OPINIONMAKER

Friday, January 30, 2009

असाही एक ब्राह्मण...


सध्याच्या स्थितीत महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या राजकारणात एखादा ब्राह्मण किती आत्मविश्‍वासाने वावरु शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी. पुण्यातील कॉंग्रेसमध्ये प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष पक्षांतर्गत संघर्ष केला. सर्वच कॉंग्रेसजनांमध्ये श्रद्धा आणि सबुरीचा जो महत्त्वपूर्ण गुण असतो तो त्यांच्यातही मुरलेला आहे. त्यामुळे हार-जीत त्यांच्याही वाट्याला आली तरीही ते पुन्हा उसळून उभे राहिले. अगदी पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर पुणे विकास आघाडी स्थापन करुन त्यांनी महापालिकेतील सत्ता ताब्यात ठेवली. लोकसभेची निवडणूक लढवली. त्यासाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या वळचणीला गेले. पराभव पत्करला. पण कधीच कायमची हार मानली नाही. मोठी स्वप्ने पाहायची आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यायची ही त्यांची कार्यपद्धती आहे. पुण्यात 1994 मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा असोत किंवा नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडास्पर्धा. डोळे दिपवून टाकणारे भव्यदिव्य कार्यक्रम घडवून आणणे ही त्यांची खासियत.

त्यावरुन प्रसारमाध्यामांतून त्यांच्यावर अनेकदा टीका झाली, आक्षेप घेतले गेले. पण त्यांनी त्याची फारशी तमा बाळगली नाही. आता 2010 मध्ये दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांकडे त्यांचे लक्ष लागलेले आहे. त्याचवेळी भारताला ऑलिंपिकचे यजमानपद मिळवण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

असे हे कलमाडी पुण्यात झालेल्या पाचव्या बहुभाषक ब्राह्मण अधिवेशनातील उद्‌घाटनाच्या कार्यक्रमासाठी आले तेच मुळी रेशमी सुळसुळीत धोतर आणि तसाच कुर्ता घालून. नेहमी खादीचे कपडे किंवा टाय आणि सुटात वावरणाऱ्या या नेत्याला अधिवेशनाचा नेमका कल माहित होता आणि तिथे कोणते कपडे चालणार याचेही भान होते. त्यांच्या पत्नी नऊवारी साडी नेसून आल्या होत्या. त्याचवेळी इतर पक्षांचे नेते मात्र नेहमीच्याच कपड्यात आले होते. मग कलमाडी आणि त्यांच्या पत्नी व्यासपीठावर खुर्चीत आणि अन्य पक्षातील आमदार आणि माजी खासदार व्यासपीठावर मांडी घालून बसल्याचे दृश्‍य होते. थोडक्‍यात लक्ष वेधून घेत होते ते कलमाडी. खरे तर ते रेशमी सुळसुळीत धोतर त्यांना आवरता येत नव्हते. त्यामुळेच अगदीच कसेतरी पकडून ते भाषणासाठी पोडियमपर्यंत पोचले. त्यांचे भाषणही फारसे मुद्देसूद नव्हते. पण समोरच्या समुदायाला काय मेसेज द्यायचा आहे हे त्यांना पक्के माहित होते. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी इथे यावे म्हणून आपण कसे प्रयत्न केले हे त्यांनी आवर्जून सांगितले. त्याचबरोबर पुण्याच्या प्रगतीसाठी मी काय काय केले याची जंत्री दिली. राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने पुण्यात अडीच हजार कोटी रुपये विकासकामांसाठी आले आता ऑलिंपकचे यजमानपद मिळाले तर पन्नास हजार कोटीपेक्षा कमी घेणार नाही, असे खणखणीतपणे सांगितले. अर्थात भव्य स्वप्ने पाहण्याचा त्यांचा स्वभाव त्यातून पुन्हा एकदा दिसला. मग ब्राह्मणांचे पुढील वर्षाचे अधिवेशन दिल्लीतच झाले पाहिजे, असेही त्यांनी शीला दीक्षित यांच्याकडे पाहात सांगितले. कलमाडी यांचा काम करण्याचा ढंगच वेगळा असल्याने त्यांच्या अफाट कल्पना दुसऱ्या कुणाला झेपणे शक्‍य नसते. त्यांच्या बोलण्याच्या स्टाईलमध्ये त्यांनी ब्राह्मण समाजाचे कौतुकही केले, टाळ्याही घेतल्या. एवढे सगळे झाल्यावर शीला दीक्षित बोलण्यासाठी उभ्या राहिल्या. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्त्वाखाली कॉंग्रेस पक्षाने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या दिल्लीत त्यांनी हे यश मिळवले असल्याने ब्राह्मण म्हणून अधिवेशनात आलेल्या प्रत्येकाला त्यांच्याबद्दल उत्सुकता होती. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रात सत्तेपासून लांब रहावे लागलेल्या या समाजाला आपल्यातील एक महिला राजकीय क्षेत्रात एवढे मोठे यश मिळवते याचे मोठेच अप्रूप वाटते. त्यामुळेच त्या बोलण्यासाठी उभ्या राहिल्यावर सगळ्यांची उत्सुकता वाढली होती. त्या म्हणाल्या, ""ब्राह्मण वही है, जो सोचता है, समाजको सुख-चैन देता है. ब्राह्मण अपने कर्तव्योंका पालन करे. सबको साथ लेकर हे काम करे.'' एका परिने सर्वसमावेशक विचासरणी असलेल्या आणि सगळ्यांना सामावून घेत राजकारण करणाऱ्या कॉंग्रेसची कार्यपद्धती त्यांनी सांगितली. अर्थात हे सगळे अतिशय सावधपणे. एवढे झाल्यावर मात्र, त्यांनी कलमाडींना जे अपेक्षित होते ते स्पष्टपणे सांगून टाकले. आपण ब्राह्मण अधिवेशनाला यावे म्हणून कलमाडी आपल्याकडे एक-दोन वेळा नव्हे तब्बल सहावेळा कसे आले. इथे आल्यावर एवढा जनसमुदाय पाहून आपण कसे भारावून गेलो आणि आल्याचे कसे सार्थक झाले हे त्यांनी सांगितले. कलमाडींच्या पाठीवर थाप पडली होती. ती देखील अत्यंत संयमी, आदरणीय, कर्तृत्ववान आणि पक्षात वजन असलेल्या व्यक्तिमत्वाकडून. हे सगळे घडवून आणण्यासाठी आधी खूप मोठा एक्‍झरसाईझ करावा लागतो. प्रत्येक चालीचा धूर्तपणे आणि शांतपणे विचार करावा लागतो. ते सगळे कलमाडी यांनी काळजीपूर्वक केल्याचे दिसत होते. त्यांचा व्यासपीठावरील वावर पाहता आगामी लोकसभा निवडणूक आणि पुणे लोकसभा मतदारसंघ त्यांच्या डोळ्यासमोर आहे हे स्पष्ट होत होते. त्यादृष्टीने अधिवेशनासाठी त्यांनी आवश्‍यक ती भरघोस मदतही केली असणार याचा अंदाज येतो.

यामुळे तिथे असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. या नेत्यांकडे संयोजकांचे दुर्लक्ष म्हणजे किती तर माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार सुरेश प्रभू उद्‌घाटनाच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर आले तेव्हा त्यांना बसण्यासाठी खुर्ची देण्याचे भानही कुणाला नव्हते. अर्थात प्रभू हे उच्चविद्याविभूषित, संयमी, समजूतदार नेते असल्याने ते व्यासपीठावर मांडी घालून बसले. शिवसेनेचे नेत शाम देशपांडे ह्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी धावपळ करुन एक खुर्ची उपलब्ध केली आणि मग प्रभू तिथे बसले.
या सगळ्यांवर कडी म्हणजे अधिवेशनातील राजकीय ठराव. त्यात म्हटले आहे की, "ब्राह्मण ज्ञाति बांधवांनी शंभर टक्के मतदान विविध राजकीय पक्षांच्या विचारापलीकडे जाऊन ब्राह्मण समाजहिताला प्राधान्य देईल अशाच व्यक्ती व विचारांना पाठिंबा देणारे मतदान करावे.'

इतके दिवस ब्राह्मण मतदार म्हणजे भाजप आणि हिंदुत्ववादी विचारांना पाठिंबा देणारा असे मानले जाते. पण या अधिवेशनात विचारांच्या पलिकडे जाऊन समाजहिताला प्राधान्य देणाऱ्या व्यक्तीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. याचे विश्‍लेषण कुणी कसेही केले तरी सध्याच्या घडीला कलमाडींनी मायलेज मिळवले हे मान्यच करावे लागेल. पुण्यातील कॉंग्रेसच्या पारंपारिक मतपेढीबरोबरच आणखी एक मोठा वर्ग आपल्या बाजूला वळवून घेण्यात ते यशस्वी झाल्याचे दिसते.

-सुहास यादव
--------------

2 comments:

Anonymous said...

VERY GOOD ARTICLE

Anonymous said...

Suresh Kalmadi is Most Corrupt Politician in india and you are miss guiding the people here

people like you are real enemies of maratha community

i hope you have television at your home