OPINIONMAKER

Sunday, February 13, 2011

पत्रकारांचा इगो आणि 'अटी लागू' माफी

नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरचित्रवाणी वृ्त्त वाहिन्यांच्या पत्रकारितेबाबत काही विधाने केल्यानंतर  पत्रकारांनी त्यांच्यावर  बहिष्काराचे अस्त्र उपसले. अजित पवारांनी त्यांच्या स्वभावानुसार या अस्त्राकडे ढुंकनही पाहिले नाही. आपण काहीच चुकीचे बोललेलो नाही आणि त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असे सांगून ते त्यावर ठाम राहिले.  त्यामुळे केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी * अटी लागू अशा प्रकारची दिलगिरी व्यक्त केल्यानंतर पत्रकर पुढार्‍यांनी तातडीने अजित पवार यांच्यावरील बहिष्कार मागे घेतल्याचे जाहीर करुन टाकले आणि या प्रकरणातून एक प्रकारे स्वतःची सुटका करुन घेतली.  मूळ मुद्दा आहे तो हे सगळे कशामुळे घडले. सध्याची पत्रकारिता आणि पत्रकारांना नोकरी म्हणून  काय गोष्टींना तोंड द्यावे लागते आणि अजित पवार यांचे राजकारण कशा पद्धतीने चालते?


गडकरी, तळवलकरांचा दबदबा  

महाराष्ट्रात एक काळ असा होता की, संपादक किंवा पत्रकाराचा दूरध्वनी आला म्हणजे मुख्यमंत्री,  मंत्र्यांना घाम फुटत असे. गोविंद तळवलकर, माधव गडकरी, वरुणराज भिडे ही त्यातील आघाडीची नावे. आता पत्रकाराचा फोन आला म्हणजे नेत्यांना वाटते हा जाहिरातीसाठी विनंती करणार किंवा  काहीतरी खासगी कामाची गळ घालणार. तेव्हा याला कटवावे कसे, असा विचार नेत्यांच्या मनात सुरु होतो. अनेकांना संध्याकाळच्या दारुची आणि समिष आहाराची व्यवस्था करुन घ्यायची असते.  संधी मिळणारा पत्रकार हेच करत असतो. ज्यांना संधी मिळत नाही ते स्वच्छ प्रतिमेचे म्हणून   वावरत असतात. जसे राजकीय नेते, नोकरशहा, न्यायाधीश, पोलीस  अशा यंत्रणांमधील काहीजण विकले जातात, पैसे घेऊन कामे करतात तशीच स्थिती पत्रकारितेत आहेत.  आदर्श गैरव्यवहार  खणून काढताना किती पत्रकारांनी दहा टक्के कोट्यातून फ्लॅट घेतले. कितीवेळा घेतले, त्यासाठी किती खोटी माहिती दिली, खोटे उत्पन्न दाखवले याच्या बातम्या कधीच येत नाहीत. किंबहुना अशी बातमी येणार अशी कुणकुण लागताच ती रोखण्यासाठी पत्रकार मंडळीच चोख बंदोबस्त करुन ती बातमी प्रसिद्धच होऊ देत नाहीत. त्यासाठी प्रसंगी राज्य मंत्रिमंडळतील मंत्र्याची मदत घेतली जाते.  आता प त्रकारच अशा प्रकारे  दुकानदारी करत असल्यामुळेच आता अनेक वृत्तपत्रांच्या मालकांनी स्वतःच पेडन्यूज सुरु करुन उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे.. गल्लीपासून दिल्लीपर्यंत पत्रकारितेत हेच चालले आहे. नीरा राडिया टेप प्रकरणावरुन तर एखद्या नेत्याला  विशिष्ट मंत्रिपद मिळावे म्हणून पत्रकार कशी मोहिम चालवतात हे उघड झाले आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील अशा घटना त्यामागे असणारे पत्रकार याची माहिती  वाचकांना आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या दर्शकांना कुठून तरी मिळतेच.
सनसनाटी बातमीचा हव्यास
सध्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरु आहे. अगदी बिस्किटे किंवा साबण, टूथपेस्ट विकणार्‍या कंपन्यांमध्ये जेवढी स्पर्धा नसेल तेवढी स्पर्धा प्रसिद्धीमाध्यमांमध्ये लागली आहे. त्यांना रोज नव्हे तर प्रत्येक क्षणाला काहीतरी वाजवत बसावे लागते. तेच तेच दाखवावे लागते. तेवढ्याने समाधान होत नाही म्हटल्यावर आहे त्याच गोष्टी व्टिस्ट करुन दाखवाव्या लागतात, लिहाव्या लागतात. सध्या प्रसिद्धीमाध्यमांना साधी-सरळ बातमी नकोच असते. ' मग त्यात काय एवढे,' असा सवाल करुन ती बातमी उडवून लावली जाते. त्यामुळे लोकांनाही काय केले म्हणजे बातमी येते हे समजू लागले आहे. हुशारी मंडळी म्हणजे इव्हेंटवाले तर आपल्या कार्यक्रमात काय व्हॅल्यू अॅडिशन केले म्हणजे बातमी होईल याचा आडाखा बांधूनच इव्हेंटचे नियोजन करतात. म्हणजे बिल्डरच्या कार्यक्रमात प्रकाश आमटेंना आणून बसवले की झगमगाटाला कशी करुणेची झालर येते आणि इव्हेंटची बातमी होते. नांदेड जिल्ह्यातील रुळ्याच्या पाटलालाही हे कळले आहे. त्यामुळेच धरणाच्या फुगवट्यात गेलेल्या आपल्या जमिनीची योग्य मोबदला मिळालेला नाही, असे पत्रक घेऊन तो वर्तमानपत्राच्या कार्यालयात गेला असता किंवा चॅनेलवाल्यांसमोर उभा राहिला असता तर त्याच्याकडे पत्रकारांनी ढुंकूनही पाहिले नसते. त्याउलट अजित पवारांच्या कार्यक्रमात आरडाओरड केली तर चॅनेलवाले आपल्याला मोप प्रसिद्धी देतील हे त्याला माहित होते. त्यामुळेच पवारांच्या कार्यक्रमात त्याने आरडाओरड सुरु केली. लगेचच चॅनेलवाल्यांना टीआरपीची बातमी मिळाली. आता त्यांचा दिवस साजरा होणार होता. लगेच त्यांचे कॅमेरे रुळ्याच्या पाटलाकडे वळले. त्यावर अजित पवारांनी चॅनेलवाल्यांना चार शब्द सुनावले की लगेच माध्यमांनी त्यांच्यावर दंडुकेशाहीचा शिक्का मारला. बहिष्कार घातला गेला.

दुःख कशाचे?

हा बहिष्कार अजित पवारांपेक्षा स्वतःचा इगो सुखावण्यासाठी जास्त होता हे नंतरच्या घडामोडींवरुन स्पष्ट होते. अजित पवारांचे राजकारण हे भावना, प्रतिमा यापेक्षा दाबावर जास्त चालते. त्यांनी  त्यांच्या कार्यकर्त्यांचे आणि मानणार्‍या नेत्यांचे नेटवर्क भक्कमपणे उभे केले आहे. नाक दाबले की तोंड उघडते या तत्त्वाचा ते वेळोवेळी वापर करत असतात आणि परिपक्वतेकडे वाटचाल करणार्‍या आपल्या लोकशाहीतील मतदारांना आणि राजकीय कार्यकर्त्यांना अद्यापही  हीच भाषा समजते. त्यामुळे पत्रकारांचा घोळका जमवून गप्पा छाटत बसलेले अजित पवार कधीच दिसणार नाहीत. किंबहुना ते पत्रकारांना आपल्या जवळपासही फिरकू देत नाहीत. बातम्या पेरून पत्रकारांच्या जीवावर त्यांचे राजकारण चालत नाही. मग जगातील कुठल्याही नेत्याला वाकवण्याची ताकद आपल्या  पत्रकारितेत आहे असा दांडगा आत्मविश्वास असणार्‍या पत्रकारांना उपमुख्यमंत्र्यांचे हे वागणे मानसिक त्रास देणारेच ठरत असते. कुठल्याही मंत्र्याच्या दालनातन किंवा बंगल्यात मी केव्हाही घुसू शकतो अशी शेखी या पत्रकारांना अजित पवारांबाबत मिरवता येत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि याचे पत्रकारांना जास्त दुःख आहे. चॅनेलवाल्यांना गाठून बाईट देण्याची गरज त्यांना वाटत नाही. पत्रकारांसाठी ते कधी रात्रीच्या पार्ट्या आयोजित करत नाहीत. 

आता बातम्या मिळण्यासाठी वृत्तपत्रे आणि चॅनेल एवढीच माध्यमे नाहीत. इंटरनेट, सोशल
नेटवर्किंग साईट, एसएमएस, ब्लॉग अशा अनेक माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोचत असते. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात आता या साधनांचा वापर करणार्‍यांचाही समावेश झालेला आहे हे मान्य करणे प्रस्थापितांना अद्यापही जड जात आहे. अर्थात या माध्यमातून मिळणारी कोणती माहिती कितपत विश्वासार्ह हे देखील लोक अनुभवाने ठरवू लागले आहेत. त्यामुळे बहिष्काराचे मध्ययुगीन हत्यार बोथट बनले आहे. 
-सुहास यादव
--------------------------------------------------------------------------------------


अजित पवार यांनी मिडियासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांची प्रतिक्रिया
प्रसारमाध्यमांना विचार करायला लावणारी आहे.


फॅसिस्ट कंगोर्‍याचा अविष्कार

ते म्हणतात, अजित पवार यांचे वक्तव्य पूर्णपणे निषेधार्ह आहे. परंतु आजकाल सरकार दरबारी, मंत्र्यांमध्ये आणि लोकांमध्ये मीडियाची विश्वासार्हता फार कमी झाली आहे. त्याचा संपूर्ण मीडियाने नीट विचार करुन ठोस अशी आचारसंहित करणे आणि त्याचे कठोर पालन करण्यासाठी स्वतःची नीट यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. जोपर्यंत मिडिया अशाप्रकारे आचारसंहिता न पाळत स्वेरपणे वागत राहिल तोपर्यंत राज्यकर्ते आणि सर्वसामान्य मीडियास सन्मान देणार नाहीत. मीडियाची विश्वासार्हता धोक्यात येणे म्हणजे भारतीय लोकशाहीचे अस्तित्व धोक्यात येणे आहे. याच अर्थ अजित पवारांचे समर्थन करणे, असा मुळीच घेऊ नये. अजित पवारंचे वक्तव्य त्यांच्या स्वभावातील फॅसिस्ट कंगोरर्‍याचा अविष्कार आहे, असे कोणाला वाटल्यास आश्चर्य नाही.
-------- ----------------------------------------------------------------------------

सिनियर पवारांच्या आव्हानाचे काय?

ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांनीही याविषयी विस्तृत भूमिका मांडली आहे. 'जिंकले कोण? पुढारी पत्रकार पुढारी? ' असा सवाल त्यांनी केला आहे. ते म्हणतात, पत्रकार नेत्यांवर बहिष्कार टाकू शकतो. पण तो बातमीवर बहिष्कार टाकू शकतो काय ? निषेधाचे इतरही मार्ग आहेत. मात्र, अजिबात बातमी न लिहिणार्‍या पत्रकारांची एक मोठी पिढी सगळीकडेच जोरात दिसते. ती बातमीवरही बहिष्कार टाकू शकते. पत्रकारितेचा मोठा वारसा देशाला देणार्‍या महाराष्ट्रात बातमीवरच बहिष्कार हा पायंडा ठरु नये. बातमी हा पत्रकारितेचा धर्म होय. बातमीशिवाय पत्रकारिता कशी असू शकते? मग बातमीवरच बहिष्कार टाकून आपण कुठली पत्रकारिता करु पाहत आहोत,  या प्रश्नाचेही उत्तर आता शोधायला हवे.

 या प्रकरणात पुतण्यासाठी काकांनी माफी मागितली असली तरी त्यातही शरद पवारांचे मुत्सद्दीपण
दिसते. राज्यातील ज्येष्ठ संपादकांनी नांदेडमधील भाषणाची टेप बघावी आणि त्यात अजित
पवारांच्या तोंडी छापून आलेली वाक्ये नसतील तर काय करावे, असे  आव्हानच त्यांनी दिले आहे.
पवारांच्या या मुत्सद्दी माफीवर लगेचच पत्रकार पुढार्‍यांनी अजित पवारांवर घातलेला बहिष्कार मागे
घेतला. त्यामुळे सिनियर पवारांनी दिलेल्या आव्हानांचे काय, असा आता प्रश्न आहे.
----------------------------------------------------------------------------------

9 comments:

Aniruddha Kulkarni said...

अनेक दिवसांनी परखड पत्रकारिता वाचण्यात आली....तंबूमधल्या व्यक्तीनेच शल्यचिकित्सा करताना तुझा "केसरी" बाणा वाखाणण्याजोगा आहे...

Arvind Reddy said...

satyachya javal janyacha prayatna changla aahe. ajun saglech patrakar vikle gele nahit yavar visvas thevava, ase maze mat ahe.

Anand Patil. Mumbai said...

liked the issues raised in it. common has respect for marathi newspaper journalists as yet. people still make their opinions based on what they read in newspapers. you and me know the reality of paid news. i have seen how much Sakal changed in lst five years.

still i think you are giving too much room to Shri ajitdada which he doesnot deserve. what are his achievements ? has given a new direction to maharashtra state ? he has no control over his party ministers and cant have it till his uncle is alive. too much is being said about the decision maker under the mask of arrogant person. maharashtra is day by day going downhill and once supposedly progressive maharashtrian mindset is becoming regressive. We are not moving forward but moving into a feudal world ruled by local landlords who have no concern about common man's well being. ajit dada is no different. of course you may some inside information.

arun khore said...

we r all in mess.as a journalist for long term,we puzzled today.as arun sadhu rightly mentioned about dukandari of some journo.now media & politicians r frends for their vested interest.nobody worry for this relations.in mumbai,this relationship is at peaK.egos & vest.interest r complimentary these days.less talk is better.whoever possible,do our work sincerely,honestly be our motto.arun khore,pune.

Anonymous said...

मी हा लेख सकाळीच वाचला मोबाईल वरुन..
अतिशय सडेतोड आणि स्पष्ट प्रतिक्रिया अनुभवली ते वाचताना..!!
या विषयाशी संबंधित पत्रकारच जास्त बोलत आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया वाचून मला थोडे हसू येत होते.. कोणी पत्रकार दोषी पवार बरोबर तर पवार दोषी पत्रकार बरोबर वगैरे बोलत आहेत.. या सा-याला तडा देत एक वेगळा चेहेरा समोर आणण्याचा तुमचा परखडपणा प्रचंड भावला..
मी तटस्थपणे या विषयाकडे पाहत असल्याने मला त्यातल्या जात्याच गंभीर परंतु छुप्या राजकारणाची मजा वाटते आहे..
परंतु या पलिकडे तुमचे लेखक आणि परखड पत्रकार म्हणून कौतुक वाटले
बाकी विषयाशी मला रस नसल्याने योग्य अयोग्य बाजूंकडे मी रितसर कानाडोळा केला आहे.. :-)

Admin said...

फार चांगला आणि परखडपणे लिहलेला लेख! योगायोगाने याच विषयावरील माझी पोस्ट "अखेर अजितदादा पवारच जिंकले" १३ फेब्रुवारी २०११ रोजी "आगळ वेगळ" या माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध झाली आहे. त्याची दखल 'मुख्यमंत्री कार्यकर्ता' या ब्लॉगवर सुद्धा घेतली आहे.
http://nathtel.blogspot.com/2011/02/blog-post_13.html
http://mukhyamantri.blogspot.com/2011/02/blog-post.html

Pramod Kulkarni said...

तुझी प्रतिक्रिया योग्य आहे... ह झटका दोघांनाही आहे... सत्तेच्या गुर्मीत राहणार्‍यांना शब्दांचे महत्व समजावे आणि आपण म्हणू/ करू तीच पूर्व असे मानणार्‍या पत्रकारांनाही वास्तवाचे भान यावे, हाच या घटनेचा मतितार्थ...शेवटी हे सगळे पुरोगामी-मतस्वातंत्र्यवादी..! त्यांना कोण काय सांगणार..?

Mahesh Jadhav said...

Hello…

Khupach bhari shabdanmadhe. Mandala aahe lekh . . .sadetod mhanatat tasa…

Patrakaritecha bajar zalela disat aahech.. pan rajyakartyancha tari kay chalu aahe? Mala Politics madhala kahi kalat nahi..

Pan apla Maharastra khup mage chalala aahe .. yacha sadiva dukha vatun rahata sadhya..

Jeva Gujrat aani Biharchya batmya vachto… teva tar man atishay khinna houn jata… khup vait vatat…

Aso…

Tumacha ha navin chehara pahayla milala…

U knw I am in US aani Saturday la parat yet aahe.. next week madhe me phone Karen…

See you ssoon

-Mahesh

श्रीरंग गायकवाड said...

प्रिय सुहासजी,
चांगलं लिहिलंत तुम्ही. तुम्हीच म्हणता त्याप्रमाणं आता पत्रकारितेवरही कुणाची मक्तेदारी राहणार नाही. मुद्दा सामान्य माणसाच्या प्रश्नांचा आहे. त्यामुळं चॅनेल्सवाल्यांसमोर नाही बोलू दिलं तर रुळ्याचे पाटील पेपरवाल्यांचं डोकं खातील, त्यांनी नाही ऐकलं तर इंटरनेटच्या चव्हाट्यावर जाऊन बोंब मारतील. इजिप्तमध्ये तेच झालंय. त्यामुळं वेळ आहे, राजकारण्यांनी शहाणे होण्याची आणि आपण आपला धर्म पाळण्याची!