OPINIONMAKER

Sunday, February 20, 2011

श्रीमंत जगायचय का श्रीमंत मरायचय?

- मयुरेश कुलकर्णी  (अतिथी लेखक)

तुम्हाला काय करायचय, श्रीमंत जगायचय का श्रीमंत मरायचय? मी या एका प्रश्नाच्या दोन्ही बाजू मांडणार आहे. शेवटी या प्रश्नाचं उत्तर किंवा याच्यावरचा निर्णय हे तुमच्याच हातात आहे.
आपण 'श्रीमंत मरायची' बाजू आधी बघुयात. 'श्रीमंत मरायचं' या विचाराची सुरुवात माझ्या डोक्यात एका घटनेमुळे झाली.....

मी माझ्या चुलत बहिणीशी बोलत असताना, तिने मला सांगितले की त्यांच्या ऑफिसातला एक मुलाचे हार्ट ऍटॅकने निधन झाले. त्याचे वय २४ ते २५ वर्ष होते. मला धक्का बसला. इतक्या लहान वयात हार्ट ऍटॅक? आणि काही पूर्व कल्पना किंवा आजार नसताना? मी पुढे ऐकू लागलो. तो मुलगा खूप हुशार होता. सी. ए. आणि सी. एस. शिकलेला, सी.ए. ला रॅंक होल्डर होता. शिक्षणानंतर चांगली नोकरी, चांगला पगार मिळाला. हे सगळं ऐकताना मी त्या हार्ट ऍटॅकचे कारण शोधत होतो. ते मला लवकरच मिळाले. चांगल्या पगाराबरोबर येणारा कामाचा भार आणि त्यामुळे मनाला होणारा त्रास. काम करत असल्याने तो सतत ऑफिसात असायचा. त्याचं चित्र माळ्या डोळ्यासमोर लगेच उभं राहिलं. सकाळी झोप पूर्ण झाली नसेल तरी उठायचं, लवकरात लवकर तयार होऊन ऑफिसला जायचं आणि रात्री किंवा मध्य-रात्री परत घरी येऊन झोपायचं. आई-वडिलांबरोबर राहात असेल तर घरचं जेवण तरी मिळेल नाहीतर रोज बाहेरचं खायचं. रोज हे केल्यावर, शनिवारी सुट्टी असलीतरी ऑफिसात जाऊन काम करायचं, किंवा ऑफिसमधलं काम घरी आणून करायचं. रविवारी काम नसेल तर आठवडाभर न झालेली झोप भरून काढायची, किंवा मित्रांबरोबर रात्री उशीरापर्यंत बाहेर फिरायला जायचं. म्हणजे परत विश्रांती नाही, आणि रविवार गेला की परत सोमवारी ऑफिस, ऑफिस आणि परत ऑफिस. ऑफिस सोडून दुसरं काही केलं नाही तर कामाचा ताण जाईल कसा? हे असं चित्र कितीतरी लोकांचं आहे.

आपण लहानपणापासून मुलांना नोकरीसाठी घडवतो. चित्रकलेची किंवा गाण्याची कितीही आवड असली तरी त्याला गणिताचे पाढे पाठ करायला लाऊन, पुढे इंजिनियर आणि डॉक्टर करतो. एखाद्या यंत्रासारखं शिक्षण संस्थांतून असे हजारो-लाखो इंजिनियर, डॉक्टर आणि सी.ए. वगैरे बाहेर पडत आहेत. पालकांची चूक नाही कारण ते त्यांच्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठीच असं करतात. चित्रकार होऊन काय होणार? कवि झाला तरी पोट कसं भरणार? मग एम.बी.ए. झाला तर चांगली नोकरी लागेल, असेच विचार सगळे करतात. आणि यात काहीही चुकीचं नाही, हीच आजची परिस्थिती आहे. पण जर आपण आपल्या मुलांना नोकरीसाठी शिकवतो, तर नोकरी नंतर काय? आधी जो मुलगा १४-१५ तास नोकरी मिळण्यासाठी आभ्यास करत असतो, परिक्षा देत असतो, तोच मुलगा आता १४-१५ तास नोकरी टिकावी म्हणून ऑफिसमध्ये अडकून पडला असतो. 'आपण नोकरी का करतो?', या प्रश्नाला लगेच उत्तर मिळतं की 'पैसे मिळावे म्हणून नोकरी करतो'. मग असा प्रश्न केला 'आपल्याला पैसे का कमवायचे आहेत?' तर असं उत्तर मिळतं की 'आपल्याला कुठे काही कमी पडायला नको. आपल्याला आपल्या लोकांबरोबर पाहिजे तेवढी मजा करता आली पाहिजे म्हणून पैसा पहिजे'. जर असं उत्तर असेल तर नोकरी आपण बरोबर उलटं करतो. नकोशी झालेली कामं, नकोशा झालेल्या लोकांसाठी, आपण नको तेवढा वेळ देऊन करत असतो. शिक्षण हे आपल्याला जे पाहिजे ते करण्याचं स्वातंत्र्य देत नाही. शिक्षण आपल्याला नोकरी देतं आणि आपण रोज १४-१५ तास काम नाही केलं तर आपली नोकरी दुसऱ्याला दिली जाईल अशी भिती देतं. आणि यात कोणाचीच चूक नाही, तुम्ही कोणावरच आरोप लावू शकत नाहीत. ऑफिसात बॉसला काही बोलू शकत नाहीत कारण तो पण त्याची नोकरी वाचवण्यात गुंतलाय. तो पण याच चक्रात अडकलाय. तुम्ही काम करत असलेल्या कंपनीला काही बोलू शकत नाहीत कारण तुम्हालाच नोकरी पाहिजे होती म्हणून तुम्ही स्वत:हून त्यांच्याकडे गेलात. तुम्हाला पगार देतात म्हणूनच तुमच्याकडून काम करून घेतात, म्हणून त्यांची पण काही चूक नाही. तुमच्या पालकांना तर तुम्ही काही बोलूच शकत नाही कारण आज त्यांच्यामुळेच तुमच्याकडे शिक्षण, नोकरी आणि आर्थिक स्वातंत्र्य आहे. शेवटी काय, चूक कोणाचीच नाही पण तुम्हाला नोकरी असून, तुमच्याकडे पैसे असून तुम्हाला जे करायचय ते तुम्ही करू शकत नाहीत. म्हणूनचे जिवंत असूनही जगतोय असं वाटत नाही.

आपल्याकडे पैसे किंवा नोकरी नसताना आपल्याकडे किती स्वप्न असतात. आपल्याला कित्येक गोष्टी करायच्या असतात आणि आपण स्वत:ला सांगतो की पैसा आला की हे करायचं, शिक्षण संपल्यावर ते करायचं. वेगवेगळ्या लोकांच्या मजेच्या व्याख्या वेगळ्या आहेत आणि मजा म्हणून करण्यासारख्या पण कितीतरी गोष्टी आहेत. लोकं आवड म्हणून क्रिकेटचे सामने बघायला जातात. माझे काही मित्र तर शहरातल्या विविध हॉटेलात जाऊन त्यांना आवडणारे पदार्थ खातात आणि त्या हॉटेलांबद्दल लोकांना सांगतात. त्यांना खाण्याची इतकी आवड आहे की ते कोणत्या हॉटेलात काय चांगलं मिळतं हे पटकन सांगू शकतात. काहींना फिरायला जायची आवड असते, तर काहींना वाचनाची. काही नाचायला, गायला शिकत असतात तर काही आवड म्हणून हे सगळं शिकवत असतात. हे सगळं करण्यासाठी आवड आणि वेळ लागतो. पण जर माणूस बराचसा दिवस ऑफिसात काम करून आला तर त्याला स्वत:साठी, ही सगळी मजा करायसाठी वेळ आणि ताकद कशी मिळणार. जे लोकं म्हणतात की त्यांच्याकडे वेळ नाही ते हे पण म्हणतात की ते रिटायर झाल्यावर मजा करतील. पण इतकी वर्ष रोज १५ तास ऑफिसचं तोंड बघत राहिल्यावर अचानक रिटायर झाल्यावर मजा कशी करणार. यांना मजा करायला पण हळूहळू शिकावं लागेल. तो पर्यंत कदाचित कशाची आवड बाकी राहिली नसेल. आवड नसली आणि काही करायला नसेल तर चिडचिड होते, जवळच्यांना त्रास होतो. माणूसं हसत आणि मजा करत जगायच्या ऐवजी निराश होतात. मग हे असे रिटायर झालेले देह आणि थकून गेलेली मनं जेव्हा ही धरती सोडून जातील तेव्हा त्यांच्या बॅंकेच्या खात्यात भरपूर काही असेलही, पण मजा करण्याच्या खात्यात काहीच नसेल. ही झाली श्रीमंत मरायची बाजू. आता याच्या अगदी विरूध्द म्हणजे श्रीमंत जगण्याची बाजू बघुयात.

जसा श्रीमंत मरणाचा, देह आणि मन हे दोन्ही मरण्याशी संबंध होता तसाच श्रीमंत जगण्याचा पण आहे. श्रीमंत जगा, म्हणजे भरपूर खर्च करा किंवा गरज नसलेल्या गोष्टींवर पैसे खर्च करा असं मुळीच नाही. शिक्षणामुळे जसं आपल्याला आवडतं ते काम करण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, तसं संपत्तीमुळे आपल्याला जसं जगायचं आहे तसं जगायला मिळावं हे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. म्हणूनच श्रीमंत जगायचं म्हणजे मजेत, जिवनाचा आनंद घेत आणि आपल्या जवळच्यांना आनंद देत जगावं. असं जगायला लागलं की ऑफिसच्या कामाचा ताण पण कमी होतो. असं जगण्यासाठी वेळ आणि आवड यांची गरज आहे. आवड प्रत्येकाच्या वेगळ्या असतात पण वेळ असतोच असं नाही. आपल्या कामाने भरलेल्या दिवसातून स्वत:साठी वेळ कसा काढावा हा फार मोठा विषय आहे, पण जर खरंच प्रयत्न केला तर वेळ काढता येतो. एकदा माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्राला मजेतच सांगितलं होतं "मी रोज मुलं उठायच्या आधी ऑफिसला निघतो आणि रात्री मुलं झोपल्यावर घरी येतो. काही दिवसांनी माझ्याबद्दल मुलं हीला विचारतील 'आई, ते रविवारी आपल्याकडे येतात ते 'काका' कोण ग?'" म्हणूनच ज्यांच्या भविष्यासाठी तुम्ही इतका वेळ ऑफिसात असता, त्यांना आज वेळ देता येईल म्हणून तरी दिवसातून थोडा वेळ काढा. कुठल्याही नात्याला किंवा मैत्रिला मजबून करायला वेळ लागतो. पैसे कमी असतानाही एक सॅंडविच मित्राबरोबर वाटून खाताना जशी मजा येते तसंच कोणत्याही नात्याबरोबर वेळ घालवला की ते पक्कं होतं. आजच्या सुसाट धावणाऱ्या जगात, आपल्यासाठी थांबून आपलं ऐकायला कोणीतरी आहे हीच कित्येकांसाठी एक खूप मोठी गोष्ट असते. एकदा वेळ काढायचा ठरवला की वेळ काढला जातो, आणि वेळ असला की काहीही मजा करता येते. माझ्या माहितीतला एक माणूस ऑफिसातून घरी आला की गाण्याचा रियाज करतो, रत्री कितीही उशीर झाला तरी. एक पती-पत्नी दर शनिवार-रविवारी कुठेतरी फिरायला जातात, मग ते ठीकाण कितीही जवळ किंवा दूर असो. काही लोकं सेवा म्हणून जवळच्या ग्रंथालयात, देवळात किंवा अशा संस्थात जाऊन श्रमदान करतात. कित्येक लोकं सिनेमा आणि नाटकं चुकवत नाहीत. एकदा वेळेचा नीट वापर करायला शिकलो तर आपण आपल्याला पाहिजे त्या गोष्टींसाठी वेळ तयार करू शकतो. शाळेत असताना, आभ्यासामुळे जर आपल्याला चित्र काढता आली नसतील तर काम करून घरी आल्यावर आपण चित्रकार बनू शकतो. मग पुढे कोणी विचारलं की तुम्ही काय करता तर सांगता येईल की "मी चित्रकार आहे आणि वेळ मिळाला की मी या कंपनीत नोकरी पण करतो." नोकरी आपली ओळख होत नाही, ती आपलं काम होते. मग नोकरी आपलं जीवन होत नाही, ती फक्त मजा करायला मिळावी म्हणून खर्च केलेला वेळ होते. अर्थात नोकरीतही मजा करता येत नाही असं नाही. जर आपल्याला आवडणारं काम असेल तर आपण ऑफिसात पण सुखी असू शकतो. असं असेल तरी आपण स्वत:साठी आणि आपल्या जवळच्या व्यक्तिंसाठी वेळ काढला पाहिजे. कशाचाही अतिरेक करू नये, सगळीकडे थोडी-थोडी मजा करावी. माझं स्वत:चं उदाहरण म्हणजे आम्ही तीन मित्र महिन्यातून एकदा कॉफी प्यायला भेटतो. तसं बघायला गेलं तर फार काही मजा असेल असं वाटत नाही. पण ३-४ तास कसे जातात ते कळत नाहीत. गप्पा होतात, चेष्टा-मस्करी होते आणि कॉफीच्या नादात गेलेला महिना काय घेऊन आला आणि काय घेऊन गेला याची चर्चाही होते. मित्रांबरोबर असताना गप्पांना विषय पण लागत नाहीत, आणि एक संध्याकाळ मस्त मजेत जाते. मग परत पुढचा महिनाभर अशा संध्याकाळची वाट बघितली की कामाचा किंवा आभ्यासाचा ताण जाणवत नाही.

अशा साध्या-सोप्या गोष्टीपण आपलं जगणं श्रीमंत करू शकतात. तसं बघितलं तर छोट्या-छोट्या गोष्टीतूनच मोठ्या गोष्टी होतात. जसं दररोज स्वत:ची काळजी न घेतल्याने एकदा अचानक त्या मुलाला हार्ट ऍटॅक आला, तसं रोज थोडा-थोडा वेळ काढून आपण स्वत:ला खुश केलं तर बघता बघता आठवडा मजेत जाईल, मग महिना, मग वर्ष. कामाचा भार जड वाटणार नाही, मन हलकं कसं करावं असे प्रश्नच पडणार नाहीत आणि दिवसातला वेळ कधी कमी पडणार नाही. एका मित्राकडून मी एक सुंदर विचार ऐकला होता की पैसा खिशात असावा पण तो डोक्यात जायला लागला की माणूस बिघडतो. म्हणजे पैसा खिशात आणायचा जसा प्रयत्न केला पहिजे तसच तो डोक्यात जाता कामा नये याची पण काळजी आपण घेतली पाहिजे. श्रीमंत जगायचं म्हणजे नुसतच श्रीमंत बनायचं असं नाही तर मजेत, सुखात जगायचं. अशाने आपल्या जवळची लोकं पण आनंदी होतात, आपण नव्या-नव्या गोष्टी शिकतो, आपल्याला पहिजे ते करतो आणि बॅंकेच्या खात्यात किती आहेत आणि किती असले पाहिजेत याची जास्त चिंता करत नाहीत. आता परत सुरूवातीला विचारलेला प्रश्न. तुम्हाला काय करायचय, श्रीमंत जगायचय का श्रीमंत मरायचय? मला माझं उत्तर मिळालय, तुम्हाला तुमचं उत्तर शोधायचय.
http://mayureshkulkarni.wordpress.com/
--------------------------------------------------------------------------------------

1 comment:

Shirin said...

Kharach...khup mast vichar mandalai Mayureshne. Manachi shrimanti vadhavanyasathi far kami lok kasht ghetat, pan paishyane shrimant honyasathi sagalech apale aushya gamavatana disatat, may be this artical can be eye opener for such people!