OPINIONMAKER

Monday, January 7, 2008

कॉंग्रेसला बदलावेच लागेल
मतदार आता केवळ विकासकामांवर समाधानी दिसत नाही. पक्षाची भूमिका, जाहीरनामा याबरोबरच आपली अस्मिता जोपासणारा, स्वाभिमानाला खतपाणी घालणारा एक "चेहरा' त्याला हवा असतो. स्वतःला ज्याच्याशी जोडता येईल, अशा नेत्याच्या शोधात तो असतो. म्हणूनच राज्यातील विधानसभांच्या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार अगोदर जाहीर करणे आवश्‍यक बनले आहे. त्यासाठी कॉंग्रेसला त्यांच्या "दरबारी' कार्यपद्धतीत बदल करावा लागेल.
गुजरातमध्ये कॉंग्रेसचा पराभव झाल्याचे स्पष्ट होत असतानाच निकालांच्या विश्‍लेषणाची चर्चा एका वृत्तवाहिनीवर सुरू होती. कॉंग्रेसतर्फे ऍड. अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडत होते. पक्षाने गुजरातमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार अगोदरच का जाहीर केला नाही, या प्रश्‍नावर, "कॉंग्रेसची तशी कार्यपद्धती नाही,' असा राग ते आळवत होते. नरेंद्र मोदी यांनी ज्या तडफेने गुजरातचा किल्ला एकहाती लढवून स्वपक्षीयांबरोबरच प्रवीण तोगडिया, त्यांची संघटना, साधूलोक आणि कॉंग्रेसला एकाच फटक्‍यात गारद केले, ते पाहून निकालाच्या अगोदर कुंपणावर बसलेले सर्वच जण नंतर मोदींचे कौतुक करू लागले. मोदींची ही तडफ आणि क्षमता पाहता, कॉंग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणे किती आवश्‍यक होते, हे लक्षात येते. याचे मुख्य कारण म्हणजे जग बदलते आहे, अर्थव्यवस्था बदलत आहेत, सामान्य माणसाला टिकाव धरून राहण्यासाठी बदलावे लागत आहे. अशा स्थितीत आमची तशी कार्यपद्धती नाही म्हणून टिमकी वाजवणाऱ्या कॉंग्रेसचा कितपत टिकाव लागणार आहे?
मतदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. विकासकामे केली म्हणून तेवढ्यावर तो समाधानी नसतो. नेता म्हणून आपला वाटणारा "चेहरा' त्याला हवा असतो. हे लक्षात घेऊन, भाजप देशव्यापी पक्ष असला, तरी मोदी यांनी या निवडणुकीत हिंदुत्वापेक्षाही विकासकामांवर भर देताना गुजरात जनतेच्या अस्मितेला आवाहन केले. सात कोटी गुजराती जनतेच्या हृदयाचा ठाव घेत त्यांनी "जितेगा गुजरात' ही घोषणा "कॉईन' केली. त्या तुलनेत त्यांच्या समोर उभा राहील असा नेता संभाव्य मुख्यमंत्री म्हणून कॉंग्रेसने जाहीर केला नाही. देशातील कुठल्याही राज्याचा विचार केला, तरी आता प्रादेशिक अस्मिता आणि विकासाचा विचार करणाऱ्या नेत्यांना मतदारांनी पसंती दिलेली दिसते.
किमान विधानसभा निवडणुकीची प्रचारमोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार अगोदर जाहीर करणे आवश्‍यक असते, हे ओळखून भाजपने राजस्थानात वसुंधराराजे, मध्य प्रदेशात उमा भारती, छत्तीसगडमध्ये दिलीपसिंह जुदेव यांची नावे जाहीर केली होती. यामागे पक्षाची मते, अधिक या व्यक्तींच्या प्रतिमा आणि जातीचा विचार करून येणारी मते, असा विचार असतो.राजस्थानात स्वतःच्या मतांमध्ये भर म्हणून मोठ्या संख्येने असलेल्या संस्थानिकांना आपले हितसंबंध जोपासण्यासाठी हवा असलेला "वे आऊट' भाजपने वसुंधराराजे यांच्या रूपाने उभा केला. मध्य प्रदेशात उमा भारती यांचा फिरण्याचा झपाटा, वक्तृत्व, मागासवर्गीय म्हणून त्यांची प्रतिमा यांचा पक्षाने उपयोग करून घेतला. छत्तीसगडमध्ये जुदेव यांनी आदिवासींमध्ये केलेल्या कार्याचा पक्षाला उपयोग झाला. अर्थात ऐन वेळी ते पैसे स्वीकारताना कॅमेऱ्यासमोर सापडल्याने त्यांच्याऐवजी शर्यतीत कुठेच नसलेल्या रमणसिंह यांना मुख्यमंत्रिपदाची "लॉटरी' लागली.मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची कॉंग्रेसची कार्यपद्धती नसल्याचे एकीकडे सांगितले जात असले, तरी पंजाबमधील निवडणुकीत कॅप्टन अमरिंदरसिंग हेच कॉंग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे अघोषित उमेदवार होते. नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेशातील निवडणुकीतही विद्यमान मुख्यमंत्री वीरभद्रसिंह हेच पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे अघोषित उमेदवार होते. त्यांची ताकद आणि क्षमता लक्षात घेऊन भाजपमध्ये गटबाजी असतानाही शांताकुमार यांना शांत बसवून पक्षाने प्रेमकुमार धुमल यांचे नाव जाहीर केले. अशीच गटबाजी गुजरातमध्ये कॉंग्रेस पक्षात होती. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणे कॉंग्रेसला जमले नाही. भाजपच्या केंद्रीय नेतृवाने शांताकुमारांना वेसण घालून धुमल यांना "प्रोजेक्‍ट' केले.
लोकांनी आमदारांना निवडून द्यायचे आणि त्या आमदारांच्या मताला किंमत न देता "हायकमांड'ने दिल्लीतून मुख्यमंत्री ठरवायचे दिवस आता संपले आहेत. किती आमदारांचा पाठिंबा आहे, यापेक्षा "हायकमांड'च्या चरणी सेवा रुजू करणाऱ्याला महत्त्व देण्याच्या कॉंग्रेसच्या कार्यपद्धतीमुळे उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, ओरिसा, महाराष्ट्र, तमिळनाडू या महत्त्वाच्या राज्यांमध्ये स्वबळावर सत्तेवर येण्याचा विचारही आता कॉंग्रेस करू शकत नाही. यांपैकी अनेक राज्यांत तर कुणाच्या तरी मदतीने एक-दोन मंत्रिपदे मिळवणेही कॉंग्रेसला अवघड झाले आहे.नुकत्याच निवडणुका झालेल्या गुजरात आणि उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यांचा विचार केला तरी विजय मिळवण्यासाठी मायावती काय किंवा मोदी, दोघांनीही दोन-अडीच वर्षांपासून तयारी केली होती, हे लक्षात येते. अगदी गाव आणि वॉर्डपातळीपर्यंत कार्यकर्त्यांचे भक्कम संघटन उभे करून राज्याच्या किंवा जातींच्या अस्मितेला आवाहन करत आपण उभ्या केलेल्या संघटनेच्या बळावर या दोन्ही नेत्यांनी विजय खेचून आणला आहे. मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच, हा ठाम निश्‍चय दोघांकडे होता. त्यासाठी कष्ट करण्याची, राज्यभर फिरण्याची, आपल्याला हवी तशी कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याची तयारी त्यांच्याकडे होती. त्या दिशेने त्यांनी काम केले आणि विजय मिळवला.
जातींच्या आणि प्रदेशांच्या अस्मिता टोकदार होत आहेत. जातीचा स्वाभिमान, प्रादेशिक अभिमान यांना महत्त्व येऊ लागले आहे, याचा विचार करून कॉंग्रेसला बदलावेच लागेल. राज्यातील प्रभावी नेत्यांवर वचक ठेवण्याची क्षमता इंदिरा गांधी यांच्याकडे होती. आता कॉंग्रेस पक्षात तसे नेतृत्व नाही आणि सध्याच्या परिस्थितीत तसे चालणारही नाही.पक्षाची भूमिका, जाहीरनामा यांबरोबरच राज्यातील निवडणुकांमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही राजकीय पक्षांना जाहीर करावा लागेल. कारण मतदार त्याच्यामध्ये आपली अस्मिता, नाते, चेहरा शोधत असतो.

- सुहास यादव

2 comments:

Arvind Dorwat said...

Who are you to change the Congress?
Congress is having the characteristics of "Sthitisthapakatva"
and you should know the rule:
Congress can not be... nor.... It can change from one form to another.
India is congress and congress is India. (Better you read "Sharad Joshi (welknown Hindi poet)"'s poem. I don't have it now. If somebody has, pls. publish it in the blog.
-Arvind D.

Arvind Dorwat said...

Happy Maharashtrian (manase) Holi!

Let us fire woods, tables, chairs, doors of others. (what is carbon credit?, let us discuss it tomorrow)

Make Nevedya of Puran Poli. Eat it. Take rest.

Suddenly start bombombing in the evening.

Put Raksha on forehead tomorrow. (Do not use bottles and glass)

And that's dhulwad.

Wait for coming rangpanchami.

Sanjay Dorwat