OPINIONMAKER

Tuesday, June 16, 2009

मा. गो. वैद्यांचे काठावरचे चिंतन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे हिंदूचे बलशाली संघटन असते, मोठ्या प्रमाणावर मते फिरवण्याची ताकद असती तर भाजपच काय कॉंग्रेसवालेही रेशीमबागेत गुडघ्यावर चालत असते. भाजपला केंद्रात सत्ता मिळवून देण्याची ताकद संघाकडे असती तर भाजपचे झाडून सगळे नेते पहाटे उठून रोज प्रभात शाखेत उपस्थित राहिले असते. सध्या भाजप पराभूत मनस्थितीत आहे. पराभूत व्यक्ती, संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांची नेहमीच टर उडवली जाते. त्यांना उपदेशाचे, उपहासाचे डोस पाजले जातात. रा. स्व. संघाचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि ज्येष्ठ पत्रकार मा. गो. वैद्य सध्या त्याच भूमिकेत आहेत. ते काहीही म्हणाले तरी, शेवटी सत्तेत येण्यासाठी सर्व जातीधर्मांना बरोबर घेण्याचे समीकरण कसे बांधायचे याचा विचार भाजपलाच करावा लागणार आहे


---------------------------------------------------------------
लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे भारतीय जनता पक्षात सुरु असलेल्या सुंदोपसुंदीमध्ये ज्येष्ठ पत्रकार मा. गो. वैद्य यांच्या रुपाने आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उडी घेतली आहे. संघाचे एक वैशिष्ट्य म्हणजे एखादे पिल्लू सोडून द्यायचे आणि मग ते इतरांच्या पायात पाय घालत काय उपद्‌व्याप करत आहे याची गंमत पाहत बसायचे. संघाने म्हणजेच वैद्यांनी भाजपला हिंदुत्व सोडून देण्याचा उपहासात्मक सल्ला दिला आहे. राजकीय सत्तेवर अंकुश ठेवण्याचे काम कोणत्याही मनुष्यप्राण्याला आवडणारे. त्यामुळे संघ परिवाराने जन्माला घातलेला पक्ष म्हणून (म्हणजे प्रथम जनसंघ आणि नंतरचे त्याचे स्वरुप म्हणजे भारतीय जनता पक्ष) भाजपवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्याचा संघाने नेहमीच प्रयत्न केला आहे. अर्थात अनेकदा अडचणीच्या वेळी भाजप हा स्वतंत्र राजकीय पक्ष असल्याचे सांगून स्वतःची सुटकाही करुन घेतलेली आहे. अशा पक्षावरील संघाचे नियंत्रण आता पूर्णतः सुटलेले आहे. याला कारणीभूत भाजप नसून संघ आणि त्याचे नेतृत्त्वच आहे. भाजप हा एक राजकीय पक्ष आहे. निवडणुका जिंकणे आणि सत्ता मिळवणे हे त्यांचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना लोकांसमोर जावे लागते. त्यासाठी लोकांच्या अपेक्षा, इच्छा-आकांक्षा याचा विचार करावा लागतो आणि त्यानुसार आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रश्‍नावर वेळोवेळी भूमिका घ्याव्या लागतात. प्रसंगानुसार या भूमिकांमध्ये बदलही करावे लागते. विविध जाती-धर्माच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्यांच्या गुणदोषांसहित बरोबर घेऊन जावे लागते. इथल्या जनमानसाच्या भावना समजावून घेऊन लोकांना सामोरे जाण्याची वेळ संघावर कधीच येत नाही.


करुनसवरुन नामानिराळे राहण्याची कार्यपद्धती संघाने मोठ्या चतुराईने साधली आहे. परिवारातील संघटनांमार्फत सगळे घडवून तर आणायचे पण, चूक झाल्यावर विश्‍व हिंदू परिषद स्वतंत्र संघटना आहे, भाजप स्वतंत्र पक्ष आहे म्हणून जबाबदारी टाळण्याची अशी भूमिका संघ नेहमीच घेत आला आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर, हिंदुंच्या भावनांना हात घालून अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी गावागावातून विटा नेण्याचा कार्यक्रम यांनी राबवला. बाबरी मशीद पाडली. नंतरच्या काळात राममंदिर कधी बांधणार, या हिंदूंच्या प्रश्‍नाला उत्तर देण्याची जबाबदारी संघाने टाळली. मग रामसेतूच्या मुद्याकडे लोकांनी ढुंकनही पाहिले नाही.

संघाकडे दूरदृष्टीचा अभाव
हिंदुच्या दृष्टीने सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बाबरी मशीद पाडण्याची कृती करण्यापूर्वी त्याचे देशभरातून, जगातून, मुस्लिम समाजातून काय प्रतिक्रिया येऊ शकतात, त्याचा येथील सर्वसामान्य हिंदू समाजावर किती विपरित परिणाम होऊ शकते याचा दूरगामी विचार संघाच्या नेत्यांनी केला नव्हता हे आता स्पष्ट होत आहे. बाबरी मशीद पाडण्याची कृती अतिशय नियोजनबद्ध होती. त्यासाठी धार्मिक उन्माद टप्प्याटप्प्याने वाढवत नेऊन अंतिमतः सर्वकाही उत्स्फूर्तपणे घडले आहे, असे दाखवण्याचे नियोजन होते हे कळण्यसाठी आता कोणत्याही चौकशी अहवालाची गरज नाही. बाबरी मशीद पाडल्यानंतर, मुंबईत झालेले स्फोट, दंगली, गोध्रा प्रकरण, त्यांनतर गुजरातमध्ये झालेले दंगे आणि अमानुष अत्याचार याचा अंदाज संघाच्या नेत्यांना नव्हता हे उघड आहे. "होय, शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडली', असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ठणकावून सांगत असताना वैद्य आणि सिंघल मंडळी मूग गिळून गप्प बसली होती. होय आम्हीच बाबरी मशीद पाडली, असे यांनी कधीच सांगितले नाही. कदाचित थेट असे सांगण्यातील फायद्या-तोट्याचा विचार त्यांनी केला असावा. हिंदुत्व धरायचे की सोडायचे याचे सल्ले देणे सोपे असते. पण 80 वर्षांच्या कार्यानंतर संघाला देशभरात किती टक्के हिंदूंचा पाठिंबा आहे याचा अंदाज घेण्याचीही संघाला गरज वाटत नाही. देशभरातील बहुसंख्य हिंदू आजही सकाळी पूजाअर्चा करतात, गंध लावतात, मंदिरात जातात, धार्मिक कार्ये करतात. या हिंदूंना आजही संघ ही आपली संघटना वाटत नाही. महाराष्ट्रात आणि देशातही मोठ्या वर्गाच्या मनात आजही संघाबद्दल अढी आहे. अनेकदा डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधींची यांनी संघाचे नेते बौद्धिकाच्या कार्यक्रमातून देत असतात. गांधीजींनी संघाच्या कुठल्या कार्यक्रमाला कशी भेट दिली होती आणि कसे कौतुक केले होते हे स
ांगितले जाते. डॉ. आंबेडकरांबाबतही अशाच गोष्टी सांगितल्या जातात. पण त्यामुळे मागासवर्गीय, दलित यांच्या मनात संघाविषयी ममत्व निर्माण होत नाही. अशी उदाहरणे सांगून अन्य जातींमध्ये विश्‍वास निर्माण करता येत नाही, याची जाणिव संघाला नाही. ते त्यांच्या कोशात मशगूल आहेत. जे काही दलित, मागासवर्गीय कार्यकर्ते संघाचे म्हणून समाजासमोर उभे केले जातात, त्यातील कुणाचाच त्यांच्या जातीवर अजिबात प्रभाव नसतो. किंबहुना हे दलित, मागासवर्गीय, बहुजन समाजातील कार्यकर्ते त्यांच्या समाजापासून तुटलेले असतात.

संघाचा हिंदूंवर प्रभाव किती?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सुमारे 80 वर्षांच्या कार्यानंतर संघ हिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजाला आपलेसे करु शकलेला नाही. या समाजावर आपला निर्णायक प्रभाव निर्माण करु शकलेला नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे संघाचे सांगण्याचे तत्वज्ञान आणि स्वयंसेवकांचा व्यवहार यातील टोकाची तफावत. संघ परिवारातील कार्यकर्ते सहज बोलताना, एखाद्याची ओळख करुन देताना असे म्हणतात की, "परिवारातला आहे, आपलाच आहे.' म्हणजे परिवारतले तेवढे आपले हिंदू आणि बाहेरचे ते वेगळे. इथूनच भेदाला सुरवात होते. परिवाराच्या आजूबाजूच्या वर्तुळात वावरणाऱ्या हिंदूंना हे पदोपदी जाणवत असते, हा भेद त्याच्या लक्षात येत असतो. आपण यांच्यातील नाही, असे त्याच्या मनात कुठेतरी बिंबत असते. पुन्हा मुस्लिम किंवा ख्रिश्‍चनांचा द्वेष करुन त्यांच्या विरोधात कारवाया करुन माझे रोजच्या जगण्यातील प्रश्‍न कसे सुटणार आहेत, याचाही विचार सर्वसामान्य हिंदू करु लागला आहे. सगळ्या मुस्लिमांना अतिरेकी ठरवून आणि ख्रिश्‍चनांच्या कथित धर्मांतरांच्या कारवायांची भीती घालून तो भाजपला मतदान करणार नाही.

टर उडवण्याची भूमिका?
थोडक्‍यात काय तर संघाने हिंदूंची बलशाली संघटना उभी केली असती, मतपेढी बांधली असती तर भाजपच काय कॉंग्रेसवाले देखील मतांची भीक मागण्यासाठी रेशीमबागेत गुडघ्यावर चालत आले असते. ज्याच्याकडे ताकद त्याच्यापुढे मान तुकवायची हा निसर्गाचा नियम आहे. संघ आणि हिंदुत्वाच्या नावावर या देशात बहुमत मिळेल, असा विश्‍वास भाजपला वाटत नाही आणि तो रास्त आहे. उत्तर प्रदेश, ओरिसा, पश्‍चिम बंगाल, आसाम, पंजाब, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ अशा प्रमुख राज्यांमध्ये आज संघाचे हिंदू कार्ड चालत नाही. किंबहुना हिंदू कार्डामुळे या राज्यांमधील अनेक मित्रपक्ष भाजपला गमवावे लागले आहेत. पंजाबमध्ये अकाली दलामुळे आणि महाराष्ट्रात शिवसेनेच्या पाठिशी असलेल्या बहुजन समाजाची ताकद उपयोगाला येत असल्याने या राज्यात भाजपचा प्रभाव आहे. या पक्षांनी झिडकारले तर या दोन राज्यातही भाजपची ताकद क्षीण होईल.
असे असले देशातील लोकशाही व्यवस्थेत आज भाजपचे स्थान महत्त्वाचे आहे. लोकशाहीत कोणताही एक पक्ष ताकदवान होणे धोक्‍याचे असते. त्यामुळे कॉंग्रेसवर अंकुश ठेवण्यासाठी भाजपही तेवढाच ताकदवान असला पाहिजे. त्यामुळे भाजप सध्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत असला तरी तो भविष्यात सत्ताधारी होऊ शकतो. त्यासाठी त्याला सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका ठेवावी लागेल. केवळ हिंदुत्वाच्या मागे लागून चालणार नाही. कारण रोज कर्मकांड आणि पूजाअर्चा करणारा हिंदू अन्य धर्मियांचा द्वेष करत नाही. पराभूत व्यक्तीची, संघटनेची, पक्षाची कुणीही टर उडवत असते. ज्येष्ठ पत्रकार मा. गो. वैद्य सध्या त्याच भूमिकेत आहेत. त्यांना काही निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे नाही आणि लोकांनाही सामोरे जायचे नाही. त्यामुळे ते त्यांचे काम करणार. सत्तेत येण्यासाठी जातीधर्माच्या राजकारणाची मोट कशी बांधायची, काय भूमिका घ्यायची हे भाजपलाच ठरवावे लागेल.

-सुहास यादव
-------------------------------------------------------------------------------

2 comments:

विजयसिंह होलम said...

सुहासजी,
मा.गों.चे हे मत म्हणजे वैयक्तिक मत आहे, असा खुलासा संघाकडून आता केला जाईल. आपण म्हणता तसे त्यांचे हे काठावरचे चिंतन असले तरी त्याची सुरवात जुनीच आहे. यापूर्वीही संघाच्याच लोकांकडून असा विचार मांडला गेल्याचे उदाहरणे आहेत. संघाचा पाया कट्टर हिंदुत्त्व असा दिसत असला तरी त्या माध्यमातून राजकीय सूत्रे आपल्या हाती ठेवायची हा त्यांचा जुनाच "अजेंडा' आहे. म्हणूनच भाजपमधील बरेच बदल संघाने कुरकुर करीत का होईना स्वीकारले. भाजप म्हणजे संघाच्या मुशीत तयार झालेल्यांचा पक्ष, संघाची राजकीय आघाडीच असे जे स्वरुप होते ते केव्हाच संपले आहे. सध्या तर पक्षात बाहेरून आलेल्यांची म्हणजे संघ शाखेत कधीही न गेलेल्यांची किंबहुना संघ काय आहे हे ठावूक नसलेल्यांची संख्याही मोठी आहे. 1999 मध्ये पक्षाला मिळालेली सत्ता ही सुद्धा अनेक तडजोडी करून मिळालेली होती.
आज वैद्य जे विचार मांडत आहे, त्या मागेही असेच काहीसे गणित दिसते. भविष्यात कोणत्याही एका पक्षाचे सरकार येणे तसे कठीण. शिवाय ज्या हिंदुच्या आधारावर संघ आणि भाजपची वाटचाल चालू आहे, त्या धर्मातही जातीय भिंती आणखी मजबूत होऊन समाजिक विघटन झालेले आहे. त्यामुळे एखाद्या मुद्यावर या सर्व जातींना हिंदुत्त्वाच्या झेंड्याखाली आणणे तसे अवघड काम बनले आहे. दुसऱ्या बाजूला संघाची वाटचाल कट्टर हिंदुचा बुद्धीभेद करण्यावर अवलंबून असते. वाढता शिक्षण प्रसार, विचारांचे अदानप्रदान वाढल्याने हे काम आता अवघड बनले आहे. त्यामुळे संघालाही बदलावे लागणार हे खरेच आहे. पण हा बदल लोकांच्या पचनी पडावा, यासाठी अशा चिंतनाचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे वैद्य यांचे चिंतन काठावरचे वाटत असले तरी ते ओठावरचे निश्‍चित नाही. संघाच्या पोटात वेगळे काही तरी सुरू असल्याचे हे द्योतक वाटते.

prajkta said...

suhasji...lekh bhannatch. manapasun aawdla.