OPINIONMAKER

Tuesday, March 17, 2009

ताकद राष्ट्रवादीची आणि सुभेदारांची


पश्‍चिम महाराष्ट्र म्हणजे नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर हे सहा जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची जबरदस्त ताकद असल्याचे सांगितले जाते. या पक्षाच्या लोकप्रतिनिधींची संख्या त्यांच्या ताब्यात असलेल्या संस्था, साखर कारखाने हे सगळे लक्षात घेतले तर पक्षाचे या भागात निर्विवाद वर्चस्व असल्याचे स्पष्ट होते. या पाच जिल्ह्यातील बारापैकी कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, कऱ्हाड, बारामती, नगर (दक्षिण) येथून मागील वेळी पक्षाचे खासदार निवडून आले होते. त्याखेरीज पंढरपूर (राखीव) मतदारसंघातून पक्षाच्या पाठिंब्यावर रामदास आठवले निवडून आले होते. उर्वरीत चार जागांपैकी दोन कॉंग्रेसला (सांगली व पुणे) आणि प्रत्येकी एक भारतीय जनता पक्षा (सोलापूर) व शिवसेनेला (खेड, जि. पुणे) मिळाली होती.

पंजा, घड्याळ कशाला? कोंबडाही चालेल...

गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद खूपच वाढल्याचे त्या पक्षाचे नेते सांगतात. लोकसभा निवडणुकीसाठी कुठे आहे ती ताकद असा विचार केला तर लक्षात येते की पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर अडचणीच्या काळातही ठामपणे उभे राहिलेले कोल्हापूरचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी पवारांच्या विरोधात आवाज टाकलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद असली तरी राष्ट्रवादीचे बहुतेक नेते आपली स्वतंत्र जहागिरी असल्याप्रमाणे वागत असतात. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी आपला मतदारसंघ घट्ट बांधलेला असतो. साखर कारखाना, दूध सोसायटी, बाजार समिती, पंचायत समिती या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांचा संच उभा केलेला असतो. मग विधानसभा निवडणुकीसाठी कुठल्याही पक्षाचे चिन्ह किंवा अगदी कोंबडा चिन्ह म्हणून मिळाले तरी निवडून यायची व्यवस्था त्यांनी केलेली असते. पंजा काय आणि घड्याळ काय त्यांना काही फरक पडत नसतो. याचे ठळक उदाहरण म्हणजे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील. अगदी विधानसभा निवडणुकीत कमळ-धनुष्यबाण निवडून आले तरी यापुढील काळात हर्षवर्धन यांचे मंत्रिपद कायम असणार आहे. राज्यात सरकार कुठल्याही पक्षाचे आले तरी आपले मंत्रिपद कायम ठेवण्याची ही आश्‍चर्यकारक किमया आजपर्यंत कुणालाच साधली नव्हती.

सुभेदारांची संस्थाने
अशी समांतर यंत्रणा उभे करणारे नेते पक्षनेतृत्चाला कधीच भीक घालत नाहीत. मग त्यांना कधी चुचकारुन तर कधी त्यांच्या संस्थांना मदत देण्याचे आश्‍वासन देऊन नियंत्रणात ठेवावे लागते. बहुतेक वेळा या नेत्यांना कारखान्याचा गळीत हंगाम सुरु करण्यासाठी राज्य सहकारी बॅंकेकडून उचल किंवा कर्ज हवे असते. ही बॅंक पवारांच्या ताब्यात. मग तिथे गेल्यावर बरोबर या नेत्यांचे नाक दाबले जाते. बहुतेक नेतेमंडळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये या दबावामुळेच दाखल झाली आहेत आणि टिकून आहेत. कारण पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांचा साखर कारखान्यात प्राण असतो. तिथली कुमक थांबली की त्यांच्या आवाजच बंद होणार असतो. अगदी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाली तेव्हा विजयसिंह मोहिते-पाटील, अभयसिंहराजे भोसले हे नेते काही आनंदाने किंवा पवारांवरील प्रेमापोटी, आदरापोटी पक्षात आले नाहीत. अभयसिंहराजे तर पक्षाच्या स्थापनेनंतर दीड महिन्याने पक्षात दाखल झाले. थोडक्‍यात काय तर पवारसाहेबांच्या हातात यांच्या आर्थिक नाड्या असल्यामुळे हे नेते पक्षात आले. याउलट काही नेत्यांनी कारखान्याबरोबरच दूध संघ, शिक्षणसंस्थांमार्फत कार्यकर्त्यांचे जाळे उभारले होते. त्यांना पवारांशी काहीच देणेघेणे नव्हते. उलट पवार कॉंग्रेसमध्ये असताना त्यातील बहुसंख्य पवारांचे विरोधकच होते.

यावरुन लक्षात येते की पश्‍चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीची ताकद म्हणजे या सुभेदारांची ताकद आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येकजण मी म्हणजेच पक्ष असे म्हणून आवाज टाकू लागला आहे. कोल्हापूर, सातारा हे राष्ट्रवादीचे बालेकिल्ले म्हणता म्हणता तेथील तटबंदी फारच भुसभुशीत असल्याचे उघड होऊ लागले आहे. अर्थात पवारांनी जाणूनबुजूनच ती भुसभुशीत ठेवली असे म्हणायला वाव आहे. त्यांनी कधीच निर्णायक हस्तक्षेप करुन कोल्हापूरमधील खासदार मंडलिक आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील गटबाजी रोखली नाही. उलट गेल्यावेळी शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढवलेले धनंजय महाडिक यांना एक वर्षापूर्वी पक्षात आणून पक्षातील ताकदवान सुभेदारांसमोर पर्याय उभा करण्याचे राजकारण केले. आता तर पवारांनी उमेदवारी दिली काय किंवा नाही दिली तरी निवडणूक लढवणार असल्याचे महाडिक यांनी जाहीर करुन टाकले आहे. त्याचबरोबर त्यांना उमेदवारी न मिळाल्यास शेजारच्या हातकणंगले मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या उमेदवावर धोक्‍यात येऊ शकतो, असे सूचित केले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीतील एका गटाशी प्रत्येक निवडणुकीत समझोता करुन त्या पक्षाची ताकद खिळखिळी करणारे जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांनाही कधी पवारांनी आवर घालण्याचे प्रयत्न केले नाहीत. आता राष्ट्रवादीने महाडिक यांना उमेदवारी दिल्यास विरोधात जाण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. तिकडे कोल्हापूरच्या राजघराण्यातील संभाजीराजे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्ह्यात ताकद असतानाही या सुभेदारांना आवरण्यासाठी पवार कोणते डाव टाकतात आणि त्यात त्यांना कितपत यश येते यावरच कोल्हापूर आणि हातकणंगल्यात राष्ट्रवादीचे यश अवलंबून आहे. अन्यथा कुठले सुभेदार आपल्या वैयक्तिक राजकारणासाठी एकत्र येतील आणि कुणाच्या मागे ताकद उभी करतील तोच उमेदवार विजयी होणार आहे.

साताऱ्यातील भ्रम
साताऱ्याची कथा तर खूपच रंजक आहे. इथे दोन्ही खासदार राष्ट्रवादीचे. लक्ष्मणराव पाटील (सातारा) आणि श्रीनिवास पाटील (कऱ्हाड). त्यातील श्रीनिवास पाटील यांचा मतदारसंघ फेररचनेत संपुष्टात आला आहे. ते साताऱ्यातून लढण्याच्या तयारीत होते. पण दोघांचेही सगळे काही म्हणजे सगळेच पवारांवर अवलंबून. गेल्या दहा वर्षात दोघांनी साताऱ्याच्या औद्योगिक विकासासाठी आणि तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न केले हा संशोधनाचा विषय. हे दोन खासदार आणि फलटण, माण, कोरेगाव, सातारा, जावळी, कऱ्हाड (उत्तर) असे सहा आमदार एवढी लोकप्रतिनिधींची फौज पक्षाकडे आहे. त्याबरोबरच जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, बहुतेक पंचायत समित्या पक्षाच्या ताब्यात आहेत. असे असताना उदयनराजे भोसले यांनी पक्षासमोर जबरदस्त आव्हान उभे केले आहे. उदयनराजेंच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे किंवा विचार आहे म्हणून त्यांनी आव्हान उभे केले आहे, असे नव्हे तर हा धोका न ओळखता राष्ट्रवादीचे नेतृत्त्व भ्रमात राहिल्यामुळे आता साताऱ्यात तगडा उमेदवार कोण यासाठी शोधाशोध करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
शरद पवारांनी निवडणुकीसाठी प्रथम शिरुर लोकसभा मतदारसंघाला प्राधान्य देऊन नंतर ते माढ्याकडे वळल्यामुळे आता शिरुरमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. आता जलसंपदामंत्री अजित पवार, अर्थमंत्री दिलीप वळसे-पाटील हे राष्ट्रवादीच्या उमेदवारामागे कशी ताकद उभी करतात यावरच पक्षाचे यश अवलंबून आहे. सध्याच्या स्थितीत तर आढळराव बाजी मारतील अशी चिन्हे आहेत. मावळ मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाने मनापासून मदत केली तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय निश्‍चित आहे.

आठवलेंचे लोढणे कॉंग्रेसच्या गळ्यात
नगर जिल्ह्यातील नगर (उत्तर) हा मतदारसंघ नव्या रचनेत शिर्डी नावाने राखीव झाला आहे. हा मूळचा कॉंग्रेसचा मतदारसंघ. खासदार बाळासाहेब विखे-पाटील यांचा बालेकिल्ला. विखे हे पवारांचे परंपरागत विरोधक. त्यामुळे पंढरपुरातून बाडबिस्तरा उचलावा लागलेले रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांचे लोढणे परस्पर कॉंग्रसेच्या गळ्यात अडकवण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीतर्फे सुरु आहेत. स्वतःचा हक्काचा मतदारसंघ नसला तर काय गत होते याची कॉंग्रेससंस्कृतीत वाढलेल्या नेत्यांना पूर्ण जाणीव असते. आठवलेंना ते कधी कळणार नाही. त्यामुळे मतदारसंघ बांधण्याच्या भानगडीत ते पडणार नाहीत त्यामुळे कायम त्यांना कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या दारात उभे रहावे लागणार. नगर (दक्षिण) हा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. पण सध्या तिथे उमेदवारासाठी मोठी साठमारी सुरु आहे. उमेदवारी नाही मिळाली तर अगदी भाजपच्या दारात जाऊन उमेदवारी मिळवण्याची तयारी बलाढ्य नेत्यांनी ठेवली असल्याने इथेही राष्ट्रवादीला कडवा संघर्ष करावा लागेल, अशीच चिन्हे आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात उदयनराजे भोसले, प्रतापसिंह मोहिते-पाटील, धनंजय महाडिक, विनय कोरे, राजीव राजळे अशा आक्रमक नेत्यांना कसे आवरायचे हीच मोठी डोकेदुखी राष्ट्रवादीच्या नेतृत्वासमोर आहे.

थोडक्‍यात काय तर बारामती आणि माढा हे दोन मतदारसंघ सोडले तर कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, शिरुर, नगर (दक्षिण) या मतदारसंघात पवारांना मोठे डावपेच खेळावे लागणार आहेत आणि प्रचारही करावा लागणार आहे.

-सुहास यादव

No comments: