 'चमचेगिरी' हा शब्दप्रयोग वापरात आला असावा. आता तर या शब्दाचा नेमका अर्थ, त्यातील अशिष्टपणा हे जाणून घेण्याच्या भानगडीत न पडता स्वत:ला कुणाचा तरी 'चमचा' म्हणून घेण्याची स्पर्धाच लागली आहे. 

निष्ठा आणि चमचेगिरीतील फरक

सर्वसामान्य नागरिक अतिशय असुरक्षित आणि अनिश्‍चित आयुष्य जगत असतो. रोजच्या जगण्याच्या रहाटगाडग्यात सापेक्ष-निरपेक्ष विचार करायला त्याच्याकडे फार वेळ नसतो. कुठे तरी, कशाचा तरी आधार वाटावा, सुरक्षिततेचा भास व्हावा म्हणून तो जमेल तशी आणि झेपेल तशी कुणाची तरी खुशमस्करी करत जगत असतो. मानवी स्वभावातील आणि वागण्यातील गुंतागुंत लक्षात घेता सामान्य माणसाचे जगणे अपेक्षित असेच असते. पण स्वत:ला सृजनशील, निर्मितीकार, सौंदर्यवादी दिशादर्शनाचे अग्रणी म्हणवून घेणारे चमच्यांच्या यादीत आपला समावेश व्हावा म्हणून धडपडू लागतात तेव्हा समाजातील या वर्गाची घसरण नेमकी कोणत्या कारणाने होऊ लागली आहे हे तपासण्याची गरज भासू लागते. विशिष्ट तत्त्वज्ञानावर निष्ठा असणे, ती जाहीरपणे व्यक्त करणे वेगळे आणि निष्ठा व्यक्त करण्याच्या शर्यतीत धावण्यापोटी स्वत:ला 'चमचा' म्हणून घोषित करणे वेगळे. आपल्या देशातील राजेशाही गेली, लोकशाही आली, संस्थाने खालसा झाली म्हणून खुशमस्कर्‍यांची संख्या कमी झालेली नाही. लोकशाही मार्गाने निवडून आलेले नेते राजासारखे वागू लागले की त्यांच्या अवतीभवती खुशमस्कर्‍यांची गर्दी होणे स्वाभाविक असते. काँग्रेसच्या राजवटीत असे खुशमस्करे पावलोपावली दिसायचे. त्यातूनच काँग्रेसमध्ये दरबारी राजकारणाचा उदय झाला आणि त्या दरबारी राजकारणानेच काँग्रेस रसातळाला पोचली.

खुशमस्कर्‍यांची गरज?

आता अभिनेते अनुपम खेर यांच्यापाठोपाठ सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहालनी यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चमचा असल्याचे आणि त्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे जाहीरपणे सांगितले. उतावीळ सर्मथक नेतृत्वाला कशा पद्धतीने अडचणीत आणू शकतात याचे हे ठळक उदाहरण आहे. अर्थात केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लगेचच निहलानी प्रकरण झटकून टाकले. अशा चमच्यांची मोदींना गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्र्यांचे हे विधान अगदी शंभर टक्के खरे असले तरी त्याला दुसरीही बाजू आहे. सगळ्याच राज्यकर्त्यांना खुशमस्कर्‍या प्रचारकांची गरज असते. खुशमस्कर्‍यांनी विशिष्ट पद्धतीत काम करावे एवढीच त्यांची अपेक्षा असते. खेर आणि निहलानी यांनी ही शिस्त मोडली असल्याने योग्य वेळी त्यांना त्यांची जागा दाखवून देणारी यंत्रणा आणि कार्यपद्धती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विशेषत: भाजपाकडे आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य असणार्‍या विषयाची स्वत:च्या दृष्टीने तर्कसंगत मांडणी करण्याचा प्रय▪अनुपम खेर करत होते. त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आणि त्या सापळ्यात ते अलगद अडकले. एका क्षणी आवेगाच्या भरात त्यांनी स्वत:ला चमचा म्हणवून घेतले आणि त्यानंतर त्यांच्यावर भूमिगत होण्याची वेळ आली.

राजापेक्षा राजनिष्ठ

पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि राज्यातील तरुणांच्या व्यसनाधीनतेची आणि अमली पदार्थांच्या सेवनाची चर्चा गेली तीन-चार वर्षे चालू आहे. स्वत: पंतप्रधानांनी 'मन की बात'मध्ये या विषयावर भाषण दिले आहे. आता त्या विषयावरील चर्चा होऊ नये आणि चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमातून तर अजिबातच होऊ नये, असे तेथे सत्तेत असणार्‍या अकाली दल भाजपा युतीला वाटणे स्वाभाविक आहे. हे सगळे राजकीय ओझे पहलाज निहलानींनी स्वत:च्या खांद्यावर घेण्याची गरज नव्हती. उतावळेपणा आणि राजापेक्षा राजनिष्ठ असल्याचे दाखवण्याच्या नादात त्यांनी ती चूक केली.

आततायीपणा आणि फजिती

मुळात आपले सगळे ते श्रेष्ठ असा प्रचार करताना आपल्यातील दुर्गुण, चुकीच्या प्रथा-परंपरा यांच्याविषयी सोयीस्कर मौन बाळगायचे आणि त्याविरोधात कुणी काही बोलले तर त्या व्यक्ती, संस्थेवर देशद्रोही, धर्मद्रोही असे शिक्के मारून बदनाम करायचे ही संस्कृती रक्षकांची हजारो वर्षांपासूनची कार्यपद्धती आहे. आपल्यामध्ये काही समस्या आहेत हे मान्य करायला मोठे धारिष्ट्य लागते. ते असले की मग, अमूक चित्रपट बंद पाडा, तमुक पुस्तक वाचू नका, तमक्या कलाकारावर बहिष्कार घाला असे उद्योग करावे लागत नाहीत. त्यातच आता सोशल मीडियाचा प्रभाव इतका वाढला आहे की, काहीही बंद पाडायचे किंवा कशावरही बहिष्कार घालायचे ठरवले तरी ते साहित्य, कलाकृती, विचार लोकांपर्यंत पोचायला वेळ लागत नाही. उलट एखाद्या कलाकृतीला आणि त्यातही चित्रपटासारख्या माध्यमाला विरोध केला तर त्यातून मांडलेला विचार लोकांपर्यंत आणखी वेगाने पोचतो. त्यामुळेच केवळ सेन्सॉर बोर्डच नव्हे तर राजकीय खुशमस्कर्‍यांनादेखील महत्त्व उरलेले नाही. खुशमस्करी करण्याच्या नादात स्वत:चा वैयक्तिक अजेंडा पुढे रेटणार्‍या सुब्रमण्यम स्वामींची रघुराम राजन प्रकरणात कशी फजिती झाली हे सगळ्यांनीच पाहिले आहे. केवळ फजितीच झाली नाही तर त्यांच्या विश्‍वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आता सोशल मीडियामुळे लोकांवर खर्‍या-खोट्या माहितीचा मारा होत असतो. त्यातून निरक्षीर विवेकबुद्धीने योग्य ते जाणून घेण्याची क्षमता सर्वसामान्यांमध्ये हळूहळू विकसित होऊ लागली आहे. भारतीय समाज आणि आपली लोकशाही व्यवस्था कायम प्रगल्भतेकडे वाटचाल करत आहे. त्याचा वेग कदाचित कमी असेल पण चित्र नक्कीच आशादायी आहे. त्यामुळे चमच्यांनी कितीही गर्दी केली तरी लोकांना पुन्हा पुन्हा फसवणे शक्य होणार नाही.

-सुहास यादव

No comments: