OPINIONMAKER

Monday, March 9, 2009

कुणाची माघार, कुणाची सरशी? ( शिरुर लोकसभा मतदारसंघ)कुणाची माघार तर कुणाचा विजय निश्‍चित अशी स्थिती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माढा मतदारसंघातील उमेदवारीमुळे झाली आहे. श्री. पवार यांच्या डावपेचांचा सगळ्यात मोठा फायदा झाला तो शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना. या मतदारसंघात आढळराव यांना अतिशय अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड, भोसरी या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत. शिरुर विधानसभा मतदारसंघात बाबुराव पाचर्णे आमदार आहेत. पाचर्णे मूळचे कॉंग्रेस संस्कृतीत वाढलेले पण तिथे आमदरकी मिळण्यात निर्माण झालेले अडथळे पाहून ते भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला गेले आणि आमदरकी मिळवली. पवार इथून लोकसभेची निवडणूक लढणार म्हटल्यावर पाचर्णे मनाने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आले आहेत. हडपसरमध्ये कॉंग्रेस पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तर एक त्यांचा सहकारी पक्ष असलेल्या कॉंग्रेसचा. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघाची गणना राष्ट्रवाद कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून होऊ शकते. अशा स्थितीत जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सहजपणे मिळायला हवी होती. पण राजकारण कधीच इतके सरळ नसते.

आढळरावांचा चमत्कार


पुणे जिल्ह्यातीला सत्तास्थानांचा आढावा घेतला तर कागदावर राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थिती प्रबळ असल्याचे दिसते. म्हणजे जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक आदी ग्रामीण भागाशी निगडीत सत्तेची केंद्रे या पक्षाच्या ताब्यात आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळीदेखील अशीच स्थिती होती. तरीही शिवाजीराव आढळराव शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अशोक मोहोळ यांचा पराभव केला. अशोक मोहोळ हे 85 ते 98 या काळात आमदार होते. त्यानंतर 98 आणि 99 मध्ये झालेल्या निवडणुकीत ते या मतदारसंघातून विजयी झाले होते. 1977 ते 1998 दरम्यान आठवेळा झालेल्या या मतदारसंघातून (मतदारसंघांची फेररचना होण्यापूर्वीचा खेड लोकसभा मतदारसंघ) कॉंग्रेसचाच उमेदवार विजयी झाला होता. अपवाद फक्त 1989 चा. त्यावेळी जनता दलाच्या किसनराव बाणखेले यांनी कॉंग्रेसच्या रामकृष्ण मोरे यांचा पराभव केला होता. थोडक्‍यात पूर्वी कॉंग्रेससाठी नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी हा मतदारसंघ म्हणजे बालेकिल्लाच होता. या पार्श्‍वभूमीवर 2004 मधील निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला कागदावर तरी अनुकूल वातावरण असताना आढळरावांनी मोहोळ यांचा धक्कादायक पराभव केला. ग्रामीण भागातील बहुसंख्य सहकारी सोसायट्या, बॅंका, दूधसंस्था, ग्रामपंचायतील राष्ट्रवादीच्या ताब्यात असताना आढळरावांनी हा चमत्कार घडवून आणला होता. शिवसेनेची पक्षसंघटना फारशी प्रभावी आणि बळकट नसताना व्यक्तिगत जनसंपर्क, प्रतिमा आणि स्वाभिमानाच्या मुद्यावर आढळरावांनी हा विजय मिळवला होता.

प्रगल्भ मतदार
अर्थात हा पराभव अशोक मोहोळ यांचा नव्हता तर शिवाजीराव आढळराव यांनी ज्यांच्या बरोबरीने राजकारण सुरु केले आणि मतभेदांमुळे ज्यांच्यापासून ते दूर झाले त्या दिलीप-वळसे पाटील यांचा होता. वळसे-पाटील त्यावेळी राज्यात कॅबिनेट मंत्री होते. आंबेगाव तालुक्‍यावर त्यांची चांगली राजकीय पकड होती आणि आहे. त्यांच्या ताब्यात असलेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे आढळराव अध्यक्ष होते. दोघेही बरोबरीने काम करत होते. तरीही वळसे-पाटील 2004 मध्ये आढळरावांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवून देऊ शकले नाहीत. उमेदवारी मिळत नाही म्हटल्यावर आढळरावांनी स्वतःच्या हिमतीवर ही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. पश्‍चिम महाराष्ट्रातील ग्रामीण इलाख्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षासारख्या हिंदुत्त्ववादी पक्षांना नेहमीच उमेदवारांची चणचण भासते. लोकसभा निवडणुकीसाठी तर त्यांना बहुधा उमेदवार अन्य पक्षातून आयात करावे लागतात. त्यावेळी मग मोठ्या मतदारसंघात किमान राज्यात प्रभाव असलेल्या पक्षाची उमेदवारी मिळवून रिंगणात उतरणे श्रेयस्कर असते हे ओळखून आढळराव शिवसेनेचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले. प्रसारमाध्यमांनी तर ही लढत आढळराव विरुद्ध वळसे-पाटील अशी रंगवली होती. वळसे-पाटलांनी वैयक्तिक लक्ष घालून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तरीही त्यांच्याच आंबेगाव मतदारसंघात मोहोळ पिछाडीवर पडले. नंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत वळसे-पाटलांनी विजय मिळवला. पण एव्हाना लोकसभेसाठी आढळरावांना आणि विधानसभेसाठी वळसे-पाटलांना मतदान करण्याचा निर्णय बहुसंख्य मतदारांना घेऊन टाकला होता. तसेच चित्र येत्या निवडणुकांमध्येही दिसेल. गावंढळ लोक धडाधड पंजांवर (किंवा घड्याळावर) शिक्के मारतात, अशी शेरेबाजी शहरातील सुशिक्षित लोक, विशेषतः ग्रामीण भागात कधीही प्रभाव निर्माण न करु शकलेल्या भाजपचे हितचिंतक करत असतात. त्यांनी इथे पाहिले तर लोक बरोबर योग्य त्या उमेदवाराला योग्य त्यावेळी आघाडी देतात हे लक्षात येईल. मतदार प्रगल्भ झाल्याचे हे लक्षण आहे.

अफाट जनसंपर्क
आढळराव म्हणजे ग्रामीण भागातून नोकरीच्या शोधात मुंबईत गेलेला एक युवक आणि नंतर बुद्धीमत्ता व पडेल ते काम आणि कष्ट करण्याची तयारी या जोरावर त्यांनी डायनॉलॉग उद्योगसमूहाची उभारणी केली. आंबेगाव तालुक्‍यातील लांडेवाडी या गावी परत येऊन राजकारण करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांनी दिलीप वळसे-पाटलांबरोबर काम सुरु केले. अत्यंत शांत स्वभाव, भेदक नजर आणि प्रसंगी दोन हात करण्याची तयारी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शिवसेनेची साथ मिळाली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्यांनी विजय मिळवला. अर्थात त्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात चाकणला झालेली बाळासाहेब ठाकरे यांची सभा निर्णायक ठरली. त्यानंतर अगदी आंबेगाव तालुक्‍यासह शिवसेनेच्या स्थानिक पातळीवरचे रुसवेफुगवे आणि वाद यामुळे शिवसेनेला नंतरच्या स्थानिक निवडणुकांमध्ये आढळरावांच्या मतदारसंघात फारसे यश मिळाले नाही. शिवसेनेच्या संपर्कनेत्यांनी देखील संघटनात्मक बांधणी करण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. कॉंग्रेस संस्कृतीला असलेला कडव्या विरोधातून गावोगावी जे तरुण उभे राहिले त्यांना शिवसेनेखेरीज पर्याय नव्हता. त्यातून जी संघटना उभी राहिली ती शिवसेना. पण त्यात पक्षाची घट्ट बांधणी कधीच नव्हती. अनेकदा अनेक नेते स्वार्थासाठी आले आणि गेलेही. पण शिवसेनेबरोबर असलेला तरुण कायम राहिला. त्यांनाच हाताशी धरुन आढळराव गेल्या पाच वर्षात मतदारसंघातील वाड्यावस्त्यांवर पोचले. एक तर हा मतदारसंघ अस्ताव्यस्त पसरलेला आहे. पुन्हा त्यातील अनेक गावे दुर्गम. पण आढळरावांनी भक्कम संपर्कयंत्रणा उभी केली. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून या मतदारसंघात आढळरावांशी मुकाबला करु शकेल असा उमेदवार देण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खल सुरु होता. अखेरीस शरद पवारांनीच
या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केल्यावर पक्षातील अनेक नेत्यांनी सुस्कारा टाकला होता. परंतु आढळराव विचलित झाले नाहीत. ते सांगत होते, ""मी कुठे साहेबांच्या विरोधात लढतो आहे. साहेबच माझ्याविरोधात लढणार आहेत.'' अखेरीस या मतदारसंघातील रागरंग पाहून श्री. पवार माढ्याकडे सरकले आणि तिथेच आढळरावांचा विजय निश्‍चित झाला. आता राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी वळसे-पाटील, वल्लभ बेनके, दिलीप मोहिते, बाबुराव पाचर्णे आदी आमदारांना प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. कारण लगेचच विधानसभेच्या निवडणुका आहेत. आपल्या मतदारसंघात शिवसेनेला आघाडी मिळाली तर मतदारांमध्ये तसेच पक्षश्रेष्ठींकडे प्रतिकूल मेसेज जाणार याची कल्पना या सर्वांना आहे. त्यामुळे आढळरावांनी निर्माण केलेल्या चक्रव्यूहातून हे नेते कसे बाहेर पडतात की चक्रव्यूहातच अडकून पडतात हे पाहणे रंगतदार ठरणार आहे.


-सुहास यादव

1 comment:

suresh navale said...

shivaji adhalrao yanche vishayichi mahiti paripurna aai.
adhalrao yani gramin mulansathi atishay changalya prakarche karya kele aahi. tyani tyancha bairvnatha patsathe marpat anek lokana karje upalbdh karun dili aai.
parntu pawar pantpradhan jale pahije ya vavhanapramane shivaji adhalrao yana hi nivadnukh sopi nahi. yacha artha asa aai ki shivaji adhalrao yancha parabhav atal aai. dhanywad.