OPINIONMAKER

Tuesday, June 7, 2011

भक्तगण संकटात, बाबा स्त्रीवेशात...

भ्रष्ट भारतीयांनी परदेशातील बँकांमध्ये ठेवलेला बेहिशोबी पैसा परत आणला पाहिजे या मुद्दाला देशातील प्रत्येकाचा पाठिंबा आहे. परंतु हे सगळे घडवून आणण्यासाठी काय केले पाहिजे याची मुद्देसूद मांडणी करुन ती प्रामाणिकपणे देशासमोर आणि सरकारसमोर ठेवण्याऐवजी रामदेवबाबांनी स्वतःचा अहंकार जपण्यासाठी आणि महत्त्व वाढवण्यासाठी सगळ्या चाली रचल्या आणि त्या अंगलट आल्यावर पळून जाण्याचा मार्ग स्वीकारला.

 खरे तर आंदोलन, उपोषण, पोलिस, लाठीमार, पळापळ अशा भानगडीपासून आयुष्यभर चार हात लांब राहिलेल्या आणि बाबांकडे केवळ  योग शिकण्यासाठी आलेल्या मध्यमवर्गीयांना बाबांनी अचानक आंदोलनात उतरवले आणि मग नेतृत्व पळून गेले म्हटल्यावर बिचारे अनुयायी सैरभैर झाले. सरकराने केलेल्या अमानुष लाठीमाराचे परिणाम सरकारला भोगावे लागतीलच.  पण  बाबांनी योग्य गृहपाठ न करता केवळ स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी केलेल्या या आंदोलनामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधात देशभरात सुरु झालेल्या चळवळीचे मोठेच नुकसान झाले आहे.


दिल्लीतील रामलीला मैदानावर रामदेवबाबा यांनी केलेले कथित आंदोलन म्हणजे देशासमोरील एखादा गंभीर मुद्दा अतिउत्साही आणि नेतृत्वाच्या कसोटीवर अपरिपक्व व्यक्तीच्या हातात गेल्यावर काय होते, याचे ठळक उदाहरण आहे. बाबांच्या मागण्या रास्त आहेत आणि त्यांना उपोषण, सत्याग्रह करण्याचा पूर्ण अधिकार आहे हे मान्य केले तरी आंदोलनाच्या ठिकाणी लाखो लोकांना बोलवल्यानंतर त्यांचे नेतृत्व करण्यासाठी जो संयम, प्रामाणिकपणा आणि परिपक्वता लागते त्याचा बाबांकडे पूर्णपणे अभाव होता हे स्पष्ट झाले आहे. बाबांनी आंदोलनाचे मोठे नियोजन केले होते. मोठा मंडप, कुलर, पंखे, पाण्याचे नळ, भटारखाना अशी सर्व व्यवस्था चोख करण्यात आली होती. मग आंदोलनात काही विपरित घडले तर त्याला कसे सामोरे जायचे यासाठीच्या पर्यायी योजना बाबांनी केल्या नव्हत्या. मुळात अतिशय अहंकारी असलेल्या या बाबांचे आंदोलन म्हणजे अक्षरशः एकखांबी तंबू होता. त्यामुळे पोलिस बाबांच्या मागे लागल्यावर बाबांनी पलायन केले आणि अनुयायांची शब्दशः वाताहात झाली. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी दुसर्‍या फळीतील नेतृत्वच या आंदोलनात नव्हते हेस्पष्ट झाले आहे.

फाईव्ह स्टार आंदोलन    
अगदी हरिव्दारमधून निघाल्यापासून बाबांनी अतिशय धूर्तपणे चाली रचत सरकाराला नामोहरम केले होते. त्यांच्या या कौशल्याला दाद दिलीच पाहिजे. पण दिल्लीत आल्यावर त्यांचे शिष्य वगळता समाजातील अन्य कुठल्याही प्रभावी आणि प्रतिष्ठित व्यक्तींना चर्चेसाठी बरोबर न घेता सरकारबरोबर चर्चा करत राहिले. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल शंका घेण्यास मोठा वाव आहे. काळा पैसा परत आणणे महत्त्वाचे की त्याचे क्रेडिट कोणाला हे महत्त्वाचे? काळ्या पैशाच्या प्रश्नांवर मार्ग निघण्यापेक्षा मार्ग निघालाचा तर त्याचे संपूर्ण क्रेडिट आपल्या खात्यात जमा झाले पाहिजे या अट्टहासातूनच बाबांनी अन्य कुणालाही सरकारबरोबरील चर्चेत सहभागी करुन घेतले नाही. पन्हा त्यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील सरकारने जाहीर केला तर लगेच विश्वासघात झाल्याची आरोळी त्यांनी मारली.  त्यामुळे मुद्दयापेक्षा स्वतःचे महत्व वाढवून घेणे हाच बाबांचा एककलमी कार्यक्रम होता हे स्पष्ट झाले. कारण हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व म्हणणार्‍यांच्या गटात बाबा पहिल्यापासून सामील आहेत हे एव्हाना उघड झाले आहे. त्यामुळेच राष्ट्रासाठीच काम करणार्‍या अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांच्याशी बाबांचे कधी पटलेच नाही. खरे तर भ्रष्टाचार रोखण्याच्या प्रक्रियेतील एक पाऊल म्हणजे लोकपाल विधेयक. या विधेयकाचा मसुदा अतिशय काटेकोर, कडक होईल जेणेकरुन भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल यासाठी हजारे, केजरीवाल निष्ठेने काम करत आहेत. हजारे यांनी अगदी साधी मागणी केली होती. भ्रष्ट नेत्यांची चौकशी  करणार्‍या लोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करणार्‍या समितीत संसद सदस्यांबरोबरच लोकांचे प्रतिनिधी असावेत. जेणेकरुन हा कायदा अत्यंत कडक होईल. त्यात न्यायव्यवस्था, पंतप्रधान यांचाही समावेश करावा, अशी त्यांची मागणी होती. हा कायदा झाल्यावर भारतातून परदेशात जाणार्‍या बेहिशोबी पैशाच्या प्रमाणात घट होईल, अशी अपेक्षा. यासंदर्भातील काम, समितीच्या बैठका सुरु असताना बाबांनी हे काम प्रभावीपणे व्हावे म्हणून प्रयत्न करणे अपेक्षित होते. त्यातून पुढे भ्रष्टाचारासंदर्भातील आणखी कडक कायदे करण्याची मागणी, त्यासाठीची उपाययोजना याकडे टप्प्याटप्प्याने जाता आले असते. पण संन्यासी म्हणवून घेणार्‍या या बाबांना अहंकाराने ग्रासले आहे याची प्रचिती या आंदोलनाने आली. लोकपाल विधेयकाच्या मसुदा समितीत भूषण पिता-पुत्रांच्या समावेशावरुन आक्षेप घेऊन त्यांनी या कामाला खोडा घालण्याचे प्रयत्न केले. बाबांना या समितीत स्थान न मिळाल्याने त्यांचा अगदीच तिळपापड झाल्याचे एव्हाना स्पष्ट झाले होते.  सामान्य माणसाच्या मनात तेव्हाच पालचुकचुकली जेव्हा बाबा दिल्लीला खास चार्टर्ड विमानाने निघाले. हरिव्दारमधील पतंजली योगपीठातून दिल्लीच्या दिशेने पदयात्रा सुरु करुन मार्गातील गावागावात जागृती करत, लोकांचा पाठिंबा मिळवत, सुमारे दोन-तीन लाख लोकांना घेऊन बाबांना दिल्लीत पोचता आले असते. पण यात मोठी जोखिम होती. कदाचित पदयात्रेत लोकांचा पाठिंबा मिळाला नाही तर... त्यामुळे बाबांनी श़ॉर्टकट  साधून  विमानाने दिल्ली गाठली. 

बाबांचा अहंकार?  
बाबांच्या मागण्यांना सरकारचा विरोध नव्हताच. किंबहुना बाबांवर उपोषणाची वेळ येऊ नये यासाठी मंत्रिमंडळातील क्रमांक दोनचे नेते प्रणव मुखर्जी हे देखील बाबांना भेटून चर्चा फलदायी व्हावी म्हणून विमानतळावर आले.  चर्चा झाली. बहुतेक मागण्या सरकारने मान्य केल्या. त्याची माहिती केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी जाहीर करताच बाबांचा घोर विश्वासघात झाला. बाबांचा अहंकार किती होता,  तर ते विमानाने येणार, पंचतारांकित हॉ़टेलमध्ये बंद दरवाजाच्या आड चर्चा करणार आणि पुन्हा एकटेच चर्चेसाठी जाणार. हजारेच्या समवेत चर्चेसाठी किमान अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण अशी तज्ज्ञ मंडळी तरी होती. बाबांना कायद्याचे कितपत ज्ञान हा प्रश्न आहेच, पुन्हा  परदेशातील पैसा म्हणजे काय कोपर्‍यावरुन भाजी आणण्याइतके सोपे होते काय? आंतरराष्ट्रीय कायदे, बँकांचे नियम, कार्यपद्धती याचा विचार करुन ते सगळे होणार. पण बाबांना काही दम निघत नव्हता. त्यांना एकदम हीरो व्हायचे होते आणि अण्णांना झीरो करुन टाकायचे होते. बाबा एक-एक डाव सरकारवर टाकत होते आणि त्यात बाबांना यश येताना दिसत होते. पण आंदोलनात आणि चळवळींमध्ये नेहमीच तुम्ही म्हणाल तसे होत नाही. मग सरकारने बाबांची धोबीपछाड केली. स्विर्त्झलंडमधील बँकांमध्ये असलेला पैसा सरकारने परत आणावा म्हणून बाबांनी आंदोलन सुरु केले होते. रामदेवबाबा हे काही धाडसी आणि धीट गृहस्थ नाहीत हे या आंदोलनाने स्पष्ट झाले. आंदोलन सुरु केले आहे म्हणजे भ्रष्टाचार करणार्‍या मोठ्या लॉबीला आपण धक्का  देत आहोत याची जाणीव ठेऊन वाईट स्थितीमध्ये काय होऊ शकते आणि त्यावेळचे नियोजन, पर्याय काय असतील याचे कोणताही विचार बाबांनी केला नव्हता. यासंदर्भात रा. स्व. संघाकडे त्यांनी मदत मागितली असती तरी त्यांनी चोख नियोजन करुन दिले असते. कारण अशा आंदोलनांचा अनुभव संघाच्या नेत्यांकडे आहे. पण पुन्हा बाबा पडले अहंकारी. त्यांना स्वतःचा राजकीय पक्ष काढायचा आहे.

शिवाजी महाराज आणि लाला लजपतराय
एवढे सगळे असल्यावर मोठे धाडसी आंदोलन उभे केले आहे म्हटल्यावर पोलीस आल्याबरोबर बाबांनी पळून जाण्याची काय गरज होती? पोलिसांना निधड्या छातीने सामोरे जाण्याची गरज होती. त्याऐवजी अनुयायांना पोलिसांच्या लाठीमारात सोडून बाबा पळून गेले. यावेळी आठवण होते ती पंजाबकेसरी लाला लजपत राय यांची. सायमन कमिशनच्या विरोधात लाहोरमध्ये काढलेल्या मोर्चावर ब्रिटीश पोलिसांनी लाठीमार केल्यावर ६३ वर्षांचा या सिंह निधड्या छातीनो लाठीमाराला सामोरा गेला. भित्र्या सशाप्रमाणे पळून गेला नाही. मग रामदेवबाबांनी  व्यासपीठावरून उडी मारून महिलांमध्ये मिसळून जाण्याची काय गरज होती? पुन्हा बाबांनी या सर्व प्रकाराला छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा म्हणून स्वतःच्या भित्रेपणाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. बाबांनी कदाचित शिवाजी महाराजांचा इतिहास नीट वाचला नसावा. शिवाजी महाराजांचे निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य मृत्यूच्या छायेत गेले. मग ती अफजलखानाबरोबरील  भेट असो, पन्हाळ्याचा वेढा असो किंवा आग्र्यातील अटक असो. प्रत्येक वेळी शिवाजी महाराज स्वतः पुढे राहून संकटांना सामोरे गेले. शाहिस्तेखानावर छापा घातला तेव्हा ते पुन्हा एकदा मृत्यूच्या दाढेत शिरले होते. त्यावेळी शिवाजी आला म्हटल्यावर खान पळत सुटला आणि जीव वाचवण्यासाठी त्याच्या जनानखान्यात बायकांमध्ये जाऊन बसला होता. अर्थात शिवाजी महाराजांनी त्याचा पाठलाग करुन त्याला चांगली अद्दल घडवली. त्यामुळे आपल्या भंपक कृत्यांचा शिवाजी महाराजांच्या कार्याशी बाबांनी संबंध जोडणे हा मोठाच विनोद आहे.

योगशिबिरातून थेट आंदोलनात 
रामलीला मैदानावर लाठीमारात सापडेलेले लोक पाहिले तर लक्षात येते की ही सर्व मध्यमवर्गीय मंडळी आहेत. आपल्याला चांगले आरोग्य लाभावे, असलेल्या व्याधी दूर व्हाव्यात या एकमेव आणि माफक अपेक्षेने हे लोक बाबांकडे आले होते. यातील बहुतेकजण आयुष्यात कधीही असल्या कोणत्याही भानगडीत किंवा आंदोलनांमध्ये सहभागी झालेले नव्हते. केवळ बाबांवरील श्रद्धेपोटी ते सर्वजण आले होते. दुसर्‍या शब्दात सांगायचे तर योग शिकण्यासाठी आलेल्या भक्तांना बाबांनी अचानक काळा पैसा परत आणण्याच्या आंदोलनात उतरवले तर गोंधळाची स्थिती निर्माण होणारच होती. स्वतःच्या समस्या आणि सुख यातच गुरफटलेल्या मध्यमवर्गाला राष्ट्रीय आंदोलनात या ना त्या मार्गाने उतरवणे यात काहीच गैर नाही. पण त्या बिचार्‍यांना त्याची सर्व कल्पना देणे गरजेचे होते. ही सगळी मंडळी योगशिबिरात सहभागी होण्याच्या तयारीनेच आंदोलनात सहभागी होण्यासाठी आली होती. योग शिबिरात बसण्याएवढे आंदोलनात सहभागी होणे सोपे नसते. लाठीमार, पोलिस, गोंधळ, पळापळ अशा अंगावर काटा आणणारे प्रसंग यातील कुणीच आयुष्यात कधीच अनुभवलेले नव्हते. त्यामुळे या भक्तांना आंदोलनाबाबत प्रशिक्षण देऊन मग रामलीला मैदानावर आणायला हवे होते. पण बाबांना याची फिकीर नव्हती. त्यांना हजारेंपेक्षा मोठा हीरो बनण्याची घाई झाली होती.  त्यातून मग पोलिस आले की बाबांची पळापळ झाली. मंडपात पोलिस आले म्हटल्यावर बाबा स्वतःचा बचाव करण्यासाठी मार्ग शोधू लागले. उडी मारून महिला भाविकांमध्ये मिसळून गेले. जो नेता आपले अनुयायी संकटात, गोंधळात असताना, कसोटीच्या क्षणी  स्वतःला वाचवण्यासाठी पळून जातो तो समाजाचे नेतृत्व यशस्वीपणे कसे काय करणार?  त्यावेळी गोंधळलेल्या समुदायाचे नेतृत्व करण्यासाठी बाबांचा कोणताही अनुयायी पुढे येऊ शकला नाही. कारण जमावाला कसे सांभाळायचे, कसोटीच्या क्षणी जमावाचे नेतृत्व कसे करायचे याचे कोणतेही प्रशिक्षण दुसर्‍या फळीतील अनुयायांना नव्हते.

महिलांमागे लपणारे देशाचे रक्षण करणार ? 
पुन्हा आंदोलन उभे केले म्हणजे त्याच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारायला हवी. प्रत्येक वेळी आपली चाल यशस्वी होईलच असे नाही. सरकारने टाकलेला डाव अंगलट आल्यावर पळून जाणे हे काही पुरुषार्थाचे लक्षण नाही. उलट आपले सगळे अनुयाची सुरक्षितपणे बाहेर पडल्यानंतरच मी इथून हलणार अशी भूमिका बाबांनी घ्यायला हवी होती. त्यांनी तिथेच उभे राहून परिस्थिती हाताळायला हवी होती. पोलिस आले म्हणून महिलांना पुढे करणारे बाबा देशाचे कसे काय रक्षण करणार आहेत? या सर्व घडामोडीत कौतुक केले पाहिजे ते बाबांना लपवून ठेवणार्‍या महिलांचे. त्यांनी त्यांचे प्रसंगावधान, हुशारी दाखवून दिली.

सहकार्‍यांची सुरक्षितता
मी विद्यार्थी दशेत अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झालो होतो. नेतृ्त्व केले होते. अनेकदा अटकही झाली होती.  पोलिसांबरोबर झटापटीचे प्रसंग  आले. मात्र, प्रत्येक वेळी आपले सहकारी कुठे आहेत, कसे आहेत, आंदोलन संपल्यावर किंवा अटकेतून सुटल्यावर सर्वजण आपआपल्या घरी व्यवस्थित पोचले किंवा कसे याची शेवटपर्यंत माहिती घेण्याची व्यवस्था आमच्या नियोजनात शिकवण्यात आली होती. त्याची चोख अंमलबजावणी केली जात असे. विशेषतः विद्यार्थीनी कार्यकर्त्यांची अत्यंत जबाबदारीने काळजी घेणयात येत असे. महाविद्यालयीन जीवनात अतिशय आक्रमकपणे आंदोलने करणार्‍या आणि चुकीच्या गोष्टींव तुटून पडण्याची खुमखुमी असणार्‍या माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आपल्या सहकार्‍यांची काळजी घेण्यचे समजत होते ते बाबांसारख्या अनुभवी आणि सर्वज्ञानी व्यक्तील समजू नये याचे आश्चर्य वाटते. भ्रष्टाचार, काळा पैसा हे महत्त्वाचे विषय आहेतच पण कसोटीच्या क्षणी अनुययांना वार्‍यावर सोडून पळून जाण्याचे कधीही समर्थन करता येणार नाही. कारण नेत्यावर विश्वास ठेऊन अनुयायी वाटचाल करत असतात. संकटसमयी नेता कच खातो किंवा पळून जातो म्हटल्यावर अनुयायीदेखील यापुढे आपल्या सुरक्षिततेचा विचार करुन फक्त वेल अॅरेंज्ड किंवा वेल फ्रॅब्रिकेटेड आंदोलनात सहभागी होतील.

-सुहास यादव


No comments: