OPINIONMAKER

Monday, September 1, 2008

पालकांची मानसिकता अशी का?

आसाराम बापू यांच्या संस्थेमार्फत मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहात दोन कोवळ्या जीवांचा खून झाला। त्यातील एकजण तर पुण्यातील अवघा साडेपाच वर्षांचा होता. एवढ्या लहान वयात मुलांना वसतिगृहात पाठवण्यामागे पालकांची काय मानसिकता असावी? चांगले संस्कार करणे, शिस्त लावणे ही जबाबदारी आई-वडिलांचीच आहे. ती शिक्षकांवर किंवा कुठल्या तरी गुरुकुलावर सोपविणे म्हणजे पळपुटेपणाच आहे.



मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे गुरुकुल पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या विद्यालयातील घटनेमुळे मुलांपेक्षाही पालकांच्या मानसिकतेबाबत विचार करण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. या विद्यालयाच्या वसतिगृहात दोन कोवळ्या जिवांचा त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या विद्यार्थ्याने अतिशय निर्दयीपणे खून केला. कारण काय, तर त्याला तिथे राहायचे नव्हते. मग तिथून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून त्याच्या हातून गुन्हेगारी कृत्य घडले। 




प्रश्‍न असा आहे, की या तीनही मुलांच्या पालकांनी त्यांना वसतिगृहात ठेवताना काय विचार केला असेल?सध्याच्या स्पर्धेच्या काळात प्रत्येक पालकाला आपला मुलगा सतत पुढे असावा, असे वाटते. हल्ली मुले स्मार्ट आणि बोल्ड असतातही. कोणताही प्रश्‍न विचारण्यात, अनोळखी व्यक्तीशी लगेच संवाद सुरू करण्यात त्यांना अडचण वाटत नाही; परंतु काही मुले बुजरी असतील तर ती नवख्या ठिकाणी लगेच रुळतील, बोलतील असे नाही. मग पालकांना काळजी वाटू लागते. अशा वेळी त्या मुलाच्या विश्‍वात डोकावून पाहिले तर... कदाचित त्याच्या मनात विचार चालू असतील, "हे कोण आले आहेत, त्यांचे नाव काय? ते एकदम मला माझे नाव आणि शाळेचे नाव का विचारताहेत?' मुलाने त्या पाहुण्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली नाहीत, तर आई-वडिलांनाच अपराधी वाटू लागते. लगेचच अनेक चिंता त्यांच्या मनात रुंजी घालू लागतात. हा घडाघडा कधी बोलणार, त्या पाहुण्यांना काय वाटले असेल? पण, मूल काय विचार करत असेल हे लक्षात घेतले पाहिजे, असे त्या आई-वडिलांना वाटत नाही. कहर म्हणजे घरात कुणी आले, की मुलाला सांगणे, "सोनू, गाणं म्हणून दाखव'. सोनू हुप्प; आई अस्वस्थ. जरा वेळाने दरडावणीचा सूर. सोनू म्हणतो, "मला नाही आठवत'. "अरे मग ती शाळेतली पोएम म्हणून दाखव. तू छान म्हणतोस ना नेहमी...' जमेल तेवढ्या नम्र स्वरात सोनूची आळवणी. खरे तर त्याला त्या वेळी ती "पोएम' म्हणायचीच नसते; पण पाहुण्यांना काय वाटेल आणि आई-वडिलांना काय वाटते, यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्‍न आहे तो सोनूला काय वाटते, याचा. कदाचित सोनू त्या वेळी छान चित्र रंगवण्यात दंग असेल, कार्टून पाहत असेल किंवा गॅलरीतून रस्त्यावरची गंमत पाहात असेल आणि तिथून त्याला खेचून आणून एकदम गाणे म्हणायला सांगण्यात किती निष्ठुरता आहे, हे कदाचित सोनूच सांगू शकेल. यावर पालकांचे म्हणणे असते, ""आम्ही जे करतो ते सगळे त्याच्या भल्यासाठीच. रोज आठ तास मरमर काम करतो ते कोणासाठी?'' हे सोनूला कळण्याच्या पलीकडचे आहे. त्याच्या अपेक्षा माफकच आहेत. दिवसभरात कधीतरी मनसोक्त हुंदडायला मिळावे. दमल्यावर आईच्या किंवा बाबांच्या कुशीत शांतपणे झोपायला मिळावे. कधी त्याला कात्रीने कागद कापून घरभर कचरा करायला आवडतो किंवा कागदावर रंगाचे फटकारे मारायला आवडतात. आपल्याला जो कचरा वाटतो, तो त्याच्या काहीतरी तयार करण्याच्या प्रयत्नांचा भाग असतो. कागद कापून काही तयार करता आल्यास तो घरभर नाचून आपण किती छान गोष्ट तयार केली आहे हे दाखवतो आणि जमले नाही तर त्याला फारसे काही वाटत नाही. तो दुसरे काही तरी करू लागतो।


गंमत म्हणजे कधी तरी त्याच्या अभ्यासाबाबतचा काहीतरी शोध आई-बाबांना लागतो आणि मग त्याला विचारण्यात येते, ""अरे तुला टीचरनी सांगितलेले एवढे कसे कळत नाही? तू आम्हाला का नाही सांगितले?'' मग, ""तुझे शाळेत लक्ष नसते'', ""तू अभ्यासाकडे लक्ष देत नाहीस'' असे बरेच काही त्याला ऐकवले जाते आणि शेवटी ""ऐकले नाहीस तर तुला बोर्डिंगमध्ये टाकू'' अशी धमकी दिली जाते. पहिल्यांदा ही धमकी मिळते तेव्हा अर्थातच त्याला बोर्डिंग म्हणजे काय याची कल्पना नसते. यापूर्वी वाघ, राक्षस याची भीती त्याला घालून झालेली असते आणि त्याचा त्याला सराव झालेला असतो. त्यामुळे बोर्डिंग म्हणजे असेच काही तरी असावे, असा त्याचा समज होतो. मग सगळे शांत झाल्यावर आई-बाबांचा मूड बघून हळूच तो विचारतो, ""बाबा बोर्डिंग म्हणजे काय हो?'' बाबा सांगू लागतात, ""अरे बोर्डिंग म्हणजे हॉस्टेल. तिथे मुलांना शिकायला ठेवतात. तिथे अंघोळ, कपडे धुणे सगळी कामे स्वतकरावी लागतात. मिळेल ते खावे लागते. लवकर उठावे लागते.'' एवढे ऐकल्यावर सोनू विचारतो, ""तिथे आई-बाबा नसतात?'' बाबा सहजपणे सांगतात, ""नसतात, तिथे हॉस्टेलचे प्रतुमच्यावर लक्ष ठेवायला असतात.'' एवढे ऐकल्यावर इतका वेळ नॉर्मल असलेल्या सोनूच्या पायाखालची जमीन सरकते. आपल्याबरोबर आई-बाबा नसणार ही कल्पनाच त्याला सहन होणारी नसते. मग तो लगेचच बाबांकडून ""तुम्ही मला बोर्डिंगमध्ये पाठवणार नाही ना,'' असे विचारून आश्‍वासन मिळवतो. त्यासाठी तो वाट्टेल तो कबूल करतो. या जगात त्याला आई-बाबांपेक्षा काहीही महत्त्वाचे नसते.चिमुकल्यांचे जगसांगा, अशा पाच-सहा वर्षांच्या मुलाला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवून आपण त्याचे चिमुकलेसे विश्‍व उद्‌ध्वस्त करत असतो की नाही? एखाद्या मुलाला आई-वडील नाहीत किंवा दोघांपैकी फक्त एकच जण आहे, तर परिस्थितीमुळे बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवणे वेगळे; पण त्याला शिस्त लागावी, चांगले संस्कार व्हावेत, तो "मोठ्ठा' व्हावा अशा अपेक्षेने चिमुकल्या जिवांची आई-वडिलांपासून ताटातूट करणे समर्थनीय नाही।


मुख्य म्हणजे चांगले संस्कार करणे, शिस्त लावणे ही जबाबदारी आई-वडिलांचीच आहे. ती शिक्षकांवर किंवा कुठल्या तरी गुरुकुलावर सोपवणे म्हणजे पळपुटेपणाच आहे. दहावीनंतर मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवणे समजू शकते; पण पाच-सहा वर्षांच्या चिमुरड्यांचे काय?कॉलेजमध्ये माझ्या वर्गात साताऱ्यातील सैनिक स्कूलमध्ये शालेय शिक्षण झालेली मुले होती. त्यांतील एकाची माझ्याशी जास्त जवळीक होती. त्याच्या मते त्याच्या वडिलांनी शिक्षा म्हणूनच त्याला सैनिक स्कूलमध्ये घातले होते. पाचवी ते दहावी या संस्कारक्षम वयात तो आई-वडिलांपासून दूर होता। नंतरही तो आजोबांकडे राहिला आणि लग्न झाल्यावरही तो कधीही आई-वडिलांच्या जवळ गेला नाही।

-सुहास यादव
--------
बुधवार 6 ऑगस्ट 2008 रोजी सकाळमध्ये प्रकाशित झालेला लेख

No comments: