OPINIONMAKER

Thursday, September 8, 2011

खबरदार नाक खुपसाल तर....


नाना पाटेकर हे एक मनस्वी आणि कलंदर व्यक्तिमत्व आहे. कुणाचाही मुलाहिजा न ठेवता रोखठोक बोलणे ही त्यांची खासियत आहे. त्याचबरोबर मराठी असल्याचा रास्त अभिमान त्यांना आहे. त्यामुळेच मराठी माणसाच्या हितासाठी उद्धव आणि राज ठाकरे यांनी जमले तर एकत्र यावे, अशी सबुरीची भाषा त्यांनी वापरली होती. अर्थात यात कुणावरही टीका नव्हती, व्देष किंवा मत्सर नव्हता, की कुरघोडी करण्यासाठी केलेले ते राजकीय विधान नव्हते. सर्वसामान्य मराठी माणसाची ती इच्छा आहे,


    उद्धव आणि राज यांच्यातील मतभेद, मराठी माणसाच्या नावावर मतांचा जोगवा मागण्याचे राजकारण, त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी याच्याशी सामान्य मराठी माणसाला काहीही देणेघेणे नाही. तुमचे काही देण्याघेण्याचे व्यवहार असतील तर ते घराच्या आत मिटवा आणि मराठी माणसाच्या हिताचे किंवा भावनेचे राजकारण करायचेच असेल तर ते किमान एकत्रितपणे करा, एवढीच मराठी माणसाची अपेक्षा आहे आणि त्यात वावगे काहीही नाही. आता मराठी माणसाची ही इच्छा बोलून दाखवल्यावर राज ठाकरे यांना राग  येण्याचे काहीच कारण नव्हते. एवढी साधी अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे असेल तर राज यांनी त्याकडे दुर्लक्ष करणे श्रेयस्कर ठरले असते. पण 'खाई त्याला खवखवे' या उक्तीनुसार राज यांनी लगेचच नाना पाटेकर यांना चार शब्द सुनावले. अख्ख्या जगात कुणालाही वाट्टेल ते सुनावण्याचा अधिकार ठाकरे मंडळींकडेच आहे हे नम्रपणे मान्य केले तरी मराठी माणसाच्या हिताचेच राजकारण करायचे आहे तर वेगळी चूल मांडण्याचे कारणच काय, असा भाबडा प्रश्न अनेक मराठी मनात अद्यापही आहे.

   शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर घाम गाळून, रक्त आटवून शिवसेना उभी केली. त्या शिवसेनेची सगळी सूत्रे राज ठाकरे यांना हवी होती, ही बाब आता उघड झाली आहे. त्यामुळेच शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्यावर आपल्या शब्दाला आता या पक्षात फार स्थान नाही हे ओळखून त्यांनी नवा पक्ष स्थापन केला. त्यानंतर सत्ताधारी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीला अडचणीत आणण्याचे राजकारण करण्याऐवजी त्यांनी सतत शिवसेनेला आणि पर्यायाने उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्याचे राजकारण केले. प्रसंगी त्यासाठी वेळोवेळी भारतीय जनता पक्षाची मदतही घेतली. भाजपवाल्यांनीही मग शिवसेनेचे उपकार,  त्या पक्षामुळे महाराष्ट्रात भाजपला मिळालेले स्थान या कशाचाही विचार न करता राज यांना मदत केली. अगदी त्यांना गुजरातलाही पाठवले.  राज्यातील निष्क्रिय आणि प्रभावहीन आघाडी
सरकारविरुद्ध रान उठवण्याची गरज असताना त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांची मानहानी कशी करता येईल, याचेच राजकारण राज ठाकरे सातत्याने करत राहिले. त्यातून दोघांमधील दुष्मनी जगजाहीर झाली. आता त्यांची ही दुष्मनी, एकमेकांचे तोंड न पाहण्याची भूमिका, दुसर्‍याला संपवण्याचे राजकारण यात मराठी माणसाला काडीचाही रस नाही. त्यासाठी मराठी माणसाच्या भावनेशी खेळ कशाला, हा मुख्य प्रश्न आहे.

कॉंग्रेसवाल्यांची एक संस्कृती असते, तशीच शिवसेनेची एक संस्कृती आहे. म्हणजे असे की कोणताही कॉंग्रेसवाला पक्षातून बाहेर पडला की नवा पक्षा काढताना त्यात कॉंग्रेस हा शब्द आवर्जून ठेवतो. म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस, ममता बॅनर्जींची तृणमूल कॉंग्रेस, एकेकाळी मूपनार यांची तमीळ मनिला कॉंग्रेस. तर पक्षातून बाहरे पडणार्‍या या कॉंग्रेसवाल्यांना त्या पक्षाशी बांधील असणार्‍या मतदारांना आपल्याकडे ओढून घ्यायचे असते म्हणून तो त्यांची दिशाभूल करण्यासाठी नावात कॉंग्रेस शब्द ठेवतो. त्याचप्रमाणे राज यांनीही शिवसेनेतून बाहेर पडल्यावर नवा पक्ष स्थापन करताना त्याच्या नावात सेना हा शब्द राहिल, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. सेना सोडून त्यांना अन्य कोणताही शब्द वापरता आला असता. परंतु केवळ शिवसेनेचा मतदार आपल्याकडे ओढून घ्यायचा या एकमेव उद्देशाने त्यांनी नावापासूनचे सगळे राजकारण केले आहे. कारण त्यांना माहित आहे की कोणत्याही प्रश्नावर राष्ट्रीय विचार करुन भूमिका ठरवणारा
कॉंग्रेसचा मतदार आपल्याकडे कधीच येणार नाही. कॉंग्रेसच्या आणि भाजपच्या मतदारांमध्ये मराठी लोकही  आहेत. पण हा मराठी मतदार राज ठाकरे यांच्या मागे जाणार नाही. तो परंपरागत त्यांच्या पक्षाबरोबर राहणार.  मग आपला बेस कोणता तर तो शिवसेनेचाच, हे ओळखून राज यांनी शिवसेनेचेच सगळे मुद्दे आक्रमकपणे मांडून राजकारण करायला प्रारंभ केला आणि त्यात त्यांना यश आल्यासारखे दिसते आहे. असेच काम त्यांनी शिवसेनेत असताना केले असते तर मराठी माणसाचा हा पक्ष सत्तेत दिसला असता. पण सगळी सुत्रे दिली तरच अन्यथा मी निघालो, या राज यांच्या भूमिकेतून मराठी माणसाची फरफट होते आहे.  त्यातून शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांचा नव्हे तर मराठी माणसाच्या भावनांचा खेळखंडोबा होतो आहे. अर्थात राज ठाकरे हे कधीच मान्य करणार नाहीत, तशी अपेक्षा ठेवणे म्हणजे पुन्हा  दोघांनी एकत्र येण्याची
अपेक्षा ठेवण्यासारखेच आहे.

    मराठी माणसाच्या हिताचेच राजकारण करायचे असेल तर ते शिवसेनेतच राहून करेल आणि त्यासाठी मी वाट्टेल तो त्याग करेन किंवा किंमत मोजेन अशी भूमिका राज ठाकरे यांना घेता आली असती. पण ते काही सर्वसंग परित्याग केलेले कुणी ऋषिमुनी नाहीत. राजकीय नेत्यापेक्षा ते पक्के व्यावसायिक आहेत. त्यामुळे आपल्या व्यावसायिक हितसंबंधांचा हिशेब मांडून त्यांनी वेगळा पक्ष काढून मराठी माणसाच्या नावाने राजकारण सुरु केले. नाना पाटेकरांसह कोट्यावधी मराठी माणसाला याची कल्पना नसल्यामुळे बिचार्‍यांना वाटत राहते की कधीतरी हे दोघे एकत्र येतील आणि मराठी माणसाची जबरदस्त ताकद महाराष्ट्रात उभी राहिल. त्यामुळे ते आपले बोलून जातात आणि राज ठाकरे हे नाना पाटेकरांना सुनावतात की, माहिती असल्याशिवाय नको तिथे नाक खुपसू नये. त्यामुळे यापुढे मराठी माणसाने मायकेल जॅक्सन, शिवउद्योग सेना, रमेश किणी आणि अन्य ज्ञात-अज्ञात प्रकरणांची माहिती घेतल्याशिवाय नाक खुपसू नये एवढाच या सगळ्याचा अर्थ आहे.

-सुहास यादव
------------------------
http://www.esakal.com/esakal/20110908/5711019201709106156.htm
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9905044.cms

No comments: