OPINIONMAKER

Tuesday, June 3, 2008

हतबल मानसिकतेला(रिटायर करा) बदला

हिंदू धर्म कुणा भडभुंज्या महाराजामुळे टिकणार नाही किंवा कुणी विरोधात बोलले म्हणून संपणार नाही। या देशातील अनेक भागात कित्येक शतके इस्लामी राजवट होती, नंतर ब्रिटीशांची राजवट होती। त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी हिंदूधर्म संपला नाही. कारण या धर्माची टिकून राहण्याची आंतरिक क्षमता प्रचंड आहे. गेल्या शतकात हिंदूंनी अनेक नव्या गोष्टी, प्रथा स्वीकारल्या, काळाच्या रेट्यानुसार जीवनशैलीत वेळोवेळी अनुरूप बदल स्वीकारला. त्यामुळे इथले समाजजीवन प्रवाही राहिले. त्याचे डबके बनले नाही.
------
परमेश्‍वराला रिटायर करावे, असे डॉ। श्रीराम लागू यांचे मत आहे। अधूनमधून ते त्यावर बोलत असतात। ते बोलले की लगेचच त्यांचे विचार मान्य नसणारे आक्रमकपणे आपली बाजू मांडू लागतात। त्यातून काही प्रमाणात वैचारिक घुसळण होते। डॉ। लागू यांचे म्हणणे क्षणभर बाजूला ठेवले तरी आपले देव, समाज, धर्म आणि भाविकता याबाबत मुळातून विचार करण्याची आपली तयारी आहे का? दुसरी गोष्ट म्हमजे देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली आणि लोकांवर मोहिनी टाकणाऱ्या बुवा, बापू, महाराज, शास्त्री यांचा भूतकाळ काय आहे, ते नेमके समाजासाठी काय करतात, सामाजिक सुधारणा, आरोग्य, शिक्षण याबाबत यांच्या भूमिका काय आहेत हे या निमित्ताने तपासण्याची गरज आहे।



बाबा-बुवांचा इतिहास तपासा

जागतिकीकरण आणि खुली अर्थव्यवस्था व जगण्यासाठीची स्पर्धा यामुळे माणसाच्या आयुष्यातील अनिश्‍चितता वाढली आहे। मुळात मनुष्य हा सर्वात घाबरट प्राणी। नोकरी-व्यवसायातील अनिश्‍चितता आणि त्यातून येणाऱ्या हतबलतेमुळे त्याला कुणाचा तरी आधार लागतो. ही हतबलता आता एवढी वाढली आहे की माणसाला आधार म्हणून देव पुरेसा वाटत नाही त्यामुळे बाबा-बुवांचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत आहे. खरे तर कष्ट, जबरदस्त इच्छाशक्ती आणि कितीही प्रतिकूल स्थितीमध्ये खंबीरपणे कार्यरत राहण्याची तयारी असेल तर या अनिश्‍चिततेवर मार्ग निघतो, नैराश्‍यातून माणूस बाहेर पडू शकतो. पण हा खूप कष्टाचा आणि दीर्घकालीन उपाय असल्यामुळे सामान्य माणसाला तो झेपत नाही. अशा स्थितीत शॉर्टकट म्हणजे कुठल्यातरी महाराजांच्या संप्रदायात, संत्संगात शिरायचे. तिथे महाराजांचे प्रस्थ वाढवाणारे शिष्यगण असतातच. तिथले एकूणच वातावरण महाराजांचे महत्त्व वाढवणारे आणि सामान्यांना भारावून टाकणारे असते. मग महाराजांवर आपल्या सगळ्या चिंता सोपवून मोकळे व्हायचे. आपल्या प्रयत्नातून चांगले घडलेच तर सगळे श्रेय महाराजांना द्यायचे आणि महाराजांकडे जाऊनही आपल्या समस्या कायमच राहिल्या तर स्वतःच्या नशीबाला दोष द्यायचा असे सामान्य माणसाचे वागणे असते. या महाराजांचे भूतकाळ काय आहेत, त्यांनी कोट्यावधींची संपत्ती कशी मिळवली, त्याचे हिशेब, कर भरला आहे का याच्याशी सामान्य माणासाला काही देणेघेणे नसते. मुळात अनेक महाराज आणि देवस्थानांना मिळणाऱ्या देणग्या पाहिल्या तर बेहिशेबी पैसा असणाऱ्यांनी गुप्तपणे हे दान केलेले असते किंवा महाराजांच्या मठाचे-आश्रमाचे बांधकाम करून दिलेले असते. अर्थातच हा बेहिशेबी पैसा इथल्या लोकांचे शोषण करूनच मिळवलेला असतो. एवढे पाप केल्यावर त्या कथित उद्योजकालाही झोप लागत नाही. मग शोषण करून जमवलेल्या पैशातील काही वाटा गुप्तपणे किंवा नाव न जाहीर करण्याच्या अटीवर तो अशा आश्रमांना किंवा मंदिरांना गुपचूप देतो. आपल्या कोट्यावधी समाजबांधवांना पिण्याचे शुद्ध पाणी, शिक्षण, आरोग्याच्या प्राथमिक सुविधा मिळत नसताना त्यासाठी पैसा खर्च करण्याऐवजी तो बाबा-बुवांकडे जातो. यावर अनेक ट्रस्ट सामाजिक कामे करत असल्याचा ढोल काही जण वाजवू लागतात. पण त्या ट्रस्टची, मंदिराची किंवा आश्रमाची एकूण उलाढाल पाहिली तर सामाजिक कामांवर होणारा खर्च हा दहा टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नसतोच. विश्‍वस्तांसाठीच्या सोयीसुविधा, डामडौल, दिखाऊपणा, गाजावाजा करत आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम यावरच जास्त खर्च होत असतो. एकदा तुम्ही स्वतःला मंदिराचे विश्‍वस्त म्हणून घेतल्यावर भाविकांनी दान म्हणून दिलेल्या पैशाचा विनियोग कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणे केला पाहिजे. प्रत्यक्षात काय चित्र दिसते तर, श्रीमंत देवस्थांनांचे विश्‍वस्त ट्रस्टच्या नावावर महागड्या गाड्या घेऊन ट्रस्टकडूनच पेट्रोलचा खर्च घेऊन भगवंतांचे कार्य करण्यासाठी फिरत असतात. या सगळ्या महान कार्याची भाविकांना माहिती होण्यासाठी प्रसिद्धी आणि जाहिरातींवर लाखो रुपये खर्च करत असतात. मंदिरासाठी मार्बल आणायचा आहे म्हणून तो पाहण्यासाठी विश्‍वस्त ट्रस्टच्या खर्चाने राजस्थानपर्यंत गेल्याची उदाहरणे आहेत. नगरसेवक अभ्यासदौऱ्यासाठी केरळला जाणार किंवा परदेश दौरा करणार म्हटले की त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होते. कारण लोकांचा पैसा असा उधळण्याची परवनागी तुम्हांला कुणी दिली असा जाब त्यांना विचारला जात असतो. मग भाविकांनी दानपेटीत टाकलेला पैसा झगमगाटासाठी, प्रसिद्धीसाठी उधळणाऱ्या विश्‍वस्तांनाही लोकांनी जाब विचारला पाहिजे. कारण हा भाविकांचा पैसा आहे. मुळात कोणत्याही देवाला डोळे दिपवून टाकणाऱ्या झगमगाटाची गरज नसते. देवाच्या नावावर स्वतःचे दुकान चालवणाऱ्या विश्‍वस्तांना-महाराजांना झगमगाटाची आणि चमत्काराची, नवसाला पावण्याची गरज वाटत असते. हे सगळे झिरपत झिरपत रस्त्याच्या कडेच्या छोट्या मंदिरापर्यंत येते।

मंदिरांचा धंदा करणाऱ्यांना काय शिक्षा करणार?

माझा एक मित्र आहे. तो आणि त्याचे कुटुंबिय खरेखुरे धार्मिक आणि श्रद्धाळू आहेत. आपली अडचण, साडेसाती संपावी म्हणून नव्हे तर भक्ती म्हणून ते उपासना करत असतात. त्याचे रस्त्यावर कुठेही अवडंबर माजवण्याला त्यांचा विरोध आहे. त्या मित्राने सांगितलेल्या घटनेनंतर मी रस्त्यावरचा वडापाव खाणे एकदम बंद केले. श्रद्धा आमि भक्ती विषयावर आमची चर्चा चालू असताना तो सांगू लागला की, एकदा त्याच्या मित्राला त्याने विचारले काय नवीन, कसे काय चालले आहे. त्यावर त्या मित्राने उत्तर दिले काही नाही, अमुक एरियात मंदिर सुरु केले आहे. कसले, माझ्या मित्राने विचारलो. तो म्हणाले, "स्वयंभू शनिचे'. माझा मित्र म्हणाला, एकदम शनिच का? तो म्हणाला, काही नाही, रोज दक्षिणापेटीत शंभर-दीडशे रुपये मिळतात पण, दर शनिवारी दहा-बारा लिटर तेल मिळते. माझा मित्र एव्हाना अस्वस्थ झाला होता. त्याने विचाराले, ""एवढ्या तेलाचे आणि तेही सरमिसळ असलेल्या तू करतोस काय?'' तो मंदिरवाला म्हणाला, ""वडापाववाल्याला विकतो.'' या सगळ्यावर कडी म्हणजे आणखी एका एरियात असेच मंदिर सुरु करण्याची त्याची तयारी चालू होती.यातील विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्या कथित साडेसातीचा, असहायतेचा कुणी गैरफायदा तर घेत नाही, याचा क्षणभर थांबून विचार केला पाहिजे।

बापू-बुवांच्या फोटोचेही मार्केटिंग

बुवा-बापूंची उपस्थिती असलेल्या एका कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी मी गेलो होतो. माझ्या शेजारीच एका वर्तमानपत्राचे संपादक बसले होते. शेजारी असलेल्या कठड्याच्या पलिकडे महाराज गॉगल लावून ऐटीत बसले होते. माझे संपादक मित्र म्हणाले, ""अरे माझा मुलगा किती दिवसांपासून महाराजांचा फोटो मागतो आहे, जर माझ्या मोबाईलवर त्यांचा फोटो काढ.'' मी त्यांचा मोबाईल घेतला व बसल्या जागीच फोटो काढण्याचा प्रयत्न करू लागलो. तो काही नीट येईना म्हणून मी जागेवरून उठलो व महाराजांच्या जरा जवळ गेलो आणि फोटो काढू लागलो तेवढ्यात महाराजांचे दोन-तीन अनुयायी माझ्यावर धावून आले. अर्थात मी शांतपणे परत फिरलो. मला ना त्या महाराजांमध्ये इंटरेस्ट होता ना त्यांच्या फोटोमध्ये. वयाने ज्येष्ठ असलेल्या माझ्या त्या संपादक मित्राचा चेहरा मात्र हिरमुसला झाला. नंतर चौकशी केल्यावर कळले महाराजांच्या संस्थेचा बाहेर स्टॉल असून तेथूनच फोटो विकत घेतला पाहिजे असा त्यांचा नियम होता. थोडक्‍यात काय तर आम्ही मार्केट सुरु केले आहे आणि तिथूनच तुम्हाला खरेदी करावी लागेल, असा तो संदेश होता.पुढे अशा महाराजांनी-बुवांनी त्यांच्या हयातीत जमवलेली कोट्यावधींची संपत्ती नंतर समाजाकडे न जाता बुवांचे वारस ती ताब्यात घेतात. त्यात दुसरा कुणी येतो आहे म्हटल्यावर खून पडण्यापर्यंत मजल जाते. कारण प्रश्‍न इस्टेटीचा असतो. यावर कडी म्हणजे आता काही महाराज स्वतःबरोबरच पत्नीलाही चमत्काराचे वलय देऊन स्वतःबरोबर छायाचित्रांमध्ये झळकवू लागले आहेत. मुळात ह्या बुवा-महाराजांची वैचारिक पातळीवर चर्चा करण्याची तयारी नसते. चर्चा सोडाच सर्व ऐहिक बाबींचा त्याग केलेल्या या महाराजांविरुद्ध कुणी बोललेले देखील त्यांना खपत नाही. असे विरोधी बोलणाऱ्यांवर महाराजांचे शिष्यगण तुटून पडतात, हिंसक कृत्येही करतात. तर्कसंगत मांडणी करता येत नाही म्हटल्यावर अखेरचे शस्त्र म्हणून ते धर्माचा आधार घेतात. महाराजांविरुद्ध बोलणे म्हणजे धर्माविरुद्ध बोलणे असे सांगून धर्मरक्षणाची जबाबादारी आपल्याच खांद्यावर असल्याचे सांगून शस्त्रे हाती घेतात. मुळात प्राचीन असा हिंदू धर्म कुणा भडभुंज्या महाराजामुळे टिकणार नाही किंवा कुणी विरोधात बोलले म्हणून संपणार नाही. या देशातील अनेक भागात कित्येक शतके इस्लामी राजवट होती, नंतर ब्रिटीशांची राजवट होती. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी हिंदूधर्म संपला नाही. कारण या धर्माची टिकून राहण्याची आंतरिक क्षमता प्रचंड आहे. त्याचा थांग अजून कुणाला लागलेला नाही. गेल्या शतकात हिंदूंनी अनेक नव्या गोष्टी, प्रथा स्वीकारल्या, काळाच्या रेट्यानुसार जीवनशैलीत वेळोवेळी अनुरूप बदल स्वीकारला. त्यामुळे इथले समाजजीवन प्रवाही राहिले. त्याचे डबके बनले नाही. या पुढच्या काळातही आपण प्रत्येक गोष्ट तपासून स्वीकारली पाहिजे, प्रवाही राहिले पाहिजे, महाराजांच्या भरवशावर राहण्यापेक्षा प्रचंड कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे, बदल सकारात्मकपणे स्वीकारले पहिज आणि आपली समस्या आपणच सोडवायची आहे, असा दृढनिश्‍यच मनाशी ठेवला तर हतबलतेवर मात करता येईल. मग परमेश्‍वराला रिटायर करायचे किंवा कसे या प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्‍न आहे।-

-सुहास यादव
--------------------

3 comments:

jagalya said...

ase kahi vachale ki vicharatala ghondhal kami honyas madat hote

jagalya said...

ase kahi vachale ki vicharatala ghondhal kami honyas madat hote

Arvind Dorwat said...

सुहास,
अतिशय खरे लिहिलेत. तुकारामबाबांचा रोकडा व्यवहार आठवला.