OPINIONMAKER

Monday, September 5, 2011

आकाशातल्या ठोम्ब्या बद्दल ....!


 परमेश्वराने  चराचर  व्यापलेले आहे. आणि तो सगळीकडे असतो.आणि आपण जे जे करतो त्याची म्हणे तो नोंद ठेवतो. आणि त्या नोंदींचा रेफरन्स घेऊन मेल्यावर आपल्या पाप पुण्याचा म्हणे हिशोब तो मांडतो. आणि मग आपले डीपार्टमेंट ठरवतो. म्हंजे नरक की स्वर्ग वगैरे. आता एव्हढी लांबलचक श्रद्धा ठेवणा-यांना हे माहिती नसतं का ? एखादे पाप करताना आपल्याला तो पाहतोय ? गुप्तपणे ! त्यामुळे तो घरी आला काय किंवा नसला काय, फरक नाई पडला पाहिजे. त्याचा वार असला काय किंवा नसला काय, फरक नाई पडला पाहिजे. कारण तो चराचर व्यापुन राहिलाय ना.....


सुधीर मुतालिक, अतिथी लेखक


काल जिम मधून खाली उतरलो. साडे आठ वाजले होते. गाडी जवळ पोचताना जिम कडे जाणारा मित्र भेटला. हा बहुदा माझ्या बरोबर असतो, सातच्या सुमारास. आज इतक्या उशिरा येतोय म्हटल्यावर गुड मॉर्निंग ऐवजी साहजिकच माझ्या कडून त्याच्यावर प्रश्न आपटला गेला, "अरे, आज इतका उशीर का ?" त्याचे स्पष्टीकरण चालु झाले. " काल श्रावण संपला ना. त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत 'बसलो' होतो. श्रावणाच्या म्हैना भरात सॉलिड तहान लागली होती. मित्र ही होते बरेच. दहा दिवस आधीच  ठरवून ठेवले होते. फार मजा केली. एकदम आउट ! पार कल्ला केला. आता आणि दहा दिवस बंद ना. गणपती आहे, बाप्पा. आपण नाही गणपतीत घेत. त्यामुळे आज जरा उशीर झाला."  मी " ओके, गुड डे." एवढंच म्हणालो.

 मित्राच्या निवेदनाला लॉग आउट केलं  आणि गाडी कडे सटकलो.  गाडीत नेमाका गुलाम अली ' हंगामा है क्यो बरपा, थोडीसी जो पीली है ..' ची अर्धवट राहिलेली गझल संपवत होता. त्यामुळे मित्राच्या काल पर्यंत दाटून आलेल्या कंठाची पुन्हा एकदा आठवण झाली. प्यायची तर बिनधास्त प्यायची ना. श्रावण किंवा गणपती साठी स्वत:वर बलात्कार कशाला ? दहा दिवस आधी प्लानिंग म्हंजे त्याही वेळी इच्छा झालीच असेल ना. प्यावेसे वाटले असेलच ना. आणि गणपती यायच्या आधी एकच दिवसाचा चान्स मिळाल्यावर आधीच्या महिना भराची आणि नंतरच्या दहा दिवसांची एकत्र पिऊन घ्यायची हा केव्हढा त्रास ? आणि कशासाठी ? आणि त्या दिवसांमध्ये इच्छा होऊन प्यायची का नाही ? तो एकच दिवस जो मध्ये होता त्या दिवशीच का चालते ? माझा मान्सीक त्रास असा होता की त्या महिन्यात आणि नंतरच्या दहा दिवसात असा काय फरक असतो ज्यामुळे आपल्या इच्छांचे दमन माझ्या मित्रांना करावे लागते? या श्रद्धाळू लोकांची गणितं मला कधीच कळत  नाहीत. वर्ष भर कुणाचा ना कुणाचा  असा त्रास असतोच. परवा पार्टी करू असं ठरवायचं असेल तर एकजण तरी म्हणतोच ' मित्रा परवा गुरुवार आहे बरं का, दत्ताचा वार आहे. दुसरा दिवस निवडा.' श्रद्धेचा आणि या बलात्काराचा नैतिक सबंध काय ?

गणपतीच्या आदल्या दिवशी काय नसतं जे त्या दहा दिवसात असतं ? म्हंजे आदल्या दिवशी गणपती पिताना बघत नाई का ? तो आलेला नसतो म्हणुन त्याला चालतं की तो आलेलाच नाही त्यामुळे त्याला विचारायचा संबंधच काय ? किंवा तो आलेला नसल्यामुळे तो बघू शकत नाही, त्याला समजतच नाही. माझा त्याचा फारसा सबंध जवळ जवळ लहानपणापासुनच नाही. म्हंजे त्यांच्या पैकी - गणपतीआदी - कुणाचाच सुरुवाती पासुन संपर्क नाही, फारसा परिचय नाही. त्यामुळे त्यांच्या संदर्भात पाळायची पथ्ये ही फारशी माहिती नाहीत. पण वाचना मुळे त्यांच्या काही खास बाबी माहिती आहेत. म्हंजे परमेश्वराने  चराचर  व्यापलेले आहे. आणि तो सगळीकडे असतो.आणि आपण जे जे करतो त्याची म्हणे तो नोंद ठेवतो. आणि त्या नोंदींचा रेफरन्स घेऊन मेल्यावर आपल्या पाप पुण्याचा म्हणे हिशोब तो मांडतो. आणि मग आपले डीपार्टमेंट ठरवतो. म्हंजे नरक की स्वर्ग वगैरे. आता एव्हढी लांबलचक श्रद्धा ठेवणा-यांना हे माहिती नसतं का ? एखादे पाप करताना आपल्याला तो पाहतोय ? गुप्तपणे ! त्यामुळे तो घरी आला काय किंवा नसला काय, फरक नाई पडला पाहिजे. त्याचा वार असला काय किंवा नसला काय, फरक नाई पडला पाहिजे. कारण तो चराचर व्यापुन राहिलाय ना. भक्त प्रह्लादाने नाई का त्याच्या उद्दाम बापाला, हिरण्यकश्यपुला सांगितलं होतं की माझा नारायण सगळी कडे आहे. या खाम्बामध्येही  आहे. त्याच्या बापाने मग खांबाला लाथ मारली. लाथ लागल्यामुळे रागावून त्यातून नरसिंह नामक नारायणाचा अवतार बाहेर आला .त्याने हिरण्यकश्यपुला मारून टाकलं. हे सगळ्यांना माहिती असेलच ना. म्हंजे श्रद्धाळूना तरी. पण तरीही हेच श्रद्धाळू " चोरून" एखादी गोष्ट कशी करू शकतात ? चोरून म्हंजे इकडे तिकडे कुणी बघत नाही असं बघून. वा समजून. हो, म्हंजे डोळे मिटून दुध पिणाऱ्या मांजरी सारखं.

शिर्डीच्या एका भक्ताने कमाल केली. एक सोन्याने मढवलेली शाल बनवली. किमती हिऱ्यांचा भराव असलेली.एकदम महागडी. तशी सगळी कडे बातमी फुटली. टीवी वर, पेपरात, इमेल वर दणका चालु झाला. करोडो रुपयाची शाल. भल्या भल्या भक्तांना फ़्रस्ट्रेट करून टाकलं. त्याना वाटलं हा सगळ्यात जवळ जाणार बाबांच्या. आपल्या पुढे. आपण तर फक्त चांदीचा मुकुटच चढवलाय. पण थोड्याच दिवसात गम्मत झाली.ती  सोन्याची शाल   खोटी असल्याची देवस्थानाला कुणीतरी सांगितलं. तो हिरो हे 'प्रामाणिक' पणे कबुल करून रिकामा झाला. मला तेच म्हणायचंय. देवावर आहे ना तुमचा विश्वास? मग तो सगळी कडे आहे हे कसं काय बुवा ही जनता विसरू शकते ? कित्येक चोरांच्या बातम्या टीवी वर वगैरे असतात ना. अमकी चादर चढवली. तमकी पूजा बांधली. या जनतेवर भ्रष्टाचाराचे, धमकी दिल्याचे वा अन्य कसले तरी हमखास आरोप कसे असतात?  त्या जेडे च्या मारेक-या चा कुठल्यातरी देवावर विश्वास होता. खून केल्यावर तो पहिल्यांदा त्या देवाला गेला असे कुठेतरी वाचलं. म्हंजे येडं कोण आहे ? जनता की देव ? भक्ती बरोबर येणारी नैतिकता मला कधी दिसत नाही त्यामुळे ही त्याचे आणि आपलं कधी जमलंच नाही. तो एकतर नसावाच किंवा असला तर अत्यंत अकार्यक्षम म्हंजे ढिम्म असावा. कुठे दिसला नाही त्यामुळे आपण नाई त्याच्या मागे धावणार असे म्हटलं तर हमखास एक टोमणा कानावर येतो की तो पापी लोकांना दिसत नाही. हो पण माझे जाऊ द्या हो. तो असेल तर काही ठिकाणी त्याने त्याचा प्रताप दाखवायलाच हवा होता.

 पंधरा वीस दिवसापूर्वी असेल,  एका कार्यालयात वाट बघत मुंबईत बसलो होतो. वेळ घालवायला समोर टेबलावर पडलेला टाइम्स ऑफ इंडिया चाळायला घेतला. ती बातमी वाचायची नव्हती पण परत परत तिकडे डोळे जात होते. शेवटी डोळ्यांनी माझ्या मनाला घट्ट पकडलं आणि त्या बातमीवर घेऊन गेले. घटना मुंबईतली. एक चिमुरडी सुमारे  आठ नऊ वर्षाची. बिस्कीट आणायला घराजवळच्या दुकानाकडे उड्या मारत चाललेली. वाटेत तिचा बाप भेटला. तो हल्ली फारसा घरी नसतो. बाबा भेटल्यावर चिमुरडीला आनंद झाला. तो म्हणाला चल माझ्याबरोबर. तश्याच उड्या मारत ती बाबा बरोबर गेली. एक २० - २१ वर्षाच्या पोराकडे तो बाप तिला घून गेला. त्याला म्हणाला ही घे तुला. हिचे काय करायचं ते कर. त्या हरामखोर बापाला आई ने घराबाहेर काढलं होतं. कारण आपल्याच तीस वर्षाच्या पोरीबरोबर त्याला झोपायचं होतं. घराबाहेर काढलं म्हणुन तो बायकोवर चिडला होता. तिचा बदला घ्यायचा होता. तो २० - २१ वर्षाचा गुंड तिला एका स्टेशन वर घेऊन गेला. वारंवार तिच्यावर बलात्कार त्याने केला. काम झाल्यावर रुळा शेजारच्या एका नाल्यात तिला फेकून दिली. वेदनेनं बेजार झालेली चिमुरडी आक्रोश करत त्या दलदली मध्ये गटांगळ्या खाऊन मेली. मला वाचुन दरदरून घाम फुटलेला. शरीर प्रचंड थरथरत होतं. पळत फ्रेश रूम मध्ये जाऊन उलटी होते का पाहिलं. जमलं नाई. धावत गाडी कडे गेलो. बसलो. सुरु केली. लांबवर गेलो. काचा बंद केल्या जोरजोरात पाच मिनिटं. किंचाळलो. थोडा मोकळा झालो. ....... मला आकाशातला मायबाप दिसत नाही. हे मान्य. पण त्या चिमुरडीचा काय हो दोष? पाप आणि पुण्याच्या चक्रात अजुन अडकलेलाही नव्हता तो जीव. मग तिच्या वर एव्हढा भीषण अत्याचार होताना चराचर व्यापलेला तो परमेश्वर करत काय होता, शेजारी उभा राहुन? तो असेल वा नसेल. मी दखल घेण्याच्या लायकीचा तो नक्की नाही, माझ्या वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच.

सुधीर मुतालीक ३.९.२०११ (अतिथी लेखक)

No comments: