OPINIONMAKER

Saturday, September 27, 2008

मराठ्यांनी मानसिकता बदलण्याची गरज

आपले शोषण कोणाकडून होते आहे, खरेच आपली प्रगती झालेली आहे का, आपण बदलायला तयार आहोत का, याचा विचार मराठा समाजाने करण्याची गरज आहे. मराठा जातीच्या नावावर राजकारण करणार्‍या नेत्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. त्याचबरोबर उठसूठ कुणीही शिवाजी महाराजांचे नाव घेतले की आपण भारावून जाण्याची किंवा चवताळून उठण्याची गरज नाही. कारण शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन स्वराज्याची निर्मिती केली होती. त्यामुळेच सगळ्या समाजाचे नेतृत्त्व करण्यासाठी सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन त्यांना प्रगतीच्या संधी दिल्या पाहिजेत. आरक्षण मागण्याऐवजी दूध व उस उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण करुन स्वतःचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना घरी बसवले पाहिजे.


समाज सध्या संभ्रमावस्थेत सापडला आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून इथल्या राजकारणावर मराठा जातीचा प्रभाव आहे. विधानसभेत मोठ्या संख्येने मराठा आमदार निवडून येतात. अगदी मंत्री-मुख्यमंत्री होतात. त्यापैकी अनेकांनी आपल्या घराण्याचा मोठाच उत्कर्ष साधला आहे. पण अशी घराणी अगदीच थोडी आहेत आणि ती आपल्याच उत्कर्षात मश्‍गुल आहेत. त्याचवेळी तालुक्‍याच्या ठिकाणी, ग्रामीण भागात असलेला मराठा समाज मात्र दारिद्य्राच्या खाईत लोटला जात आहे. राज्यात दोन्ही कॉंग्रेसमध्ये असलेले मराठा समाजाचे नेते केवळ आपली प्रगती कशी होईल, आपली आमदारकी, मंत्रिपदे, सत्तास्थाने. संस्थारुपी संस्थाने कशी टिकून राहतील यातच गुंतले आहेत. मराठा समाजाच्या मतांवर निवडून येऊनही समाजाची त्यांना फारशी फिकीर नसल्याचे दिसते. सहकारी संस्था आणि दूधसंस्थांच्या माध्यमातून शेतीवर अवलंबून असलेल्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण याच नेत्यांकडून होते. त्यांच्यापैकी अनेकांनी सहकारी संस्था, पतसंस्था मोडून खाल्ल्या. अगदी साधे उदाहरण घेऊ साखर कारखान्यांचे आणि दूध संस्थांचे. या संस्थांचे अर्थकारण आणि त्यातून कोट्यावधी रुपयांचे सायफनिंग यावरच या नेत्यांचे राजकारण चालते. उसाला भाव देता येत नसेल तर कारखाने बंद करा. शेतकऱ्यांचा बिल्कुल आग्रह नाही की कसेही करुन साखर कारखाने चालले पाहिजेत. बहुतेक कारखान्यांमध्ये निधीचे सायफनिंग कसे केले जाते हे शेतकऱ्यांना चांगले माहित आहे. उद्योजक एखादा व्यवसाय चालत नसेल तर तो बंद करुन टाकतो. मग त्यावेळी कामगार देशोधडीला लागतात की त्यांची कुटुंबे उध्वस्त होतात, याची फिकीर करत नाहीत. मग शेतकऱ्याच्या उसाला भाव देता येत नसेल, त्यांचे आर्थिक शोषण होत असेल तर अशी कारखानदारी काय कामाची? पुन्हा शेतकऱ्यांचे प्रपंच चालले पाहिजेत म्हणून हेनेते ठराविक कालावधीनंतर नियमितपणे कोणत्या ना कोणत्या रुपाने कारखान्यांना सरकारकडून पॅकेज मिळवत असतात. तरीही सहकारी कारखानदारी नफ्यात चालत नाही कारण सहकार क्षेत्रात विश्‍वस्त म्हणून काम करण्याऐवजी हे नेते आपली घरे कशी भरतील आणि शेतकऱ्याला असहाय बनवून त्याला आपल्याचा दावणीला कसे बांधता येईल अशी यंत्रणा उभी करुन ती कायम राहावी म्हणून सतत कार्यरत असतात. अशी जागृती त्यांना समाजाच्या भल्यासाठी दाखवता येत नाही।

जाब विचारा!
तोच मुद्दा दूध संस्थांचा। मराठा समाजातील बहुतेक नेत्यांनी सहकारी दूध संस्था मोडीत काढून आपल्या खासगी दूध संस्था प्रत्येक तालुक्‍यात निर्माण केल्या आहेत. शेतकऱ्यांकडून आठ आणि दहा रुपयांनी दूध गोळा करुन हे दूधसम्राट शहरामध्ये ते 25 ते 30 रुपये लिटरने विकतात. दूध संकलन-साठवण, पॅकिंग, वितरण याचा लिटरमागे अगदी पाच रुपये जरी खर्च धरला तरी हे सम्राट रोज लिटरमागे दहा ते पंधरा रुपये कमाई करतात. अशा प्रकारे ते रोज कोट्यावधी लिटर दूध वितरीत करत असतात. शेतकऱ्याला भाव देण्याचा प्रश्‍न येतो तेव्हा शासनातील ही प्रभावी मंडळी आडवी पडतात. त्यामुळे या मंडळींचे राजकारण, भरभराट ही मराठा समाजाचे शोषण करुन चालली आहे, हे या समाजाने लक्षात घेतले पाहिजे. कारखान्याच्या विकासनिधीतील पैसा वळवून अनेकांनी ट्रस्ट स्थापन केले आहेत. शिक्षणसंस्था काढल्या आहेत. अनेकांनी मराठा समाजाच्या जिवावर आमदारकी, मंत्रिपदे मिळवून शिक्षणसंस्था उभ्या केल्या आहेत. त्यासाठी सरकारकडून मुंबई-पुण्यासारख्या शहरातील मोक्‍याचे भूखंड कवडीमोल भावाने मिळवले आहेत. हे सगळे समाजाने त्यांना पाठिंबा दिला, निवडून दिले म्हणून. पण याच संस्थांच्या अभियांत्रिकी-वैद्यकीय आणि व्यावसायिक शिक्षणाच्या महाविद्यालयांमध्ये मराठा समाजाच्या किती मुलांना प्रवेश दिला जातो? नोटांची पुडकी घेऊन गेल्याशिवाय हे नेते तुम्हांला उभेच करत नाहीत. अन्य राज्यातून अशी पुडकी घेऊन येणारी राजकीय नेत्यांची, उद्योजकांची, शासकीय सेवेतील उच्च अधिकाऱ्यांच्या मुलांना हा संस्थांमध्ये पायघड्या घातल्या जातात. अगदीच शहरात राहणारा थोड्या वरच्या आर्थिक पातळीवरील मराठा समाजातील मुलगा असला तरी त्याच्या वडिलांना कर्ज काढूनच अशा संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. या गावातील पारावरच्या गप्पा नाहीत. हे दाहक वास्तव आहे. यंदा सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका मुलीने दहावीनंतर पुण्यात शिकायला मिळावे म्हणून केंद्रीय प्रवेश पद्धतीतून अर्ज केला होता. पुण्यात वसतिगृहात राहायला मिळावे म्हणून तिने वसतिगृह असलेल्या महाविद्यालयांना प्राधान्यक्रमात पसंती दिली होती. तिला दहावीला 78 टक्के गुण मिळाले होते. मराठा समाजातील मंत्री असलेल्या एका शिक्षणसम्राटाच्या संस्थेच्या महाविद्यालयात तिचा नंबर लागला. या महाविद्यालयाला जोडून असलेल्या वसतिृहात दहावीच्या 30 मुलींची सोय असल्याचे प्रवेशअर्जात नमूद करण्यात आले होते. त्या मुलींच्या वसतिगृहाच्या कार्यालयात अर्जाची मागणी करण्यासाठी तिचे नातेवाईक गेले तेव्हा प्रथम त्यांना अशा जागाच नसल्याचे सांगण्यात आले. त्यांनी अगदीच काकुळतीला येऊन गयावया केल्यावर त्यांना सांगण्यात आले की, पाचशे रुपये भरुन कशाला अर्ज घेता तुम्हांला इथे वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही. कारण आम्ही एखाद्याच मुलीला प्रवेश देतो. बाकीचे प्रवेश लाखो रुपयांची पुडकी घेऊन येणाऱ्या अन्य राज्यातील मुलींना म्हणजे अभियांत्रिकी, फार्मसीला प्रवेश घेणाऱ्यांना दिला जातो. त्याचवेळी पुणे जिल्ह्यातील मंचरजवळच्या छोट्या गावातून आलेल्या शेतकऱ्याच्या मुलीचाही त्याचा कॉलेजला नंबर लागला होता. मात्र, मुलीला वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही म्हटल्यावर त्याचा चेहरा पडला. ही घटना मला कुणी सांगितलेली नाही. मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेली आहे. समजा त्या मुलीला प्रवेश मिळाला असता तरी त्या वसतिगृहात राहण्याचा वार्षिक खर्च ४८ हजार रुपयांपासून सुरु होतो. मग आम्ही शिकायचे कसे. व्यावसायिक शिक्षण घ्यायचे कसे? पुन्हा विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (एसईझेड) हे आमच्या जमिनी घेणार. तिथे उभ्या राहणाऱ्या उद्योगात नोकरी द्या म्हटले तर आम्हांला शहाणपण शिकवणार की तुमच्या मुलाकडे व्यावसायिक शिक्षणाची पदवी किंवा कौशल्य नाही म्हणून. मग सांगा लाखो रुपये भरून ह्यांच्या शिक्षणसंस्थांमध्ये आमची मुले-मुली व्यावसायिक शिक्षण घेऊ शकत नाहीत. दुसरीकडे आमच्या जमिनी ओरबाडता. मग आम्ही करायचे काय? त्यावेळी हे हेच मराठा समाजाचे नेते व्यासपीठावरुन शाहू-फुले-आंबेडकर अशी आरोळी ठोकून पुरोगामी विचार मांडत असतात, मुलींना उच्च शिक्षण द्या म्हणतात, प्रत्यक्षात मात्र शिक्षणाचा धंदा चालवतात. त्यात कोणतीही तडजोड किंवा सामाजिक दृष्टीकोन त्यांच्याकडे नसतो, ही दाहक वस्तुस्थिती आहे. मराठा समाज नेत्यांना जाब विचारत नाही, निवडणुकीत त्यांना धडा शिकवत नाही तोपर्यंत हे असेच चालणार? आपले शोषणकर्ते हे आपल्याच मतांवर निवडून जाणारे आपले नेते आहेत.

आरक्षणाचे मृगजळ?
ज्या शिवाजी महाराजांचा उल्लेख करुन सतत मराठा समाजाला गुंगीत ठेवले जाते त्या राजाने रयतेचे शोषण करणाऱ्या वतनदारांची वतने आणि देशमुख्या जप्त केल्या होत्या। आज जर का ते असते तर त्यांनी समाजाचे शोषण करणाऱ्या या संस्थांवर रयतेचे प्रतिनिधी नेमले असते आणि नेत्यांची दुकाने बंद केली असती.आता आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला नवे गाजर दाखवले जात आहे. मुळात मराठा समाजाला आरक्षण देण्यात अनेक घटनात्मक अडचणी आहेत. त्यामुळे आज ही समिती, उद्या ते कमिशन, परवा कुठला तरी अहवाल असे करत आरक्षणाचा मुद्दा निवडणुकीपर्यंत जिवंत ठेवण्यात येईल. राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आरक्षणाच्या प्रश्‍नी सहानुभूती दाखवली आहे. मराठा समाजाने यामुळे अजिबात हुरळून जाण्याची गरज नाही. मुख्यमंत्रीसाहेब तुम्हाला खरेच असे वाटत असेल तर शासकीय पातळीवर काय व्हायचे असेल ते होईल पण तुमच्या ताब्यात असलेल्या शिक्षणसंस्थेची पुण्यात अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. तिथे मराठा समाजासाठी तुमच्या अधिकारात किती आरक्षण ठेवणार ते पहिल्यांदा सांगा. स्वतः लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहण्याची तयारी करुन लातूर विधानसभा मतदारसंघ तुम्ही तुमच्या मुलासाठी आरक्षित करुन ठेवला आहे. तिथे मराठा समाजातील गरीब शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी देऊन निवडून आणाल का? कारण हे एक प्रकारचे आरक्षणच आहे. आता आश्‍वासने आणि मृगजळामागे धावणे म्हणजे स्वतःची फसवणूक करणे हे मराठा समाजाच्या लक्षात आले आहे. पिढ्यानपिढ्या सत्ता उपभोगणाऱ्या या नेत्यांना, मराठ्यांनी आपली ताकद मतपेटीतून दाखवली नाही, तर ते शोषणाचे कार्य चालूच ठेवतील.शिवाजी महाराजांचे नाव घेतले की मराठा समाज हुरळून जातो याचे अलीकडचे उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात स्मारक उभारण्याच्या प्रश्‍नावरुन निर्मा करण्यात आलेले गोंधळाचे वातावरण. शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या सामान्य लोकांना बरोबर घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. ते रयतेचे राज्य होते. तिथे कोणत्याही जातीच्या किंवा धर्माच्या द्वेषाला स्थान नव्हते. त्याउलट सध्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध म्हणजे मराठा समाजाच्या अस्मितेवर घाला असे चित्र निर्माण करण्यात काही राजकारणी मंडळी यशस्वी झालेली दिसतात. मराठा समाजाच्या हितापेक्षा स्वतःच्या राजकीय पुनर्वसनाचा भाग त्यात अधिक असतो हे लक्षात घेतले पाहिजे. आज मुंडेंच्या दारात, उद्या पवारांकडे, कधी ठाकरेंकडे ही मंडळी फिरत असतात. त्यांच्यापासून सावध रहा. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुला-मुलींसाठी रास्त शुल्कात पुण्या-मुंबईत आणि जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृहे बांधण्याची मागणी कुणी करत नाहीत. ज्यांना स्मारक उभे करायचे आहे त्यांनी ते अवश्‍य करावे. त्याला कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही. पण, आपल्या मुलामुलींना उच्च दर्जाचे व्यावसायिक शिक्षण मिळाल्यामुळे आपल्याला प्रगतीची दारे खुली होणार आहेत, की स्मारक बांधणाऱ्यांच्या मागे धावल्यामुळे प्रगती होणार आहे, याचा विचार मराठा समाजाने करण्याची नितांत गरज आहे.

खरे "धर्मकार्य' कोणते?
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केवळ नेत्यांना दोष देऊन भागणार नाही। खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये टिकून राहायचे असेल, प्रगती करायची असेल तर स्वतःमध्ये आमूलाग्र बदल करण्याची तयारी केली पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण विचार करणेच बंद केले आहे. आपल्या हिताचे काय, प्रगती कशामुळे होणार आहे, आपले कोण, परके कोण हे आपल्याला समजेनासे झाले आहे. शिवाजी महाराजांनी कोणता विचार दिला, त्यांचे तत्वज्ञान काय होते हेच आपण विसरुन गेलो आहोत. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन धर्माच्या आधारावर द्वेष करण्याची शिकवण गेल्या चाळीस-पन्नास वर्षात इथल्या समाजात जाणीवपूर्वक रुजवण्यात आली आहे. आता तीच राजांची शिकवण असे आपण मानू लागलो आहोत. आपल्या मेंदूवर द्वेषाची पुटे चढवली जात आहेत. अशी पुटे चढली की माणसाची विचार करण्याची शक्ती संपते. मग त्याच्या हातात शस्त्रे देऊन दंगली, राडे, हल्ले करण्यास त्याला प्रवृत्त केले जाते. तोदेखील हेच धर्मकार्य म्हणून हिंसक कारवाया करतो. अशा हाणामाऱ्या आणि तोडफोड करण्यात बहुजन समाजातील तरुण आघाडीवर असतात. मग त्यांच्यावर पोलिस केस होते. ती पोलिसकोठडीत जातात. त्यांच्यावर गुन्हेगार म्हणून शिक्का बसतो. या तरुणांचे शिक्षण, त्यांचे करिअर, नोकरी-व्यवसाय यांचे काय होते? धर्माच्या नावावर रस्त्यावर उतरून राडे करायला लावणारी कुठलीही संघटना आपल्याला नोकरी देत नाही किंवा उदरनिर्वाहाचे साधन देत नाही. अशा राड्यांमध्ये सापडलेल्या अनेक तरुणांचे करिअर बरबाद झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत. त्यांच्या कुटुंबाचे काय, वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ कोण करणार, असे अनेक प्रश्‍न निर्माण होतात. त्यामुळे तरुणांना कळकळीची विनंती आहे की, बाबांनो कुठल्याही राड्यात पडू नका, तोडफोड करुन तुमच्या पदरात काहीच पडणार नाही. कटुंबाचे चांगल्याप्रकारे पालनपोषण, वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ हेच खरे धर्मकार्य आहे, हे लक्षात घ्या.

कर्मकांडांचा विळखा
नवस आणि कर्मकांडांनी या समाजाचे मोठेच नुकसान केले आहे। आपल्या सगळ्या चिंता, समस्या कुठल्यातरी देवाच्या गळ्यात बांधून कधीतरी नशीब उघडेल म्हणून वाट बघण्यात अर्थ नाही. या जगात तुम्ही धडधाकट शरीर आणि मेंदू नावाचे प्रचंड क्षमता असलेले रसायन घेऊन आला आहात. तेव्हा तुमच्या समस्या तुम्ही योग्य दिशेने प्रयत्न केले तरच सुटतील. मानसिक आधार म्हणून बाबा, बुवांचा आश्रम, सत्संग अशा गोष्टींची गरज कमकुवत मनाच्या आणि आत्मविश्‍वासाचा अभाव असलेल्या मनुष्याला लागतात. या देशात उदंड बाबा, बुवा, महाराज, ताई, मावशी निर्माण झाले म्हणून समाजाचे प्रश्‍न सुटलेले नाहीत. मुळात या लेकांकडे प्रश्‍न सोडवण्याची कोणतीही जादूची कांडी नसते. स्पर्धेच्या जगात भक्तांना मानसिकदृष्ट्या खंबीर बनवण्याचे कामही ते करत नाहीत. कारण तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर झालात, तुमच्याकडे आत्मविश्‍वास आला की आपल्याला कोण विचारणार, अशी भीती त्यांना वाटत असते. सध्याच्या जगात आपल्या समस्या आणि रडगाणे ऐकायला कुणालाही वेळ नाही. समस्यांवर आपल्यालाच उत्तर शोधावे लागणार आहे।

मानसिकता बदला
मराठा समाज आजही संरजामी मानसिकतेत वावरत असतो. जातीचा खोटा अभिमान प्रगतीतील मोठा अडसर आहे. वाडे-जमिनी-गढ्या आता इतिहासजमा झाल्या आहेत. ग्रामीण भागात आपल्यापैकी अनेकांना दुसऱ्याच्याकडे सालगडी म्हणून किंवा शेतमजूर म्हणून जावे लागते. याला कारण आपणच आहोत. काटक शरीर आणि अंग मोडून काम करण्याची क्षमता ही आपली बलस्थाने आहेत. त्याला बुद्धीची जोड देण्याची गरज आहे. मुलगी असो किंवा मुलगा त्यांना उत्तम शिक्षण द्या आणि स्पर्धेच्या जगात पोहायला ढकलून द्या.

व्यसन आणि भाऊबंदकी
व्यसन आणि भाऊबंदकी हे या समाजाचे मोठे शत्रू आहेत। व्यसन मग ते दारुचे, गुटख्याचे किंवा मटक्‍याचे. कुठलेही असो. त्याच्या आहारी जाणे नामर्दाचे लक्षण. त्यात पुरुषार्थ तो काय? मजुरी करणारा आणि चार पैसे बाळगून असणाऱ्यांनाही दारुच्या व्यसनाने ग्रासले असल्याची अनेक उदाहरणे दिसतात. व्यसनांमुळे अनेक संसार उध्वस्त झाले आहेत. बापाच्या व्यसनापायी मुलाबाळांवर शिक्षण सोडून मजुरी करण्याची, दुसऱ्याच्या घरी धुणी-भांडी करण्याची वेळ आल्याची अनेक उदाहरणे आहेत. ही वेळ येऊ नये यासाठी मनाचा निर्धार करा आणि दारू सोडा.भाऊबंदकी ही तर आपल्या पाचवीलाच पुजलेली. आधुनिक काळात कष्ट आणि बुद्धीचा वापर करुन संपत्ती निर्माण करणे हे केवढे आत्मविश्‍वासाचे आणि स्वाभिमानाचे लक्षण. पण आमचे भाऊ बापाच्या एक एकर जमिनीचे तुकडे करु पाहतात आणि त्यासाठी एकमेकांची डोकी फोडतात. दिवाणी, फौजदारी दावे दाखल होतात. तुला ना मला घाल वकीलाला अशी स्थिती येते. शेती, घर, दागिने वाटणी कशाचीही असो, आमचे हे भाऊ एकमेकांच्या उरावर बसायला मागेपुढे पाहात नाहीत. आमच्यासाठी काय ठेवलयं, असे बापाला विचारण्याचा उर्मटपणा करण्यापेक्षा स्वतः संपत्ती निर्माण करण्यासाठी कष्टाची तयारी ठेवा. कोणतीही संकटे पेलण्याची, त्यातून मार्ग काढण्याची क्षमता तुमच्यात नक्की आहे. गरज आहे ती आपली शक्ती विधायक मार्गाने संपत्ती निर्माण करण्यासाठी वापरण्याची. शेतीपेक्षा नोकरी-उद्योग-व्यवसायांच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करण्याची. महिलांना सन्मानाची वागणूक द्या!एकीकडे जिजाऊंचा वारसा सांगायचा आणि घरातील स्त्रीला सतत "तिला काय कळते?', म्हणून हिणवायचे हे योग्य नव्हे. आज स्त्रिया विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहेत. स्त्रीला बरोबरीचे स्थान देऊन तिला नवनव्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी, उद्योग-व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे. तिला आर्थिकदृष्ट्या तिच्या पायावर खंबीरपणे उभे केले पाहिजे. जेणेकरुन भावी आयुष्यात कोणतीही संकटे आली तरी तिला अपमान झेलण्याची वेळ येऊ नये.थोडक्‍यात दुसऱ्याला दोष देताना, मागण्या करताना आपण किती बदलण्याची गरज आहे, याची यादी मोठी आहे. व्यसनांपासून दूर रहा, कुणाचाही द्वेष करु नका, बुवावाजी-कर्मकांडाना फाटा द्या, दंगली, राडे यांच्यापासून दूर रहा, शिक्षण-करिअर यावर लक्ष केंद्रीत करा, मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्या. मुख्य म्हणजे विचार करा. सामाजिक घडामोडींमागील अर्थ नीट समजावून घ्या. मग प्रगतीपासून तुम्हांला कुणीही रोखू शकणार नाही.

-सुहास यादव, पुणे

Heaven is for Real: A Little Boy's Astounding Story of His Trip to Heaven and Back 

4 comments:

Santosh Deshpande said...

मा.सुहास यादव, अत्यंत योग्य मुद्दा मांडलात. महाराष्ट्राची सत्ता व राजकारण सुमारे १० मराठा खानदानांभोवती केंद्रीत असून त्यांनी सोयीने आपल्या समाजाचा वापर करुन घेतला आहे. स्वतःची खुर्ची शाबूत ठेवतानाच इतरांना संधी कशी मिळणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली आहे. शिवाय, स्वतःच्या शिक्षण संस्था, सहकारी बॅंका, कारखाने, दूध केंद्रे अशा कितीतरी संस्थांच्या माध्यमातून एक प्रकारची दुकानदारीच त्यांनी केली. एखादा-दुसरा अपवाद वगळता सर्व जण एकाच माळेतील मणी आहेत. अशा वेळी संभाजी ब्रिगेड सारखी संघटना उभी करणे, तिच्या माध्यमातून चळवळ उभी करणे, ती डोईजड होत असल्याचे लक्षात येताच दुसऱ्या नेत्याची तिसरी संघटना बांधणे अशा कितीतरी खेळी याच मंडळींकडून पाहायला मिळतात.
या सर्व प्रकारात सर्वसामान्य मराठा तरुणाला उत्तम करिअर करता यावे, यासाठी तळमळीने काम करणारे कोण अाहेत का... आरक्षणाची आग लावून हा वनवा पेटताना पाहून त्यात आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेणे, हा प्रत्यक्ष छत्रपतींचा अपमान आहे. इतर जातीपातींविषयी विष कालवून आपण मराठ्यांचे काय हित साधतो
आहोत, हे या मंडळींना समजत नाही का, असा प्रश्न पडतो. शिवरायांच्या या मुलखात मराठ्यांवर आरक्षण मागण्याची वेळ येणे, हे दुर्देवी तर आहेच, त्या ही पेक्षा वाईट वाटते ते
बेफिकिर व संवेदनशून्य राजकारण्यांची ज्यांना आपल्या समाजातील गरीबांचे आसवेसुद्धा कधी दिसली नाहीत. पाहू, कोणी आहे का, जो आपल्या नात्यागोत्यातील व्यक्तीपेक्षा गरीब व निष्ठावंत कार्यकर्त्याला निवडणुकीसाठी संधी देतो का... यांचे मुखवटे इथेच गळून पडतात.

mynac said...

सुहासजी,
सुन्दर लेख.आपला हा लेख वाचून फ़ार वर्षां पूर्वी ज्येष्ठ विखे-पाटलांचा दै.लोकसत्ताच्या एका रविवारच्या पुरवणी मध्ये संपूर्ण एक पानभर आलेल्या लेखाची आठवण झाली.ही गोष्ट साधारण २० वर्षा पूर्वीची किंवा कदाचित त्याही पूर्वीची असावी.आत्ता मराठा समाजाची आरक्षण आणि ईतर ज्या पद्धतीची आंदोलने चालली आहेत,त्याची जणूकाही भवीष्यावाणीच त्यांनी त्या वेळी केली होती,असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही,अतीशयोक्ती तर मुळीच नाही,असे अतीशय खेदाने म्हणावेसे वाटते.

mynac said...

सदरहू लेखावर समाजाच्या विविध क्षेत्रातून,मान्यवरांच्या अतीशय सुंदर प्रतिक्रिया उमटल्या होत्या.आज त्या २० वर्षा नंतरचे जे नेते समाजाचे,खास करून मराठा समाजाचे नेतृत्व करीत आहेत,त्यांनी तर तो लेख लोकसत्ता मधून मिळवून,वाचून त्या वर नुसता विचार नव्हे तर आत्मपरीक्षण केले पाहिजे.
मराठा तरूणांनी,प्रथम स्वत:च्या,नि नंतर समाजाच्या उन्नती साठी,आणि येणाऱ्या पुढील काळात ऊगीच फ़ार विचार न करीत बसता फ़क्त ब्राह्मणांचे अनुकरण करावे,कारण स्वातंत्र्योत्तर काळात,ब्राह्मण समाजावर जी बंधने आली,नव्हे घालण्यात आली,त्यातून त्यांनी ज्या पद्धतीने मार्ग काढला,खास करून सरकारी मदती शिवाय त्याचा त्यांनी(विखे-पाटलांनी)ह्या लेखात सविस्तर मागोवा घेतला होता.त्या मधे त्यांनी अतिशय तटस्थ असा दृष्टिकोन बाळगला होता.
अगदी खुद्द शरद पवारांना सुद्धा ह्या वाङमयीन युद्धात उडी घ्यावी लागली होती ह्याची बहुदा मराठा समाजाच्या सध्याच्या बऱ्याच नेत्यांना कल्पना सुद्धा नसावी.
आत्ताच्या काळात हा विषय काढणे,म्हणजे"आ बैल मुझे मार"अशी त्यांची अवस्था होणार त्या मुळे,तो न काढलेलाच बरा.आळी मिळी गुप चिळी.

mynac said...

वैयक्तीक माझे बहुसंख्य मित्र मंडळी हि मराठा समजातीलच आहे,नव्हे मराठा समाजाचे वैयक्तीक माझेवर खूप उपकार आहेत,तथापि महापुरे झाडे जाती,तेथे लव्हाळे वाचती हे माहित असून ही मोडेन पण वाकणार नाही हा खोटा आग्रह समाजातील तरूणांना बाळगायला भाग पाडून त्यांची जी दिशाभूल केली गेली आहे,जात आहे त्याचे राहून राहून वाईट वाटते.खास करून ब्राह्मणद्वेष. अहो,एकूण ब्राह्मण समाज महाराष्ट्रात आहे कितीसा? तर फक्त ३ टक्के,तो कोणाचं काय वाकडं करणार आहे?उलट जे स्व.यशवंतराव चव्हाणांनी केले,म्हणजे ब्राह्मण समाजाला हाताशी धरून,त्यांच्या बुद्धीमत्तेचा वापर करून घेऊन महाराष्ट्राच्या प्रगतीत जे मोलाचे काम केले,त्या साठी आज महाराष्ट्रात फक्त त्यांनाच ओळखले जाते.ब्राह्मणांना नव्हे,आणि ब्राह्मणांनी सुद्धा कधी तो आग्रह धरल्याचे स्मरत नाही कि तसा कधी दावा सुद्धा केला नाही नि करत हि नाही.शरद पवारांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात,स्व.यशवंतरावांच्या ह्या पावलां वर पाऊल टाकून,सुरुवात तर छान केली होती,त्याचे कौतुक ही झाले पण नंतर सत्तेच्या शर्यतीत पुढे रहायच्या,जायच्या नादात,ते सुरुवातच विसरले आणि एके काळी उभ्या महाराष्ट्राला "आपला" म्हणून वाटणारा नेता फक्त मूठभर मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करण्यात धन्यता मानणारा होऊन बसला.खरे तर मराठा समाजानेच ह्याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे कि,गेली ६४ वर्षे सत्तेत राहून हि त्यांच्या वर आज आरक्षण मागायची वेळ आली आहे,म्हणजे त्यांची ताकद कमी झाली आहे,होत आहे.मुळात ती आहे फक्त ३३ टक्के.ती ही असंघटीत. गेल्या १५ -२० वर्षात परप्रांतीय येथे येऊन स्थाईक झाल्याने राहीलेले ६७ टक्के संघटीत व्हायला कधीच सुरुवात झाली आहे.मुंबई हे सध्या फक्त नमुन्यादाखल उदाहरण आहे.आम्हां मराठेतर महाराष्ट्रियन लोकांना खरे तर मराठा नेतृत्वानेच महाराष्ट्राची,कमान सांभाळावी,पुढे न्यावी असे मनापासून वाटते,तसे आमचे सांगणे हि आहे,पण मराठा नेतृत्वाला तसे वाटते कि नाही? ह्या बद्दल आता आमच्याच मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली आहे एवढे मात्र खरे."विचारी" नेतृत्व ह्याचा विचार करेल काय?