OPINIONMAKER

Tuesday, May 22, 2012

डॉ. आंबेडकर आणि लबाडांचा कांगावा


एनसीईआरटीने बनवलेल्या पुस्तकातातील वादग्रस्त व्यंगचित्रात बाजूला शेकडो लोक उभे असल्याचे दाखवले आहे.  त्याचपद्धतीने गोगलगायीवर सात-आठ लोक बसल्याचे दाखवता आले असते. म्हणजे राज्यघटनेच्या निर्मितीला दिरंगाई होण्यास सगळी घटना समिती जबाबदार आहे, असे म्हटता आले असते. ती गोगलगाय म्हणजे   `घटना समिती'  अशी मखलाशी करण्याचा प्रयत्न काही विचारवंतांनी केला. पण बारकाईने पाहिले तर गोगलगायीवर constitution असे लिहिलेले दिसते. त्याठिकाणी   `घटना समिती'  असे लिहिलेले नाही. त्यामुळे घटना तयार करण्यास उशीर झाला तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जबाबदार आणि देशाला एक उत्तम घटना दिली की त्याचे श्रेय सगळ्या घटना समितीला द्यायचे, अशी लबाड मांडणी करणारा आणि तसा प्रचार करणारा मोठा वर्ग आजही देशात आहे. आपले हितसंबंध आणि जातीवर आधारित श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी धूर्तपणे युक्तिवाद करुन दिशाभूल करणाऱ्या या  वर्गाला आंबेडकरी जनतेचा विरोध आहे.

----------------------------------------------------------------

भा रतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यंगचित्र नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (एनसीईआरटी) बनवलेल्या पुस्तकात छापले. यावरुन देशात आणि संसदेत मोठा गदारोळ झाला. अखेरीस हे पुस्तकच मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला. दरम्यानच्या काळात एनसीईआरटीच्या सल्लागारांच्या पुणे विद्यापीठातील कार्यालयात काही तरुणांनी तोडफोड करुन राग व्यक्त केला. कोणतीही तोडफोड, हिंसा कदापि मान्य होणारी नाही. या विधानात एक मेख आहे. कारण या विधानात दृश्य स्वरुपातील हिंसेबाबतच बोलले जाते. हिंसा ही बौद्धिक आणि मानसिक स्वरुपाची देखील असते. ती विविध समाजघटकांवर शांतपणे, क्लुप्त्या लढवत आणि धूर्तपणे केली जाते. एनसीईआरटीच्या पुस्तकातील व्यंगचित्र हे या प्रकारातील आहे.

शब्दांची उधळण आणि बौद्धिक हल्ले...
कथित खालच्या जातीत जन्मल्यामुळे आपल्या देशातील मोठ्या लोकसंख्येला हजारो वर्षे शारीरिक हिंसा आणि अपमान सहन करावा लागला. डॉ. आंबेडकरांनी आयुष्यभर केलेल्या कार्यामुळे हा समाज या हिंसेच्या आणि अपमानाच्या विरोधात दंड थोपटून उभा राहिला. सडतोड प्रश्न विचारु लागला. तर्कसंगत उत्तरांची अपेक्षा धरु लागला. यामुळे कथित उच्चवर्णीयांना काहीशी माघार घ्यावी लागली. ही माघार प्रगल्भतेतून, पश्चात्तापातून किंवा लोकशाही, स्वातंत्र्य, समतेच्या भूमिकेतून घेतली गेली नव्हती. उलट हजारो वर्षे आपली गुलामगिरी मान्य करणारा समाज आता माणुसकीची, समतेची, हक्काची भाषा बोलू  लागला ही बाब जातीव्यवस्थेच्या आधाराने स्वतःचे पोट भरणाऱ्यांसाठी अपमानास्पद आणि धक्कादायक होती. त्यांच्या कथित धर्माने त्यांना बहाल केलेले श्रेष्ठत्व आणि अधिकार कुणीतरी ओरबडून घेतले, अशी त्यांची भावना  झाली. हा आपला अपमान असल्याचा समज त्यांनी करुन घेतला. ही खदखद आजही कायम आहे. व्यंगचित्र किंवा जेम्स लेन प्रकरणातून ती बाहेर पडत असते. शारीरिक  हल्ले आणि हिेंसेचा निषेध करताना आंबेडकरी जनतेच्या मानचिन्हांवरील मानसिक हल्ले कधी थांबवणार आहोत हा महत्वाचा प्रश्न आहे. शब्दांची फिरवाफिरव करणारे लेखन, भाषेचे अवडंबर, शब्दांची उधळण करत किंवा चित्रांमधून तुम्ही बौद्धिक हल्ले करत राहणार, मोक्याच्या ठिकाणी नियुक्त्या असल्यामुळे आपण निष्पाप आणि निरपेक्ष  असल्याचा आव आणत बौद्धिक गुलामगिरी निर्माण करणारी स्फोटके पेरत राहणार आणि मग दुसऱ्या बाजूने हिंसक प्रतिक्रिया आली की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढणार. हा दांभिकपणा आता लोकांना समजू लागला आहे.

आम्ही म्हणू तीच पूर्व?
लोकशाही, मतस्वातंत्र्य, कलाकारांचे, व्यंगचित्रकाराचे स्वातंत्र्य या गोष्टी वृत्तवाहिन्यांवर चर्चेसाठी ठीक आहेत. पण एखादी घटना, चित्र ही या दृष्टीकोनातूच बघितली पाहिजे, त्यातून असाच संदेश घेतला पाहिजे, अशी वैचारिक दडपशाही करणारे तुम्ही कोण? हजारो वर्षे शिक्षण, वेदविद्या, मंत्र-पुराणे अशा गोष्टी तुम्ही तुमच्या ताब्यात ठेवल्या. एकप्रकारे हजारो वर्षे स्वतःसाठी आरक्षणाची व्यवस्था करुन घेतली. मतस्वातंत्र्यच नव्हे तर विचार करण्याची कल्पनाही खालच्या जातींच्या मनात येणार नाही अशी भक्कम जातीव्यवस्था तयार केली. त्याचे समर्थन करत राहिलात. आज त्यांचेच वारसदार एखाद्या गोष्टीकडे कुठल्या चष्म्यातून बघायचे आणि तसे बघणे म्हणजेच  विचारस्वातंत्र्य अशी पळवाट शोधणारी मांडणी करु लागले आहेत. एम. एफ. हुसेन यांनी काढलेल्या चित्रांमुळे भावना दुखावतात, बदनामी होते. ती चित्रे कशी बघितली म्हणजे बदनामी होणार नाही, भावना दुखावणार नाहीत हे इथल्या विचारवंतांनी कधी सांगितले नाही. पण डॉ. आंबेडकरांवरील व्यंगचित्र कसे बघितले पाहिजे, त्यातून काय  संदेश घेतला पाहिजे याचे रतीब रोज घातले जात आहेत. हजारो वर्षे गुलामीत राहणाऱ्या समाजातील एक-दोन पिढ्यांचा आता शिक्षणाशी जवळून संबंध आला आहे. शिकलेल्या तरुणांना एखाद्या घटनेचे विश्लेषण कसे करायचे, त्यामागील मतितार्थ काय आहे, एखाद्या लिखाणाचा किंवा चित्राचा उद्देश काय आहे हे समजू लागले आहे. किंबहुना अनेक ठिकाणांहून माहिती घेऊन मत बनवण्याचे कौशल्य त्याला प्राप्त झाले आहे.  अशा स्थितीत एनसीईआरटीच्या पुस्तकातील व्यंगचित्रावरुन डॉ. आंबेडकरांचा अपमान होतच नाही असा ठेका धरुन रोज नाच करण्यात काय हशील आहे?

व्यंगचित्रातील गोम
संबंधित व्यंगचित्रात बाजूला शेकडो लोक उभे असल्याचे दाखवले आहे.  त्याचपद्धतीने गोगलगायीवर सात-आठ लोक बसल्याचे दाखवता आले असते. म्हणजे राज्यघटनेच्या निर्मितीला दिरंगाई होण्यास सगळी घटना समिती जबाबदार आहे, असे म्हटता आले असते. ती गोगलगाय म्हणजे `घटना समिती' अशी मखलाशी करण्याचा प्रयत्न काही विचारवंतांनी केला. पण बारकाईने पाहिले तर गोगलगायीवर constitution असे लिहिलेले दिसते. त्याठिकाणी   `घटना समिती'  असे लिहिलेले नाही. त्यामुळे घटना तयार करण्यास उशीर झाला तर डॉ. आंबेडकर जबाबदार आणि देशाला एक उत्तम घटना दिली की त्याचे श्रेय सगळ्या घटना समितीला द्यायचे, अशी लबाड मांडणी करणारा आणि तसा प्रचार करणारा मोठा वर्ग आजही देशात आहे. आपले हितसंबंध आणि जातीवर आधारित श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी धूर्तपणे युक्तिवाद करुन दिशाभूल करणाऱ्या या वर्गाला आंबेडकरी जनतेचा विरोध आहे.

त्यांचे देव तेवढे पवित्र...
सगळे मुद्दे संपले की डॉ. आंबेडकरांना देव बनवू नका, असा कांगावा करुन आपण किती पुरोगामी विचारांचे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. डॉ. आंबेडकरांच्या अगोदर या देशात आंबेडकरी जनतेला सन्मानाचे स्थान नव्हते. उलट पदोपदी अपमान होईल, अशी व्यवस्था तयार करण्यात आली होती. या जनतेला कुठलाही स्फूर्तीदायक इतिहास नव्हता की प्रेरणास्थान नव्हते.  एकीकडे 33 कोटी देव असले तरी पुन्हा रस्त्यावर रोज नवे देव मांडण्याची गरज संगणकाच्या युगातही भासते आहे. डॉ. श्रीराम  लागू यांच्या सारख्या विचारवंतांनी देवाला रिटायर करण्याचा सल्ला दिला की, आपले जगण्याचे साधनच कुणीतरी हिसकावून घेत असल्याच्या त्वेषात त्यांच्यावर टीका केली जाते. माणसाला जगण्यासाठी देवाची गरज लागतेच असा युक्तिवाद केला जातो. असे असेल तर इथल्या कोट्यावधी जनतेला धर्ममार्तंडांनी देवापासून, मंदिरांपासून दूर का ठेवले? माणसाची सावली पडली तरी त्यांचा देव अपवित्र होत होता. त्या देवाला कवटाळण्याचा प्रयत्न नाशिकमधील काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेबांनी केला. पण पाषाणहृदयी धर्मवाद्यांना पाझर फुटला नाही. अशा स्थितीत ज्या महापुरुषाने आपली जातीच्या दास्यातून मुक्तता केली आणि माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा दिली, त्या डॉ. बाबासाहेबांना आपले प्रेरणास्थान, दैवत मानले तर लगेच कांगावा करण्याची काय गरज आहे? झोपडपट्टीत, खेड्यापाड्यात राहणाऱ्या तरुणांनी, आयाबहिणींनी डॉ. आंबेडकरांचे प्रत्येक पुस्तक वाचले असेल असे नाही. त्यांचे सगळे विचार त्यांना समजलेच असतील असेही नाही. त्यांना एवढेच माहित आहे की आपल्या पायात हजारो वर्षे असलेल्या दास्याच्या साखळदंडातून आपली मुक्तता कुणी केली तर ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महामानवाने. त्यामुळेच आंबेडकरी जनतेचे डॉ. बाबासाहेब हे श्रद्धास्थान आहे, प्रेरणास्थान आहे.

 मग प्रश्न असा निर्माण होतो की, व्यंगचित्र हे नेहमी नकारात्मक सूर लावणारेच असते का? त्यावेळी उत्तम राज्यघटना दिली म्हणून डॉ. बाबासाहेबांचे अभिनंदन करणारे, कौतुक करणारे व्यंगचित्र काढावे असे कुणाला का सुचले नाही? पुन्हा राज्यघटनेच्या निमिर्तीचा इतिहास सांगण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे कुतुहल जागवण्यासाठी, विश्लेषणासाठी सल्लागारांना नेमके प्रेरणास्थानावर आघात करणारेच व्यंगचित्र कसे सापडले?

-सुहास यादव
-----------------------------------------------------------------------------------------------

1 comment:

Arvind Dorwat said...

सुहासराव,
नमस्कार! आपले लिखाण मोठे औत्स्युक्यपूर्ण आहे, खरे पण आहे, पण तुम्ही काळाची खोली नाही लक्षात घेतली. घटना वेळेत बनत नाही म्हणून त्या काळी घटना समितीवर असलेल्या सदस्यांचे प्रमुख म्हणून डॉक्टर पण जबाबदार होते. डॉक्टर घटना समितीला पुढे ढकलत आहेत असे उगाच काही लोकांना वाटले असे म्हणा. आणि त्या कालच्या नेहरू किंवा आणखी कोणाला घाई करावीशी वाटली तर तेदेखील बरोबर आहे. प्रत्येक जण आपापल्या जागी बरोबर आहे.आज काल, उगाच उद्योग नसलेल्या लोकांना महाभारत घडवण्यात रस असतो.