OPINIONMAKER

Sunday, February 28, 2010

अनमोल ठेवा


छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांमुळे शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचे नाव घराघरात पोचले. त्यांनी नेत्यांपासून उद्योजकांपर्यंत अनेकांचे पुतळे बनवले. त्याचबरोबर आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या अनेक सामान्य व्यक्तींची, प्राण्यांची शिल्पे बनवली. कलेला त्यांनी सामान्य माणसाशी जोडले. अशा श्रेष्ठ शिल्पकाराच्या कलाकृती त्यांच्या सासवण्यातील संग्रहालयात पहायला मिळतात. अलीबागजवळी छोट्या खेड्यात असलेले हे संग्रहालय आवर्जून पहावे असेच आहे.
--------------------------------------


छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचे नाव घराघरात पोचले. पुतळ्यांखेरीज त्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या अनेक सामान्य व्यक्तींची शिल्पे बनवून समाजाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ज्यांची त्यांनी शिल्पे बनवली, त्यापैकी अनेकजण आता हयात नाहीत. तरीही ही शिल्पे पाहिल्यानंतर यांना आपण कुठेतरी पाहिले आहे, आपली त्यांच्याशी पूर्वीची ओळख आहे, असे वाटू लागते. कदाचित पुढच्याच क्षणी एखादे शिल्प आपल्याशी बोलू लागेल, असे वाटण्याइतकी ती जिवंत आहेत. करमरकरांच्या सासवण्यातील घरात असा अनुभव पावलापावलावर, प्रत्येक शिल्पापाशी येतो.


करमरकरांच्या अनेक शिल्पकृतींना पुरस्कार मिळाले. कलेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 1962 मध्ये केंद्र सरकारने पद्मश्री किताब देऊन त्यांचा गौरव केला. त्यांनी अनेक संस्थानिकांना त्यांच्या कुटुंबीयांचे पुतळे बनवून दिले. नेत्यांचे, उद्योगपतींचे पुतळे बनवले. पण त्याचबरोबर इथल्या समाजजीवनाचे खरेखुरे प्रतिनिधी असलेल्या सामान्य माणसांना त्यांच्या कलेत स्थान होते. घरातील मोलकरणीपासून ते त्यांच्या आवडत्या कुत्र्यापर्यंत सर्वांची शिल्पे त्यांनी बनवली. त्यांचा कलेचा हा अनमोल ठेवा त्यांच्या पश्‍चात कुटुंबीयांनी तितक्‍याच काळजीने जपून ठेवला आहे. अलिबागजवळील सासवणे हे त्यांचे गाव. त्याठिकाणी असलेल्या त्यांच्या निवासस्थानी सुमारे एकशेसाठ कलाकृती आहेत.

करमरकरांचा जन्म दोन ऑक्‍टोबर 1891 रोजी सासवण्यातच झाला. वयाच्या 19 वर्षापर्यंत ते तिथे होते. वडिल गणपतीच्या मूर्ती बनवीत असल्यामुळे देव-देवतांच्या मूर्ती बनवण्याचा त्यांना लहानपणापासूनच छंद होता. लहानपणी गावातील रामाच्या देवळातील भिंतीवर त्यांनी घोड्यावर बसलेल्या शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटले. त्या चित्रानेच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अलिबागचे तत्कालीन कलेक्‍टर ओटो रॉथफिल्ड यांनी एकदा सासवण्याला भेट दिली, त्यावेळी त्यांनी या चित्राचे कौतुक केले व कलेच्या क्षेत्रातील शिक्षणासाठी मदतीचे आश्‍वासन देऊन करमरकर यांना मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस या संस्थेत दाखल केले. त्यानंतर करमरकरांनी शिल्पकलेसाठीच स्वतःला वाहून घेतले. कलेच्या आस्वादासाठी आणि अभ्यासासाठी त्यांनी फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड या देशांचा प्रवास केला. 1916 ते 1920 या कालावधीत त्यांनी लंडन येथील रॉयल अकादमीत शिक्षण घेतले. 1923 मध्ये ते भारतात आले, त्यावेळी त्यांचे नाव सर्वत्र झाले होते. स्वातंत्र्यलढ्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी त्यांना कोलकत्याला बोलवून घेतले. सुसज्ज स्टुडिओ उभा करुन दिला. तिथे करमरकरांनी रवींद्रनाथ टागोर, चित्तरंजनदास, थोर शास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र रे आदी अनेक नामवंत व्यक्तींचे पुतळे बनवले. याच काळात त्यांनी महात्मा गांधींचा पुतळा बनवला. विशेष म्हणजे महात्मा गांधी त्यासाठी त्यांच्यासमोर बसले होते.
वयाच्या 32 व्या वर्षी म्हणजे 1928 मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचा पहिला अश्‍वारुढ पुतळा तयार केला. त्याचवर्षी तो पुण्यातील श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलटरी स्कूलच्या (एसएसपीएमएस) आवारात बसविण्यात आला. या पुतळ्यामुळे त्यांचे नाव घराघरात पोचले.

त्यानंतर त्यांनी सामान्य व्यक्तींची शिल्पे बनवण्यावर भर दिला. त्यांच्या शिल्पांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी बहुतेक सर्व शिल्पे मॉडेल समोर बसवून केली आहेत. त्यांनी बनवलेल्या "मत्स्यकन्या' या शिल्पाला 1930 मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात बक्षीस मिळाले. आजही हे शिल्प त्यांच्या सासवण्यातील संग्रहालयात आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील हिरा कोळीण या तेरा वर्षाच्या मुलीला समोर उभे करुन त्यांनी ही कलाकृती तयार केली. तिची उभी राहण्याची ऐट, तिच्या टोपलीतील मासे, पायाखाली असलेल्या जाळीची छिद्रे यांसारख्या बारीकसारीक तपशिलाचाही या शिल्पात अंतर्भाव आहे. याच हिरा कोळणीचे 1958 मध्ये त्यांनी पुन्हा शिल्प बनवले. त्यावेळी वयोमानानुसार तिच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, केसाचा अंबाडा अशा गोष्टी त्यांनी बाराकाईने टिपल्या. ही दोन्ही शिल्पे पाहताना तारुण्य आणि वार्धक्‍याचे रुप आपल्याला पाहायला मिळते. कोलकत्याहून परत आल्यानंतर 1934 मध्ये त्यांनी सासवण्यात स्वतः आराखडा तयार करुन ऐसपैस वास्तू उभारली. तळमजल्यावर निवास आणि वरच्या मजल्यावर स्टुडिओ अशी या वास्तूची रचना आहे.

तिथे प्रवेश करतानाच गुडघ्यांना हाताची मिठी मारुन बसलेल्या शिल्पाचे दर्शन घडते. आत्ता उठून, आपल्याला कोण पाहिजे, असे ही व्यक्ती विचारेल की काय, असे वाटण्याइतपत जिवंतपणा या शिल्पात आहे. करमरकरांच्या मोरु नावाच्या विश्‍वासू नोकराचे हे शिल्प आहे. त्याच्यासमोर प्रवासाला निघालेल्या गावाकडच्या तरुणीचे शिल्प आहे. प्रवासाबाबतची अनिश्‍चितता तिच्या चेहऱ्यावर उमटली आहे. पायऱ्या चढताना समोरच आजी आणि नातवाचे "स्वागत' हे शिल्प आहे. ही आजी आपल्या नातवाला नमस्कार करायला शिकवत आहे. कोणत्याही घरात आपल्याला हे दृश्‍य दिसू शकते. त्यामुळेच ही शिल्पे ओळखीची वाटतात. नातवाच्या चेहऱ्यावरील निरासगसता आणि आजीच्या चेहऱ्यावरील कौतुकाचे भाव, मुलाच्या डोक्‍यावरील कुंची, त्यावरील गोंडे आदी तपशील थक्क करणारा आहे.

मुले सशक्त असली पाहिजेत, असे करमरकरांचे मत होते. त्यामुळे मोलकरणीची चार मुले त्यांनी आपल्याच घरी ठेऊन घेतली होती. त्याच्या शिक्षणाची, खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. या चार मुलांचे समूहशिल्प लक्षवेधी आहे. त्यातील मुलींनी पाय हलवले, तर त्यांच्या कपड्यांच्या घड्या बदलतील की काय, असे वाटते. धाकट्या भावंडाला कडेवर घेऊन खेळवणारी आई, तिच्या शेजारी छोटी बहिण, मागे अभ्यासात दंग झालेला भाऊ, असे हे देखणे शिल्प आहे.
वरच्या मजल्यावर जिन्याच्या प्रारंभीच तरण्याबांड युवकाचे शिल्प लक्ष वेधून घेते. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्या नोकराचे हे शिल्प आहे. सयाजीरावांच्या मागणीवरुनच ते बनविण्यात आले होते. त्याच्या चार प्रतिकृती आजही बडोद्यातील गायकवाडांच्या बागेत आहेत. त्या तरुणाचा फेटा, जाकीट, काठी त्यावरील पेरे, त्याच्या कमरेला बांधलेली घुंगरे या सर्वांत एक प्रकारचा रसरसशीतपणा आहे. त्याने पाय हलवला तर घुंगरे वाजतील आणि संग्रहालयातील शांततेचा भंग होईल, असे वाटून जाते. याशिवाय करमरकरांची मदतनीस बायमाय, कुत्रा हिरा, म्हैस यांचीही शिल्पे तिथे आहेत. प्रत्येक शिल्पाची त्यांनी प्रतिकृती बनवली होती. त्या सर्व तिथे पहावयास मिळतात.

ज्येष्ठ नाटककार मामा वरेरकर आणि करमरकरांची घनिष्ठ मैत्री. त्यातून करमरकरांनी त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प बनवले. वरेरकरांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख त्यांना असल्याने त्याचे प्रतिबिंब त्यात पडले. त्यांनी मामांना काटे असलेला कोट घातला आहे. बोलण्यावरुन मामा फटकळ वाटत असले, तरी मनातून फणसासारखे गोड आहेत, असे त्यातून सूचित केले आहे. त्यांच्या कानात मासोळ्या घातल्या आहेत. लोकांच्या कलागती तुम्ही ऐकू नका, असे त्यांना मामांना सुचवायचे असावे.
आयुष्याच्या अखेरपर्यंत करमरकर कामात मग्न होते. 1967 मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला. तो इचलकरंजीत बसवण्यात आला. त्यावेळी त्यांना कर्करोग झाला होता. वेदना होत होत्या. त्याही स्थितीत त्यांनी पुतळा पूर्ण केला. पुढच्याच वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात त्यांच्या कुटुंबीयांनी अन्यत्र असलेल्या शिल्पकृती सासवण्यात आणल्या व कलेचा हा ठेवा नागरिकांना पाहण्यासाठी खुला केला.

-सुहास यादव

1 comment:

मराठीसूची said...

agadi purna mahiti dili aahe tumhi, kharach "अनमोल ठेवा"

Add it to marathisuchi http://www.marathisuchi.com - free marathi link sharing website and marathi blogs aggregator.

Once your website is added to marathisuchi then your posts will be automatically published on marathisuchi.com