OPINIONMAKER

Wednesday, January 14, 2009

लेखणीचे सामर्थ्य!


एखाद्या गुंडाला पक्षात प्रवेश दिल्यानंतर पत्रकारांनी त्यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या बातम्या व लेख यामुळे तीनच दिवसात त्याने पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे पक्षाच्या नेत्यांना सांगावे लागले. जोखिम स्वीकारुन पत्रकारांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले। त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे। यापुढील काळात अशा घटनांबाबत समाजानेही याबाबत रस्त्यावर येऊन प्रतिक्रिया नोंदवली पाहिजे. तरच अशा प्रवत्तींना रोखता येईल.





पुण्यातील कुख्यात गुंड बाबा बोडके याने अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याचे पत्रक आणि त्याचे राजीनामापत्र पक्षाचे ज्येष्ठ नेते व पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी मंगळवारी प्रसिद्धीस दिले. पत्रकारांना काम करताना अनेक प्रकारच्या दबावाला तोंड द्यावे लागत असते. इथे तर थेट एका गुंडाचा जाहीरपणे वाजतगाजत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश झाला होता. बरे तेही राज्याच्या राजकारणात प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे जलसंपदा मंत्री आणि पुणे शहर व जिल्ह्यातील आम जनतेचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत! त्वरित निर्णय, प्रशासनावर अंकुश, राज्यातील विविध प्रश्‍नांचा आणि विषयांचा अभ्यास आणि उगीच कुणालाही थारा न देणारे नेतृत्व म्हणून दादांची ओळख आहे. त्यांच्या कडक स्वभावामुळे पक्षातील कार्यकर्तेच नव्हे, तर नेतेही त्यांना वचकून असतात, तर अशा व्यक्तीच्या आशीवार्दाने एका गुंडाचा राजकीय पक्षात जाहीरपणे प्रवेश व्हावा ही पुणेकरांच्या दृष्टीने धक्कादायक बाब होती। अर्थात, हे सर्व जाहीरपणे कुणी बोलून दाखवायचे हे अवघड जागीचे दुखणे होते.



शनिवारी झालेल्या या कार्यक्रमाचे फ्लेक्‍स शहरात लागले होते; पण त्यावर असा कार्यक्रम होणार आहे याची माहिती नव्हती. अर्थात, पत्रकारांना याची कुणकूण लागलीच होती. त्यामुळेच कार्यक्रम झाल्यानंतर पुण्यातील "सकाळ', लोकमत, पुढारी, डीएनए आदी वर्तमानपत्रांनी कोणताही मुलाहिजा न ठेवता या कार्यक्रमाच्या बातम्या दिल्या. "सकाळ' व "पुढारी'ने तर लगेचच "कुख्यात गुंड बाबा बोडके' असा उल्लेख करून बातम्या दिल्या. "सकाळ'ने अगदी चौकटीत बोडके याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याचे आणि त्याला उच्च न्यायालयात आव्हान देऊन तो सध्या जामिनावर सुटल्याचे म्हटले आहे. त्याखेरीज त्याच्यावर "मोका'अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे आणि खून, खंडणी, बेकायदा शस्त्रे बाळगणे याबद्दल 11 गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याची माहिती दिली होती. दुसऱ्या दिवशी याच बातमीचा पाठपुरावा करताना या संदर्भातील प्रश्‍नावर अजित पवार निरुत्तर झाल्याची चौकट दिली होती. "पुढारी'ने यासंदर्भातील तपशीलवार बातमी पहिल्या पानावर दिली होती. "लोकमत'ने अत्यंत उपरोधिक शैलीत यासंदर्भातली बातमी लिहिली होती. त्यात बाबा बोडके याचे नाव नव्हते. दुसऱ्या दिवशी "पुण्याच्या राजकारणावर अंडरवर्ल्डचे सावट' अशी गुन्हेगारांच्या राजकीय सहभागाची माहिती देणारी बातमी दिली. त्यामध्ये गुंडांना पक्षात प्रवेश देण्याच्या निर्णयाबद्दल राष्ट्रवादीच्याच काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे म्हटले होते.महाराष्ट्र टाइम्समध्ये सुहास फडके यांनी तर "पुणेकरांनो हे गुंड तुमचे नेते आहेत का?' या शीर्षकाखाली तपशीलवार लेख लिहून महत्त्वाचे प्रश्‍न उपस्थित केले.




साधारणपणे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रांना अशा विषयांमध्ये फारसा रस नसतो, असा अनुभव आहे; मात्र या विषयावर पुण्यात डीएनए या वृत्तपत्राने केलेले वार्तांकन खरोखरच कौतुकास्पद होते। या वृत्तपत्राने पहिल्याच पानावर आठ कॉलम बातमी दिली होती। "NCP eyes poll canvas, rolls out carpet for jailbird` अशा शीर्षकाखाली देण्यात आलेल्या बातमीत जलसंपदामंत्री अजित पवार यांना बाबा बोडके दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती देत असल्याचे छायाचित्र होते। दुसऱ्या दिवशी पुण्यातील मान्यवरांचे या विषयावरील म्हणणे या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले। त्यात सर्वांनी या प्रकाराबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या। त्यात सगळ्यात गमतीची प्रतिक्रिया भाजपच्या नेत्याने दिली होती. हा नेता सध्या एकाच वेळी नितीन गडकरी व अजित पवार यांच्या गळ्यातील ताईत बनला असल्याचे सांगण्यात येते. काही जण "ताईत' या शब्दाऐवजी "डार्लिंग' शब्दाचा वापर करतात, तर या नेत्याने यावर आपण प्रतिक्रिया देऊ इच्छित नसल्याचे सांगून भारतात गुन्हेगार या शब्दाची व्याख्या अस्पष्ट असल्याचे म्हटले होते. लेक्‍चरर असणाऱ्या या "प्राध्यापका'ला पुन्हा शाळेत विद्यार्थी म्हणून पाठवण्याची गरज आहे, असे वाटते; मात्र हा अपवाद वगळता सर्वांनीच या प्रकाराच्या विरोधात स्पष्ट मत नोंदवले. अर्थात या विषयावर वृत्तपत्रांनी सुस्पष्ट व ठाम भूमिका घेऊन लिखाण केल्यामुळे अखेर तिसऱ्याच दिवशी बाबा बोडके याने पक्षाचा राजीनामा दिला. अर्थात, ही गोष्ट अर्धवट समाधान देणारी आहे. या राजीनाम्याच्या बातमीत "पुढारी'त दिलेला मथळा बरेच काही सांगून जातो. "पुण्याच्या राजकारणाच्या गुन्हेगारीला अर्धविराम', असा हा मथळा आहे. काहीही असले, तरी यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी अत्यंत जबाबदारीने काम केल्यामुळे त्याचा थेट परिणाम दिसून आला. अशा बातम्या देणे किंवा त्यावर लेख लिहिणे हे पत्रकारांच्या दृष्टीने जोखमीचे काम असते. ती जोखीम स्वीकारून त्यांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.




हे सगळे असले, तरी या निमित्ताने विज्ञाननिष्ठ पुरोगामी विचारसरणी आणि समाजकार्याचा वारसा लाभलेल्या अजित पवार यांच्यासारख्या नेत्याला एका गुंडाला जवळ करावे असे का वाटले, याचा विचार करण्याची गरज आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय मतदानाला फारसे उत्सुक नसतात किंबहुना ते मतदानातही भाग घेत नाहीत. सगळेच एकाच माळेचे मणी असे राजकीय नेत्यांना संबोधून स्वतःच्या निष्क्रियतेचे समर्थन करतात. प्रत्येक निवडणुकीत 90-95 टक्के मतदान होऊ लागले, तर या नेत्यांना अधिक जागरूकपणे आणि खरोखरच जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतील, त्यांना अधिक दक्ष राहावे लागेल; पण सध्या केवळ 40-45 टक्के मतदान होते. मग अनेकदा विजयी आणि पराभूत उमेदवारात खूपच कमी अंतर असते. अशा वेळी विजयासाठीची गॅप भरून काढण्याचे काम असे समाजकंटक करत असतात. त्यांच्याकडून पक्षाला आर्थिक रसदही पुरवली जाते. पुण्यात सर्वच पक्षांत असे समाजकटंक उजळ माथ्याने वावरतात. यानिमित्ताने फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका झाली असली, तरी अन्य पक्षांतील गुंडांचे आणि त्यांच्या कारवायांचे काय, हा प्रश्‍न अनुत्तरितच राहतो. पत्रकारांनी ज्या उत्स्फूर्तपणे हा प्रश्‍न मांडला, त्याला लोकांकडून उघड आणि क्रियाशील सहकार्य मिळाले, तरच पुढील काळात प्रसारमाध्यमांना समाजकंटकांवर अंकुश ठेवण्याचे काम प्रभावीपणे करता येईल.


- सुहास यादव


--------------------

2 comments:

विजयसिंह होलम said...

व्वा. सुहासजी, आपले या बाबतीतील कतृत्व आम्हाला माहिती नव्हते. आतापयर्ंत आम्ही आपल्याला केवळ सकाळमध्येच वाचत होतो. आपला ब्लाॅग छान आहे. शुभेच्छा.
विजयसिंह होलम
नगर
vijay.holam@gmail.com

Unknown said...

yadavji blog var ka hoina bhet zali. kedar wagh