OPINIONMAKER

Wednesday, January 23, 2008

संत तुकाराम, ज्ञानेश्‍वर, नामदेव, शिवाजी, फुले, कर्वे कुणा कुणाचे?

आपली कुवत, बुद्धीमत्ता, कष्ट करण्याची वृत्ती, धीर धरण्याची वृत्ती याबाबतची आपली पूर्ण क्षमता आणि मर्यादा लक्षात न घेताच कोणतीही व्यक्ती आपली प्रगती होत नसल्याचे खापर अन्य जाती, व्यवस्था, समाज यांच्यावर फोडण्याच्या निष्कर्षाप्रत येते. अशा मानसिक अवस्थेत असलेले युवक, महिला, शेतकरी, कामगार म्हणजे जातीधर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांसाठी "रॉ मटेरियल'च ठरते.
गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रात जातींच्या संमेलनांना वाढता प्रतिसाद मिळतो आहे. कदाचित हा देश, समाज म्हणून एकत्रितपणे विश्‍वासाने, सामर्थ्याने उभे राहण्यात सर्वजण कमी पडलो असू किंवा त्यात काही चुका, त्रुटी असतील. कदाचित समाजातील विविध घटकांच्या इच्छा-आकांक्षांना मूर्त रुप देण्यात, त्याच्या जवळपास जाण्यात इथल्या समाज आणि त्याचाच घटक असलेल्या शासनयंत्रणेला काही प्रमाणात यशापयश आले असेल. काहीजणांनी इथल्या प्रगतीची फळेही चाखली असतील आणि त्याची चव कळल्यामुळे आता त्यांच्या अपेक्षा वाढल्या असतील. त्या आता पूर्ण होत नसतील, त्यात अडथळे असतील. त्यामुळे कदाचित आता जातीची ओळख घेऊन उभे राहिल्यास सुरक्षितता वाटत असेल, काही फायदे मिळवता येत असतील किंवा जातीची ताकद दाखवून सत्तेतील वाट्यावर दावा सांगता येत असल्याचे इंगित सर्वांना कळल्यामुळेही या संमेलनांना प्रतिसाद मिळत असेल.

जातीची संमेलने आयोजित करण्याला कुणाचाही विरोध असण्याचे कारणच नाही. एकत्र येऊन विचारमंथन करुन त्याज्य प्रथा, परंपरा टाकून देण्याचे धाडस करुन नवे विचार, कष्ट करण्याची नवी क्षेत्रे, आर्थिक प्रगतीच्या वाटा दाखवून त्यात एकमेकांना मदत करुन सर्वांच्या सहभागाने पुढे जाण्याचे प्रयत्न होणार असतील तर तर त्याला आक्षेप नसावा. परंतु, प्रत्येक जातीतील जुन्या पिढीतील कर्तृत्वान व्यक्ती, नेते यांच्या कार्याचा गौरव ती व्यक्ती केवळ आपल्या जातीत जन्मली म्हणून केला जाणे आक्षेपार्ह आहे. कारण या देशातील विविध जातींमधील कर्तृत्ववान व्यक्तींनी शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा, उद्योग अशा विविध क्षेत्रात जी असामान्य कामगिरी केली ती जातीच्या नावावर किंवा केवळ आपल्या जातीला फायदा व्हावा म्हणून कधीच केलेली नाही, तसे करणेही शक्‍य नसते. अशा बहुतेक कर्तृत्वान व्यक्तींनी त्यांच्या जातीबांधवांनी आपल्या जातीत बंदिस्त करुन टाकले आहे. त्यातूनही काही सुटले होते त्यांनाही आता जातीच्या आणि त्यापुढेही जाऊन उपजातींच्या बंधनात अडकवण्याचे काम कळतनकळत सुरु झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे व्यापक विचार, सर्वसमावेश वृत्ती आणि विशिष्ट ध्येय ठेऊन कितीही अडचणी आल्या तरी विचलीत न होता सातत्याने ध्येयाप्रती जाण्याच्यादृष्टीने कष्ट करत राहणे या गुणांमुळे या व्यक्ती त्यांच्या क्षेत्रात उच्च पदाला पोचलेल्या असतात. अर्थात त्यासाठी त्यांनी आपले अख्खे आयुष्य खर्ची घातलेले असतात।

आता "इन्स्टंट सक्‍सेस'च्या जमान्यात आपल्या जातीतील कर्तृत्त्वान व्यक्तींचे चित्र जातींच्या संमेलनांमध्ये तरुणांच्या पुढे उभे केले जाते. मग नव्या आर्थिक रचनेत असुरक्षिततेच्या वातावरणात संघर्ष करणाऱ्या युवकाला अप्रत्यक्षपणे बघ आपल्या जातीत किती महान लोक होते तू देखील त्यांच्यासारखे उच्च पदाला जायला पाहिजे, यश मिळवायला पाहिजे असे सांगितले जाते. पण आमच्या सध्याच्या पिढीला "इन्स्टंट सक्‍सेस' हवे आहे. शेजारचा ते मिळवतही आहे. मग मलाच का ते मिळत नाही अशा विचारांनी आमचा तरुण अस्वस्थ होतो. आपली कुवत, बुद्धीमत्ता, कष्ट करण्याची वृत्ती, धीर धरण्याची वृत्ती याबाबतची आपली पूर्ण क्षमता आणि मर्यादा लक्षात न घेताच मग मानवी स्वभावाप्रमाणे आपली प्रगती होत नसल्याचे खापर अन्य जाती, व्यवस्था, समाज यांच्यावर फोडण्याच्या निष्कर्षाप्रत तो येतो. अशा मानसिक अवस्थेत असलेले युवक, महिला, शेतकरी, कामगार म्हणजे जातीधर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांसाठी "रॉ मटेरियल'च ठरते. यातून जातीच्या वाट्याला तर काही येतच नाही पण जातींना विविध पक्षांच्या दावणीला बांधून जातींचे नेते मात्र, स्वतःचा उत्कर्ष साधत असतात. त्यासाठी आपल्या जातीतील कर्तृत्त्वान व्यक्तीचे मोठे फ्लेक्‍स जातींच्या अधिवेशनांमध्ये लावायचे आणि या व्यक्तींना जातींच्या चौकटीत बंदिस्त करुन टाकायचे उद्योग पूर्वीपासून चालत आले आहेत.
आता तर विविध जातीधर्मांचे बुवा, बापू, महाराज, ताई, मावशी यांचाही उदय झाला आहे. स्पर्धात्मक जगात रोज उठून जगण्यासाठी नवा संघर्ष करावा लागत असल्याने जीवनात अनिश्‍चतता वाढली आहे. अशा स्थितीत सामान्य माणसाच्या असहाय्यतेचा फायदा उठवत हे बापू, महाराज आणि जातीच्या हितासाठी लढण्याचा आव आणणारे ठेकेदार समाजाच्या एकात्मतेलाच सुरुंग लावू पाहात आहेत.


-सुहास यादव

No comments: