OPINIONMAKER

Monday, January 12, 2009

वाल्याचे वाल्मिकी होणार, महाराष्ट्रात रामराज्य येणार...


दादांबद्दल उभ्या महाराष्ट्रात एक आदरयुक्त दबदबा आहे. अत्यंत सडतोड बोलणे, वेगाने कामे मार्गी लावणे आणि प्रशासनावर करडी नजर यामुळे सर्वसामान्य लोकांना दादांचे व्यक्तिमत्त्व आकर्षित करते. चुकीचे काम करणाऱ्याला दादा अजिबात थारा देत नाहीत, अशा व्यक्तींना लगेचच त्यांची जागा दाखवून देतात. सध्याच्या काळात असे नेते दुर्मिळ असल्यानेच दादांबद्दल लोकांना आदर वाटतो. होय, आपले जलसंपदा मंत्री आणि समस्त पुणे शहर व जिल्ह्यातील सर्वसामान्यांची काळजी वाहणारे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दलच आम्ही लिहितो आहोत. (खरे तर महाराष्ट्राला "साहेब' म्हटले की यशवंतराव चव्हाणसाहेब आणि "दादा' म्हटले की फक्त वसंतदादा पाटील यांचीच नावे आठवतात. पण काळाच्या ओघात महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते स्वतःला "साहेब' आणि "दादा' संबोधू लागल्यामुळे हा खुलासा करणे भाग पडले.)तर, अजितदादांनी पुण्यात शनिवारी (ता. 10 जानेवारी 2009) झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात कामगार नेते बाबा बोडखे यांना पक्षात रितसर प्रवेश देऊन पक्ष बळकट करण्याच्या कार्यातील पुढचे पाऊल टाकले. खरे म्हणजे पक्ष वाढीसाठी दादांचे सतत दौरे चालू असतात. विशेषतः पुणे, सातारा, सोलापूर, रायगड या जिल्ह्यात दादांनी अनेक कार्यकर्ते व नेत्यांना पक्षात आणून पक्षाची ताकद वाढवली आहे. त्यामुळे पुण्यात शनिवारी झालेल्या मेळाव्यात काही कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला म्हणून पत्रकारांच्या पोटात दुखण्याचे काही कारण नव्हते. त्यापैकी एका पत्रकाराने तर, बातमीत म्हटले आहे की, चित्तशुद्धीचा यज्ञ करीत अनेक "चुकलेल्यांना' पावन करुन घेण्याची भूमिका घेत "बाहुबली'च्या साहाय्याने आगामी निवडणुकांसाठीची "बळ'कट तयारी करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले.
तर आम्हांस म्हणायचे आहे की, आयुष्यात मिष्टेक कोण करत नाहीत. प्रत्येकाच्या हातून मिष्टेकी होत असताताच. आपण काही देव नाही. साधी माणसे आहोत. त्यामुळे मिष्टेक झाली तर सुधारण्याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे. रामराज्य यायचे असेल तर वाल्याचा वाल्मिकी झालाच पाहिजे. नव्हे प्रत्येक वाल्याचा वाल्मिकी झाला पाहिजे. सध्या समाजात इतकी गुंडगिरी वाढली आहे, माफियांनी सामान्यांचे जिणे हराम केले आहे. समाजात सर्वत्र अनागोंदी आणि असुरक्षिततेचे वातावरण असताना राज्याची घडी बसवायाची असले तर किमान शंभर वाल्मिकी तयार व्हायला हवेत. कुणाच्या हातून काही चुकीचे घडले असेल आणि आता तो सुधारण्यास तयार असेल तर त्याला संधी दिली पाहिजे, ही दादांची भूमिका त्यामुळेच आम्हांला योग्य वाटते. शिवाय आता त्याने पुन्हा मिष्टेक केली तर दादांशी गाठ असणार आहे. त्यामुळेच कोणताही वाल्या एकदा का राष्ट्रवादीमध्ये आला की तो परत कोणतीच मिष्टेक करणार नाही याची आम्हांला शंभर टक्के खात्री आहे. येत्या विधानसभा निवडणुकीनंतर दादा मुख्यमंत्री होणार आणि रामराज्य येणार याबद्दल आमच्या मनात थोडीशीसुद्धा शंका नाही. त्यावेळी अत्यंत कर्तबगार सहकाऱ्यांची गरज भासणार आणि त्यामुळे आत्तापासूनच त्यादृष्टीने सहकारी निवडून ठेवण्याची दूरदृष्टीदेखील कौतुकास्पद म्हणावी लागेल.
पुण्यनगरीचे माजी महापौर यांनी याप्रसंगी व्यक्त केलेले विचार तर पुणेकरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहेत. वाल्याचा वाल्मिकी करुन घेण्याचे हे कार्य महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच केले असते तर महापालिकेत पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले असते आणि पाठिंब्यासाठी कुणाच्या कुबड्या घेण्याची गरज पडली नसती, अशी भूमिका त्यांनी मांडली. आम्ही त्यांच्या भूमिकेशी शंभर टक्के सहमत आहोत. मतदारांना पक्षाचा कार्यक्रम समजावून सांगणे, त्यांच्यापर्यंत पक्षाची धोरणे पोचवणे आणि मग लोकशाही प्रक्रियेने मतदार आपल्या पारड्यात मते टाकतात यावर आमचा शंभर टक्के विश्‍वास आहे. त्यामुळेच आता मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे काम वेगाने होईल आणि आपल्या पक्षाला महापालिकेत पुणेकरांनी हातचे राखून यश दिले आहे, ते येत्या विधानसभेच्या निवडणुकीत शंभर टक्के मिळेल, असा विश्‍वास आम्हांला वाटतो. कारण मतदार जागरुक आहे. त्याला सर्वकाही समजते. पत्रकारांनी काही लिहिले किंवा नाही लिहिले तरी आता मतदारांना विविध मार्गांनी माहिती मिळतेच. त्यामुळे माजी महापौरांना आमचा त्रिवार सलाम. इतका मूलगामी आणि समतोल विचार करणारा महापौर कधीकाळी आपल्याला लाभला होता याची जाणीव आता पुणेकरांना होईल.
या सर्व यशामुळे पोटात दुखणाऱ्या काही पत्रकारांनी आमच्या नेत्यांचा उल्लेख एकेरी केला, काहींनी त्यांना गुंड म्हणून संबोधले तर काहींनी तिरक्‍या शैलीत बातमी लिहित त्यांचे नाव लिहिण्याचे टाळले तर काहींनी बातमीच लिहिण्याचे टाळले. ( होय, तिरक्‍या शैलीतील बातमी आम्हांस कळते.) आम्ही त्या सर्वांना सांगून टाकले आहे की, ""हे तुमचे वर्तन अत्यंत आक्षेपार्ह आहे। भविष्यकाळ आमचाच आहे. आज नाही तर उद्या तुम्हांला आमच्या नेत्यांचा उल्लेख आदराने करावाच लागेल.''

-राष्ट्रवादीचा हितचिंतक .

No comments: