OPINIONMAKER

Wednesday, January 26, 2011

माणूस श्रेष्ठ


आपण श्रेष्ठ आहोत तर मग आपल्याला मान-सन्मान का मिळत नाही? मान राहू द्या, उलट संधी मिळेल तेव्हा टिंगलटवाळी आणि चेष्टा का केली जाते, असे प्रश्‍न इथल्या ब्राह्मणांना पडले आहेत. सामाजिक एकजिनसीपणाच्या दृष्टीने विचार केला तर इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आपले श्रेष्ठत्व कसे बाजूला ठेवायचे आणि इतर जातींना विश्‍वासात कसे घ्यायचे हा खरा प्रश्‍न आहे.
----
गेल्या काही वर्षांत ब्राह्मणांची संमेलने आवर्जून आयोजित करण्यात येत आहेत. त्यांना प्रतिसादही मिळतो आहे. जातींची संमेलने घेण्याला कुणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु, आपण सर्वश्रेष्ठ आहोत असे ब्राह्मण आपल्या प्रत्येक पिढीला सांगत आले आहेत. आजही हे ठामपणे सांगितले जाते. ज्ञान आणि बुद्धीमत्तेबाबत आपण इतरांपेक्षा श्रेष्ठच आहोत, अशी स्थिती असताना मग असे काय घडले आहे किंवा घडत आहे की संमेलने घ्यावी लागत आहेत आणि आपले प्रश्‍न, व्यथा मांडाव्यात, असे वाटू लागले आहे?




वेद-पुराणे, धर्मशास्त्र यावर आजही ब्राह्मणांच्या ताब्यात आहेत. हिंदुंमधील कुठल्याही जातीला हे (वेद-पुराणे, धर्मशास्त्रातील नियम-आचरण-शिक्षा) आपले वाटत नाही. ह्याची आपण माहिती घ्यावी, आचरणात आणावे, असे वाटत नाही. दुसरीकडे आज जे काही थोडे ब्राह्मण याचा अभ्यास करुन तसे जीवन जगतात त्यांनाही ही माहिती हा ठेवा इतर जातींना द्यावा, असे वाटत नाही. वेदपाठशाळा, शंकराचार्यांचे मठ, अशा ठिकाणी शिकण्यासाठी किंवा अशा संस्थांवर संचालक किंवा विश्‍वस्त म्हणून अन्य जातींमधील किती लोकांना प्रवेश दिला जातो? अनेकदा सरकारी अनुदान घेतले तर कदाचित मागासवर्गीयांना आपल्या संस्थेच्या मंडळात समाविष्ट करुन घ्यावे लागेल म्हणून "अनुदान नको', अशी भूमिका घेतली जाते. आम्हांला सरकारी मदतीची गरज नाही, असे यावर सांगितले जाईल. मग नका घेऊ सरकारी मदत पण तुमच्यात अन्य जातींना प्रवेश देणार का, असा प्रश्‍न आहे.

आता त्याचवेळी वाढते नागरीकरण, स्पर्धात्मक बाजारपेठ, जगण्यासाठीची रोजची जीवघेणी धावपळ यामुळे सर्वसामान्य ब्राह्मणांना देखील याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. नव्या पिढीतील अनेकांना पंरपरा, आपला अभिमानास्पद प्राचीन वारसा याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पण मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात हे आपले आहे, असे सर्वसामान्य ब्राह्मणाला वाटत असते. इतर कुठल्याही जातीला असा वारसा जपण्यासाठी धडपड करावी लागत नाही. मग आता ह्या आपल्या वारश्‍याचे काय करायचे, ते आचरणात कसे आणायचे आणि रोजच्या जगण्याशी त्याची कशी सांगड घालायची, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या सगळ्याशी हिंदूंमधील सगळ्या जातींना कसे जोडायचे हा तर मोठाच प्रश्‍न आहे।

वेद-पुराणे आणि इतर धर्मशास्त्रे इतर जातींसाठी कधीच खुली नव्हती. त्यामुळे ब्रिटीशांच्या आगमनानंतर सुरु झालेल्या शाळा, विद्यापीठे, महाविद्यालयांमधून सर्वच जातीधर्मांसाठी ज्ञान खुले झाले. ते ज्ञान हिंदुधर्मशास्त्राचे नव्हते. महात्मा फुल्यांनी त्याचे महत्त्व ओळखले आणि शिकण्यासाठी अन्य जातींना प्रवृत्त करण्याचे, त्यांना शिक्षण देण्याचे कार्य हाती घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर "शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा' असा संदेशच दिला।

स्वातंत्र्यासाठी लढा चालू असताना आणि ते मिळाल्यानंतर अनेक समाजसुधारकांनी सर्वांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून आयुष्यभर निरपेक्षपणे कार्य केले. मग वर्षानुवर्षे ज्ञान घेण्याची संधी नाकारल्या गेलेल्या जातींमध्ये वेगाने शिक्षणाचा प्रसार झाला. सर्व प्राणीमात्रांमध्ये माणूस सर्वश्रेष्ठ आहे, कारण त्याला बुद्धीची अनमोल देणगी लाभलेली आहे याचा साक्षात्कार सगळ्या जातींना झाला. विशिष्ट जातीत जन्माला आला म्हणून कुणी श्रेष्ठ नसतो याचे भान त्याला आले. मग तो समतेची भाषा बोलू लागला. प्रश्‍न विचारु लागला.
इथे ब्राह्मणांच्या मानसिकतेचे आणि संमेलनांचे मूळ आहे. वेद-पुराणे, धर्मशास्त्र हे सगळे आपले आहे तर आपण ते कुणी सांभाळायचे? आचरणात कुणी व कसे आणायचे? शेंडी, जानवे ही ब्राह्मण असल्याची प्रतिके आहेत तर मग ती अंगावर अभिमानाने बाळगायची का? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण सर्वश्रेष्ठ आहोत तर मग आपल्याला सगळे मानसन्मान का देत नाहीत, या मानसिकतचे काय करायचे? मान द्यायचे राहू द्यात उलट टिंगलटवाळी, निराधार आरोप आपल्यावर का होत आहेत असा प्रश्‍न पडला आहे. त्याचबरोबर इथल्या जातीव्यवस्थेतेमुळे आमच्या पूर्वजांकडून अन्य जातींवर कदाचित अत्याचार झाले असतील त्याची शिक्षा आम्हांला का, असे प्रश्‍न ब्राह्मणांच्या मनात आहेत. त्यामुळे संमेलनांमध्ये शिक्षण, उद्योग अशा अन्य विषयांवर चर्चा होत असली तर खदखद आहे ती सन्मानाची.
मग सन्मान मिळवायचा कसा? सन्मान मिळतो तो त्यागी वृत्तीमुळे. मग सन्मान हवा असेल तर काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. त्यासाठी माणूस श्रेष्ठ, असा व्यवहार झाला पाहिजे. श्रेष्ठ माणसाच्या गळ्यात थुंकण्यासाठी गाडगे आणि तो चालत गेल्यावर रस्ता खराब होणार म्हणून त्याच्यामागे झाडू बांधल्यावर त्याला काय वाटले, असेल याचा विचार आपण कधी करतो का? पिढ्यानपिढ्या असा अपमान सहन केलेल्यांना आपण जवळ घेणार का? विचार करा सध्या आपल्यावर निराधार आरोप केले जातात म्हणून प्रचंड अस्वस्थता वाटते तर, मग हजारो वर्षे अपमानित स्थितीत जगणाऱ्यांच्या मनात महप्रचंड ज्वालामुखीच असला पाहिजे. तो बाहेर पडला तर...

दुसरा प्रश्‍न आमच्या पूर्वजांनी केलेल्या वर्तनाची शिक्षा आम्हांला का? एक लक्षात घेतले पाहिजे की पूर्वजांचा वारसा घेतला की त्यातील चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी येणार. पुराणे-वेद, मंत्र, कथित श्रेष्ठत्व हा पिढ्यानपिढ्या आलेला वारसा आपला समजत असू तर अन्य जातींशी आपल्या पूर्वजांनी केलेल्या व्यवहाराची जबाबदारी आपल्याला टाळता येणार नाही. त्यामुळेच एकजिनसी समाजाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सन्मान हवा असेल तर, जातीच्या श्रेष्ठत्वाची जी कल्पना आहे ती मनातून बाजूला काढावी लागेल. सध्या शहरीकरणाच्या रेट्यामुळे अपरिहार्यता म्हणून वरवर ती बाजूला ठेवली गेल्याचे दिसते. थोडक्‍यात आपण इतर जातींशी स्वतःला कसे जोडून घेणार याचा विचार करुन त्यासाठी एक पाऊल खाली उतरण्याची तयारी असेल तरच काही विधायक घडण्याची स्वप्ने पाहता येतील.

-सुहास यादव

28 Feb 2008 रोजी लिहिलेला लेख. ब्लॉगवर प्रकाशित करत आहे.
----------------------

No comments: