OPINIONMAKER

Saturday, April 23, 2011

कोई पत्थरसे ना मारो.......

जनलोकपाल विधेयकाच्या मसुदा समितीचे सदस्य संतोष हेगडे सदस्यत्वाच्या राजीनाम्याबाबत आज निर्णय घेणार आहेत. हेगडे काय किंवा भूषण पितापुत्र आणि अण्णा हजारे काय, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणार्‍या या बिनीच्या शिलेदारांबद्दल कुणीची काही बोलायचे नाही, असा बहुधा त्यांचा दंडक आहे. आम्ही धुतल्या तांदाळासारखे स्वच्छ आणि बाकी सगळे भ्रष्ट असा बहुतेक या मंडळींचा समज झालेला दिसतो.
इथल्या लोकाशाही व्यवस्थेमुळे तुम्हांला भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवात येतो त्याच व्यवस्थेमुळे इतरांना तुमच्या चुकांवर बोट ठेवण्याचे अधिकार मिळतो. मग तुमच्या दुखर्‍या नसेवर कुणी बोट ठेवले तर वेदना होणार पण तुमचा तर लगेच पोटशूळ उठतो, हे कशासाठी? अण्णांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात आंदोलन सुरु केले तेव्हा बाबा आढाव, कै. ग. प्र. प्रधान यांच्यासारखे सामाजिक क्षेत्रातीलअनेक  दिग्गज अण्णांच्या पाठीशी उभे राहिले होते. नंतर सगळेच दूर गेले, असे का झाले?  भूषण बापलेकांनी मायावतींकडून पदरात पाडून घेतलेले भूखंड कशाच्या बदल्यात होते, असे कुणी विचारले तर त्याचे तर्कसंगत आणि पटेल असे उत्तर द्यायला हवे. कर्नाटकातील निलंबित केलेल्या भ्रष्ट अधिकार्‍यांना भाजपचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी पुन्हा सेवेत घेतले. त्याला संतोष हेगडे यांनी जोरदार विरोध करुन कर्नाटकच्या लोकपालपदाचा राजीनामा दिला होता. मग लालकृष्ण अडवानी यांनी हस्तक्षेप केला. त्यांची हेगडे यांच्याशी चर्चा (तोडपाणी नव्हे) झाली आणि हेगडे यांनी राजीनामा घेतला. मग जे कर्नाटकातील भाजपचा भ्रष्टाचार रोखू शकत नाहीत....  असे कॉंग्रेसचे दिग्विजयसिंग म्हणाले तर हेगडे अस्वस्थ का होतात? हेगडेंनी त्यावेळी राजीनाम्यावर ठाम राहून भाजपचा भ्रष्टाचार उघडकीस आणायला हवा होता. हेगडे साहेब त्यामुळे भविष्यात भाजपकडून तुम्हांला राज्यसभेची उमेदवारी मिळाली तर कुणालाही आश्चर्य वाटू नये. 

मुळात एखादे चांगले काम हाती घेतले की त्याला प्रचंड विरोध होणार हे अण्णा आणि त्यांच्या सहकार्‍यांनी लक्षात ठेवले पाहिजेत. उठसूठ राजीनाम्याची भाषा करुन आपल्याविरुद्ध कुणी बोलणार नाही याचा बंदोबस्त करणे हा ब्लॅकमेलिंगचाच एक प्रकार आहे. इथल्या लोकशाही व्यवस्थेने तुम्हांला भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचा अधिकार दिला. त्याच व्यवस्थेने इतरांनी तुमच्याविरुद्ध बोलण्याचा अधिकार दिला आहे. लोक चुकीचे बोलत असतील तर दूध का दूध आणि पानी का पानी करुन  त्यांची तोंडे बंद करा. त्याउलट शाळेतील मुलांप्रमाणे अण्णा सोनिया गांधींकडे तक्रार करतात आणि लगेचच   त्याची  प्रत प्रसारमाध्यमांकडे पाठवून देतात. तक ्रार करा पण लगेच प्रसारमाध्यमांकडे धाव कशासाठी? प्रसारमाध्यमांकडे उठसूठ धाव घेण्यामुळे प्रश्न सुटत  नसतात उलट अनेकवेळा न्यूजचॅनेलवाले त्यांचा टीआरपी वाढवण्यासाठी, दिवस साजरा करण्यासाठी तुमचा वापर करुन घेतात. तेव्हा अण्णा आणि हेगडेसाहेब तुमचे नाणे खणखणीत असेल तर ते वाजणारच. त्याची काळजी करु नका.

महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सामाजिक भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत शिक्षणप्रसाराचे कार्य हाती घेतले तेव्हा
सनातन्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ले केले. पण त्यांचा विचार, कार्य आणि चारित्र्य विशुद्ध असल्याने आजही समाज त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. तुमचेही तसेच असेल तर पुढच्या पिढ्या तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतील.

--सुहास यादव

No comments: