OPINIONMAKER

Monday, November 23, 2009

संघाचे "मनोगत'


विश्‍व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धाडसाबाबत विधान करुन एकाच वेळी शिवसेना आणि भाजपला इशारा दिला आहे. शिवसेनाप्रमुखांबाबत इतके धाडसी विधान यापूर्वी कोणत्याच नेत्याने केले नव्हते. शिवसैनिकांकडून यावर कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही. 

 
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वाघाला राज ठाकरे यांनी पुरते घायाळ करुन टाकले. हे पुरेसे नाही म्हणून की काय आता मित्र पक्ष असलेली भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या परिवारातील विश्‍व हिंदू परिषदेनेही शिवसेनेच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा चंग बांधलेला दिसतो आहे. भाजपने शिवसेनेशी युती केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा भाजपचा उल्लेख अवमानकारक पद्धतीने केला. कमळाबाईपासून ते अगदी अलीकडे मेलेल्या पोपटापर्यंत अनेक मानहानीकारक विशेषणांनी भाजपचा उल्लेख करण्यात आला. गेल्या महिन्यात भाजपमध्ये केंद्रीय पातळीवर गटबाजी उफाळून आलेली असताना शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाने त्यात उडी घेऊन भाजप नेतृत्वाची संभावना मेलेला पोपट म्हणून केली. भाजपसाठी हा तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार होता. राजकीय अपरिहार्यता म्हणून तो त्यांनी निमूटपणे सहन केला. अशावेळी मनातून कितीही घुसमट होत असली तरी बाळासाहेब ठाकरे हे आदरणीय नेते आहेत, युतीचे कुटुंबप्रमुख आहेत, अशी प्रतिक्रिया देऊन भाजपच्या नेते नेहमीच सारवासारव करतात. खरे तर हे सगळे किती दिवस सहन करायचे, असा प्रश्‍न भाजप आणि संघ परिवारातील कार्यकर्ते विचारत असतातच. परंतु महाराष्ट्रातील राजकारणात भक्कम स्थान निर्माण करायचे असेल, तर शिवसेनेबरोबर जाण्याशिवाय पर्याय नाही हे भाजपच्या नेत्यांना ठाऊक असल्याने कितीही ताणले तरी युती तुटणार नाही, अशी काळजी भाजपच्या नेतृत्वाने वेळोवेळी घेतली.


आता परिस्थिती बदलली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला शिवसेनेपेक्षा केवळ दोन जागा जास्त मिळाल्याबरोबर भाजपने विरोधी पक्षपदावर दावा केला आणि ते पदरात पाडून घेतले. कोणताही वाद झाला की, युतीमध्ये बाळासाहेबांचा शब्द अंतिम असतो, असे म्हणून आपली निष्ठा बळकट करणारे खासदार मनोहर जोशी आणि संजय राऊत यावेळी काहीही करु शकले नाहीत. कुणीही दुर्बल नसतो, प्रत्येक जण संधीची वाट पहात असतो हा धडा भाजपने 1991 मध्येच शिवसेनेला दिला होता. त्यावेळी 17 आमदरांना सोबत घेऊन छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडून कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. शिवसेनेचे संख्याबळ कमी झाल्याने लगेचच गोपीनाथ मुंडे यांनी शिताफीने विरोधी पक्षनेतेपद पटकावले होते. 18 वर्षानंतर पुन्हा एकदा युतीमध्ये भाजप वरचढ ठरल्याने कोणतीही कुरकुर न करता शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपदावर पाणी सोडावे लागले. शिवसेनेपेक्षा फक्त दोनच जागा जास्त मिळाल्या बरोबर भाजपच्या महाराष्ट्र शाखेचे मुखपत्र असलेल्या पाक्षिक "मनोगत'मध्ये शिवसेनेच्या ताकदीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारा लेख प्रकाशित झाला. घायाळ झालेल्या वाघाच्या शक्तीबाबत मेलेला पोपट बोलू लागला. ही भाजपची चाचपणी होती. वाघाला आपण किती टोचू शकतो याचा अंदाज पोपटाला घ्यायचा होता. त्यात भाजपला यश आले. शांत राहायचे, प्रसंगी पडते घ्यायचे, अपमान गिळायचा आणि वेळ येताच न बोलता अचूक शिकार साधायची हे भाजपचे धोरण आहे. भाजपला शिवसेनेबरोबर निवडणुका लढवायच्या असल्याने त्यांना ही मुत्सद्देगिरी दाखवावीच लागते. विश्‍व हिंदू परिषदेचे तसे नाही. ती स्वतंत्र संघटना आहे. हिंदू हिताचा विचार हे त्यांचे धोरण आहे. उलट शिवसेना मात्र हिंदुत्व की मराठीचा मुद्दा यात अडकलेली दिसते. या दोन्ही गोष्टींची सरमिसळ करण्याचा शिवसेना नेत्यांचा प्रयत्न असतो. अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्‍व हिंदू परिषदेला अशी सरमिसळ बिलकुल मान्य होणार नाही. मराठीच्या मुद्‌द्‌यावर सरसंघचालकांनी राज ठाकरे यांनाही कानपिचक्‍या दिल्या आहेत.

मुंबईतील मराठी माणसाला वाटणारी असुरक्षितता हे शिवसेनेचे खरे भांडवल. भाजपच्या बरोबर जाताना मराठीच्या या मूळ भांडवलाकडे शिवसेनेचे दुर्लक्ष झाले. तेच भांडवल आता राज ठाकरे यांनी पळवून नेले. त्याचबरोबर शिवसेनेला पर्याय निर्माण झाल्याचे मराठी माणसाच्या लक्षात आले. शिवसेनेला केवळ हिंदुत्वाच्या मुद्‌द्‌यावर संघटना बळकट करता येणार नाही आणि मराठीचा मुद्दा आक्रमकपणे मांडला तर संघपरिवार दूर जाणार हे स्पष्ट आहे. त्यामुळेच विश्‍व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी थेट शिवसेनाप्रमुखांच्या धाडसाविषयी प्रश्‍न उपस्थित केला आहे. धाडस असते तर बाळासाहेब ठाकरे बाबरी मशीद पाडण्यासाठी स्वतः अयोध्येला आले असते, असे शिवसेनेला जिव्हारी लागणारे विधान त्यांनी नागपूर मुक्कामी केले. एका अर्थाने हा संघ परिवाराचा शिवसेनेला इशाराच आहे. हिंदुत्वाच्या म्यानात मराठीची तलवार घालून लढाईला उतरणे संघ परिवार कधीच मान्य करणार नाही. संघ परिवारातील भाजपला सत्तेच्या राजकारणासाठी हे काही काळ मान्य करावे लागले. परंतु राष्ट्रीय पातळीवर राजकारण करताना मराठीच्या मुद्दा भाजपला नेहमीच अडचणीचा ठरणार हे पक्षाच्या नेत्यांना माहित आहे. आता शिवसेनेला कमी जागा मिळाल्यामुळे आणि त्यांच्यासमोर "मनसे'चे आव्हान उभे राहिले असल्याने संघ परिवार "मनोगत' बोलून दाखवू लागला आहे एवढेच.

- सुहास यादव
--------------------------------------

1 comment:

मनातल्या मनात ... said...

राडा करू !

हल्ला बोल हल्ला बोल,
भिजलेल्या चामडीचा आवळू ढोल,
हल्ला बोल, हल्ला बोल.

इंजिन वापरतंय आमचे रूळ,
बघता बघता खाल्ली धूळ.
चाळीशीच्या मेहनतीवर फिरवला बोळा,
आमच्या बाईवर यांचा डोळा.

मराठीच्या मायला विचारतो कोण ?
आमाला भरायचं सत्तेचा द्रोण.
फोडली डरकाळी, घाबरा सगळे,
नमनाला सापडला बोल बच्चन वागळे.

गंज काढा नखांचा, सुरु करा राडा,
फोडणीला वापरा धोताऱ्याचा काढा.
सापांना डोलवा, वाजवा पुंगी,
आठवा मुंबईतली भिजलेली लुंगी.

पाठीवरनं आमच्या खंजीर फिरलाय,
नन्नाचा पाढा पुन्ना गिरवलाय
अपमानाची चढलीय दारू,
राडा करू, आता फक्त राडा करू !

सुधीर मुतालिक