OPINIONMAKER

Saturday, September 27, 2008

राजाचे संग्रहालय


सातारा जिल्ह्यातील तत्कालीन औंध संस्थानचे अधिपती भवानराव पंतप्रतिनिधी यांचे चित्रकलेवर नितांत प्रेम। स्वतः चित्रकार असलेल्या या राजाने अनेक कलाकृती निर्माण केल्या. चित्रकारांना प्रोत्साहन, मानसन्मान दिला. अनेकांना पदरी ठेवून घेतले आणि त्यांच्याकडून अप्रतिम कलाकृती निर्माण करून घेतल्या. त्याचबरोबर जगाच्या कानाकोपऱ्यातून उत्तमोत्तम चित्रे, शिल्पे आणि कलाकृती औंधला आणल्या आणि त्यातून एक उत्तम संग्रहालय निर्माण केले.


साताऱ्याला शिकायला असताना त्या राजकुमाराला त्याचे वडील अधूनमधून भेटायला येत। असेच एकदा वडील येणार असल्याचे कळल्यावर त्या राजकुमाराने, येताना चित्रकलेचे साहित्य घेऊन येण्याची गळ घालणारे पत्र वडिलांना लिहिले होते. त्या वेळी त्याचे वय होते अवघे बारा-तेरा वर्षांचे. पुढे गादीवर आल्यानंतर चित्रकलेवर नितांत प्रेम असणाऱ्या या राजाने स्वतः अनेक चित्रे काढली. नवेनवे प्रयोग केले. त्याचबरोबर रयतेतील गुणी कलाकारांना शोधून त्यांना आपल्या दरबारात आणून त्यांच्याकडून अद्वितीय अशी चित्रे काढून घेतली. त्यांचा सन्मान केला. अनेक शिल्पे, दुर्मिळ वस्तू जमवल्या आणि त्यातून उभे राहिले औंधचे देखणे संग्रहालय.श्रीमंत राजेसाहेब भवानराव श्रीनिवासराव ऊर्फ बाळासाहेब पंडित पंतप्रतिनिधी असे त्यांचे नाव. 

औंधसारख्या छोट्याशा संस्थानचा कारभार सांभाळताना भवानरावांनी चित्रकलेचा छंद तर जोपासलाच; पण त्याचबरोबर स्वतःच्या खासगी दौलतीतून जगाच्या कानाकोपऱ्यातून उत्तम कलाकृती, शिल्पे, दुर्मिळ वस्तू औंधला आणल्या. त्यातूनच त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी श्री यमाईदेवीच्या डोंगरावर अप्रतिम अशा "श्री भवानी चित्र-पदार्थ पुराणवस्तू संग्रहालया'ची निर्मिती केली. बालवयात चित्रकलेच्या साहित्याची मागणी करणारे, त्यांनी वडिलांनी लिहिलेले पत्र आजही या संग्रहालयात आहे.संग्रहालयाच्या वास्तूच्या उभारणीसंदर्भात त्यांनी लिहून ठेवले आहे,


श्री यमाई आदिपुरूष

"ही वास्तू श्रीमंत राजश्री भवानराव श्रीनिवास ऊर्फ बाळासाहेब पंडित प्रतिनिधी राजेसाहेब, संस्थान औंध यांनी संपादन केलेल्या बहुमोल वस्तू, चित्रे, पुतळे व इतर कलाकुसरीचे पदार्थ, आपल्या प्रजेचे ज्ञानोद्दीपन व्हावे, या सदिच्छेने जतन करून ठेवण्यास बांधविली.''स्वतःला "सेवक राजा' म्हणवून घेणाऱ्या कलासंपन्न अशा या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाने गावापासून दूर रम्य परिसरातील डोंगरावर संग्रहालयाची वास्तू बांधण्यासाठी काय व किती परिश्रम घेतले असतील, या विचाराने आपण स्तिमित होतो.चिमुकल्या संस्थानच्या अल्पशा निधीतून संस्थानचा दैनंदिन व लोकल्याणाच्या अनेकविध गोष्टी सांभाळून त्यांनी ही कलावास्तू उभी केली व आयुष्यभर मेहनत घेऊन जमविलेला व निर्माण केलेला अनमोल संग्रह इथे मांडला.संग्रहालयातील अप्रतिम शिल्पे, नजर खिळवून ठेवणारी चित्रे आणि नानविध दुर्मिळ वस्तू पाहिल्या, की "सेवक राजा'च्या कलाप्रेमाची, कलासक्तीची आणि कलाकारांबद्दल असलेल्या आदाराची प्रचिती येते. चांगले ते पाहायचे, शिकायचे, जिद्दीने करून दाखवायचे, या वृत्तीतून हे सर्व उभे राहिले आहे.लहानपणी सातऱ्यात शिकायला असताना ते ज्या वाड्यात राहत होते, तेथील भिंतीवर प्रसिद्ध चित्रकार बंडोपंत चितारी यांनी पौराणिक कथांमधील अनेक चित्रे काढली होती. तशी चित्रे काढण्याचा भवानरावांचा प्रयत्न असे. त्यासाठी कागदाला तेल लावून ते तो पारदर्शक करीत असत. तो त्या चित्रावर धरून पेन्सिलने चित्र रेखाटून घ्यायचे व मग ते रंगवायचे, असे त्या बालचित्रकाराचे प्रयत्न सुरू असत।


चित्रकारांना आश्रय

औंधला असताना ते संस्थानच्या दप्तरदाराकडून चार पैसे मागून घेत। पिवडी, नीळ, तांबडा रंग बाजारातून आणून नारळाच्या करवंटीत रंगवण्याच्या दृष्टीने तो तयार करत असत। पोथीसाठी आणलेले कागद मिळाले, की मग त्यावर ब्रशने रंग भरू लागत आणि मग बघता बघता सुंदर चित्र तयार होई. बंडोपंत चितारी हे त्यांचे चित्रकलेतील गुरू. त्रावणकोरचे राजा रविवर्मा यांच्याकडून ते तैलचित्राचे तंत्र शिकले. 1888 ते 1905 या कालावधीत त्यांनी राजा रविवर्मा यांच्या त्रावणकोरमधील स्टुडिओला अनेकदा भेटी दिल्या. चित्र काढण्याचे स्वतःचे खास तंत्र विकसित केले. त्यांनी महाभारत, रामायणातील प्रसंगांवर काढलेल्या चित्रात त्यांची शैली दिसते. त्यांच्यावर लघुचित्रशैलीचा प्रभाव होता. पारंपरिक चित्रांपेक्षा काही वेगळे धाडसी प्रकारही त्यांनी चित्रात आणले. रामायणावरील त्यांच्या चित्रमालिकेत हनुमान हा अन्य वानरांप्रमाणेच साधा दाखवला आहे. हनुमानाला कुठेही दागिने अथवा मुकुट नाही. राम-लक्ष्मण वनवासात असताना त्यांच्या दाढी-मिशा वाढलेल्या असणार, हे लक्षात घेऊन त्यांच्या वनवासकाळातील चित्रांमध्ये श्रीमंतांनी त्यांना दाढी-मिशा काढल्या आहेत. अशा प्रकारची ही चित्रे दुर्मिळच म्हणावी लागतील. श्रीमंतांच्या चित्राचे संग्रहालयात वेगळे दालन आहे. त्यातील रामपंचायतन, जटायू वध, लंकादहन, हनुमान द्रोणागिरी पर्वत आणीत आहे, ही चित्रे उठून दिसतात. त्यांचे गाजलेले रामपंचायतन हे चित्रही येथे आहे. या संग्रहालयात प्रवेश करतानाच त्यांचे भव्य तैलचित्र नजरेस पडते. त्यातून हे काय व्यक्तिमत्त्व असावे, याची कल्पना येते.राजेसाहेबांनी स्वतः उत्तम चित्रे काढलीच; शिवाय अन्य चित्रकारांकडूनही अद्वितीय काम करून घेतले. ही मंडळी अगदी सामान्य पार्श्‍वभूमीतून आलेली होती. त्याममध्ये भिवा सुतार, भरमाप्पा कोट्याळकर, रामचंद्र सुबराव गुडिगार, महादेव पाथरवट, केशव देशपांडे यांचा समावेश होतो. या कलाकारांना त्यांनी संस्थानात ठेऊन घेतले. त्यांना सन्मान दिला. त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रतिभेला आव्हान केले आणि त्यातून अनेक दर्जेदार कलाकृतींची निर्मिती झाली. त्याचबरोबर रावबहादूर एम. व्ही धुरंधर, लालकाका, बाबूराव पेंटर, पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर, माधवराव सातवळेकर, रा. द. चितारी यांच्याकडूनही दर्जेदार कलाकृती निर्माण करून घेतल्या.


"शिवतांडवनृत्य' चित्राचा

भरमाप्पा कोट्याळकर जवळजवळ वीस वर्षे संस्थानात होते। श्रीमंत भवानरावांना कीर्तनाचाही छंद होता. मोठी मेहनत घेऊन ते कीर्तन करायला शिकले होते. राजवाड्यासमोरील देवीच्या मंदिरात ते कीर्तन करत. त्या वेळी भरमाप्पा एका कोपऱ्यात बसत आणि कीर्तनातील कथांना जागच्या जागी चित्ररूप देत असत. अशी पाच-पाच फुटी त्यांची चित्रे आजही संग्रहालयात आहेत. चित्रातील व्यक्तींचे अचूक आणि निर्दोष रेखांकन हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यामुळे चित्रात व्यक्तींची गर्दी झाली, तरी मांडणी इतकी उत्तम, की प्रत्येक व्यक्ती लक्ष वेधून घेते. आपली सर्व निरीक्षणशक्ती त्यांनी प्रत्येक चित्रात पणाला लावल्याचे दिसते. त्रिपुरासुर वध, कृष्णशिष्टाई, शिवराज्याभिषेक, शिवतांडवनृत्य ही त्यांची चित्रे प्रसिद्ध आहेत. यांपैकी शिवतांडवनृत्य या चित्राला मजेदार इतिहास आहे. श्रीमंत राजेसाहेबांबरोबर भोजनासाठी रोज त्यांचे नातेवाईक व आश्रित असे जवळजवळ पन्नास लोक असत. त्यात भरमाप्पा कोट्याळकरही असत. भोजनगृहातील एक फलकावर श्रीमंत राजेसाहेब रोज एक श्‍लोक लिहीत. संस्कृत नाटकातील, काव्यातील अनेक श्‍लोक त्यांना पाठ होते. भोजनापूर्वी हे श्‍लोक म्हटले जात. एके दिवशी "मालतीमाधव' नाटकातील नमनाचा श्‍लोक त्यांनी लिहिला होता. तो भरमाप्पांना इतका आवडला, की त्यांनी ताबडतोब त्याचे चित्रांकन करून महाराजांना दाखवले. त्या श्‍लोकातील सर्व गोष्टी त्या चित्रात उतरल्या आहेत. भगवान शंकराच्या तांडवनृत्यामुळे मेघगर्जनेचा आभास निर्माण झाला आहे. शंकराचा निळा रंग मेघांसारखाच आहे. डोक्‍यावरील चंद्र विद्युल्लतेचा आभास निर्माण करत आहे. त्यामुळे कार्तिकेयाचे वाहन मयूर पर्जन्यराजाचे आगमन होणार म्हणून नृत्य करू लागले आहे. अशा प्रकारे पर्जन्याचे वातावरण निर्माण झाल्याने शंकराच्या अंगावरील नाग निवारा शोधू लागला आहे. जवळच नृत्यात तल्लीन झालेल्या गजराजाची सोंड म्हणजे बीळ समजून तो त्यात शिरण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या या प्रयत्नांमुळे विनायकाचे शरीर जोरात हलते व त्यातून सुगंध बाहेर पडतो. त्या सुगंधामुळे मधमाश्‍या विनायकाच्या भोवती रुंजी घालू लागल्या आहेत, असे हे मोठे विलोभनीय चित्र भरमाप्पांनी काढले आहे.


हस्तिदंतातील शिल्पे

रामचंद्र सुबराव गुडिगार या शिल्पकाराला तर राजेसाहेबांनी तत्कालीन म्हैसूर संस्थानातील शिरसी येथून आणले होते। त्यांनी चंदनात कोरलेली अनेक शिल्पे येथे आहेत. त्यांपैकी 1.5 बाय 1.2 मीटर आकारातील चंदनाच्या दोन लाकडांमध्ये त्यांनी रामायण आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येकी वीस प्रसंग कोरले आहेत. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत असताना स्वर्गातून पुष्पवृष्टी होत असल्याचेही त्यांनी दाखवले आहे. फार खोल न कोरतादेखील खोलीचा आभास किती प्रभावीपणे निर्माण करत येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुडिगारांची शिल्पे आहेत.महादेव पाथरवट यांनी हस्तिदंतातून निर्माण केलेली अप्रतिम शिले ेथे आहेत. हस्तिदंतामध्ये कोरलेल्या सुमारे साडेसात सेंटिमीटर उंचीच्या अंबारीत तर इतके बारकावे टिपले आहेत, की पाहणाऱ्याने आश्‍चर्य करीत राहावे. अंबारीत चढण्यासाठी छोटी शिडीदेखील हत्तीला लटकवली आहे. त्यासाठीच्या साखळीतील प्रत्येक कडी वेगळी आहे.श्रीमंत भवानरावांनी रा. द. चितारी आणि डी. व्ही. पंडित यांच्याकडून 1928 ते 1932 या काळात राजा रविवर्मा यांनी काढलेल्या अनेक चित्रांच्या प्रतिकृती तयार करून घेतल्या. मूळ चित्रांइतक्‍याच प्रतिकृतीही हुबेहूब वठल्या आहेत. गंगा-शंतनू, पुतना वध, आई आणि मूल, राधाकृष्ण ही चितारी यांची चित्रे आहेत. राधाकृष्ण आणि कृष्णाबरोबरच चितारलेला निसर्ग डोळ्यांना शीतलता देतो. सरोवराकाठी बसलेली राधा व कृष्ण, शीतल चंद्रप्रकाश आणि चंद्राचे सरोवरात पडलेले प्रतिबिंब हे सगळे इतके प्रभावीपणे मांडले आहे, की चुकून आवाज झाला, तर चित्रातील शांतता भंग पावेल किंवा सरोवरातील पाण्यावर थरार उमटतील, असे वाटते.या दालनातील शंतनू-सत्यवती, विश्‍वामित्र-मेनका, सैरंध्री ही डी. व्ही. पंडित यांची चित्रे आहेत. सैरंध्री या चित्रात कीचकासाठी मदिरा घेऊन निघालेल्या द्रौपदीच्या डोळ्यांतील असहायता स्पष्ट दिसते. तिचे डोळे इतके भरून आले आहेत, की पुढच्याच क्षणी त्यातून अश्रू ओघळतील, असे वाटल्याने आपण क्षणभर तिथेच थबकतो.राजा रविवर्मा यांनी काढलेली सैरंध्री ( 1890), दमयंती (1894), मल्याळी तरुणी (1892) ही चित्रेही संग्रहालयात आहेत. सैरंध्री हे त्यांचे उत्कृष्ट भावनादर्शक चित्र आहे. दुःखी झालेली सैरंध्री डोळ्यांना पदर लावून कीचकाच्या महालातून बाहेर पडते आहे व त्याच वेळी तिच्याकडे पाहणारा द्वारपाल या दोघांच्याही चेहऱ्यांवरील भाव खिळवून ठेवणारे आहेत. व्यक्तिचित्रणाकडे लक्ष देताना पार्श्‍वभूमीलाही त्यांनी तेवढेच महत्त्व दिले आहे. मागील भिंतीवरील हत्तीचे नक्षीकाम, दगडी पायऱ्या, जोत्याला असलेले लोखंडी कडे व त्याची सावली हे बारकावेदेखील तेवढ्याच तादात्म्याने मांडले आहेत. "दमयंती' चित्रातील दमयंतीचे रडून लाल झालेले डोळे पतिविरहाच्या दुःखाची तीव्रता दाखवतात.अनेकदा चित्रकारांच्या कलाकृतीचे कौतुक होते; परंतु त्यामागील कलाकारांचा विसर पडतो. कलाप्रेमी भवानराव मात्र याला अपवाद आहेत. या संग्रहालयात रावबहादूर एम. व्ही. धुरंधर यांनी काढलेले स्वतःचे चित्र, त्याचबरोबर आर. के. वेलणकर, अंबिका धुरंधर, रामचंद्र चितारी, बाबूराव पेंटर यांचीही चित्रे आहेत.परदेशी चित्रकारांच्या दालनात "पॅरिसमधील रस्ता' हे एस. कॉर्निल या चित्रकाराचे भव्य चित्र आहे. सुमारे पावणेदोन मीटर लांब व पावणेदोन मीटर रुंद, असा या चित्रात केवळ पॅचवर्कच्या आधारे सावल्यांचा खेळ मोठ्या कौशल्याने दाखवला आहे. मेअर ऍल्डिन या चित्रकाराची व्हेनिस शहराचे दृश्‍य दाखवणारी चित्रे येथे आहेत. प्रसिद्ध चित्रकार एफ. मोरली यांनी "सोंगट्यांचा खेळ' या चित्रात व्यक्तींच्या चेहऱ्यावर जुगारातील अनिश्‍चितता प्रभावीपणे रेखाटली आहे. प्रतिस्पर्धी सोंगट्या टाकत असताना आता काय दान पडणार, या विचारात असलेल्या समोरील व्यक्तीच्या चेहऱ्यावरील उत्सुकता, अनिश्‍चितता, भीती या भावनांचे मिश्रण आपल्याला पाहायला मिळते. त्याच वेळी खेळात पूर्णपणे गढून गेल्यामुळे हातात तसाच राहिलेला चिरुटही आपल्याला काही सांगत असतो. प्रत्यक्ष खेळात नसणाऱ्या; पण मागे राहून खेळातील उत्कंठतेचा आनंद घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील भावही आपण ओळखू शकतो.फ्रेंच चित्रकार जी. शीअरसी यांचे "व्हॉलंटिअर' किंवा "बालसैनिक' या प्रसिद्ध चित्राची मूळ कलाकृती येथे आहे. कमरेला कुकरी बांधून हातात बंदूक घेऊन मोठ्या दिमाखात हा बालसैनिक उभा आहे; परंतु कसल्या तरी विचारात असल्याने बालस्वभावाला अनुसरून त्याने तोंडात बोट घातले आहे.जीन ऑगस्टे इंग्रेस या चित्रकाराच्या 1856 मधील "स्प्रिंग' या चित्राची आणि आई व मूल या चित्राची डी. व्ही. पंडित यांनी केलेली प्रतिकृती, तसेच लालकाका यांनी केलेली "ऍडम अँड इव्ह' या चित्राची प्रतिकृती लक्ष वेधून घेते. "बेगरबॉय', "बागेतील मुले', "धुणे धुणाऱ्या महिला', "चहा पिणारा गृहस्थ', "बोकडाची गाडी' ही परदेशी चित्रकारांची वैशिष्ट्यपूर्ण चित्रे मनाला समाधान देतात.


लघुशैलीतील चित्रे

बंगाली शैलीतील चित्रांचे वेगळे दालन येथे आहे। नंदलाल बोस, भुवन वर्मा, शारदा उकील हे या शैलीचे पाईक होत। जलरंगाचा अतिशय देखणा वापर या शैलीत दिसतो. चित्र रेखाटन झाल्यानंतर रंग भरावयाचे व चित्र संपूर्ण धुवायचे, पुन्हा त्याच पद्धतीने रंग भरायचे, असे अनेक वेळा केल्यानंतर बारीक नाजूक रेषांनी चित्र पूर्ण करायचे, अशी ही शैली आहे. "दारुणावस्था', "भग्नतार', "जीवनज्योत' ही जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी भुवन वर्मा यांची चित्रे जीवनातील कटू सत्येही सांगतात.छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रांचे स्वतंत्र दालन येथे आहे. शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या कैदेत असतानाचे ए. एच. मुल्लर यांनी काढलेले भव्य देखणे चित्र येथे आहे. या चित्रातील शिवाजी महाराजांची आवळलेली मूठ त्यांच्या मनातील भावभावनांचे दर्शन घडवते. त्याच वेळी संभाजीराजे मात्र कोणतीही चिंता नसल्याने बालसुलभ स्वभावानुसार खिडकीत तलवारीशी खेळत बसले आहेत, तर हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर या महारजांच्या सेवकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत आहे.ही सर्व चित्रे, शिल्पे आणि नानाविध वस्तू पाहून आपण संग्रहालयाच्या पायऱ्या उतरू लागतो, तेव्हा दिग्मूढ होऊन जातो. छोट्याशा संस्थानच्या कलाप्रेमी राजाच्या छंदातून उभे राहिलेले हे संग्रहालय पाहून मन थक्क होते.


संग्रहालयात नैसर्गिक प्रकाशाचा वापर

जमवलेल्या सर्व कलाकृती जतन करण्यासाठी व त्या लोकांना पाहता याव्यात, यासाठी आयुष्याच्या उत्तरार्धात भवानरावांनी 12 एप्रिल 1937 रोजी श्री भवानी संग्रहालयाच्या वास्तूचे काम सुरू केले। ता. 12 जुलै 1938 रोजी ते पूर्ण झाले. त्या काळी या वास्तूसाठी 70 हजार रुपये खर्च आला. या वास्तूच्या रचनेचा आराखडा स्वतः भवानरावांनीच तयार केला. युरोपच्या दौऱ्यात त्यांनी अनेक संग्रहालयांच्या इमारती पाहिल्या होत्या. त्यांचा अभ्यास केला होता. त्यातूनच त्यांनी फारसा डामडौल नसलेली; परंतु कलाकृती पाहण्यासाठी येणाऱ्यांचा पूर्ण विचार करून या वास्तूची रचना केली. संग्रहालयात एक प्रवेशद्वार आणि एक दिशामार्ग असल्यामुळे एका दालनातून दुसऱ्या दालनात जात चौदापैकी एकही दालन पाहावयाचे राहून जात नाही. वास्तुरचनेत प्रकाशाचा अतिशय कल्पकतेने वापर करून घेतल्यामुळे चित्रे व शिल्पे पाहताना वेगळा आनंद मिळतो. आता यासारखीच आणखी एक इमारत शेजारी आहे. त्या ठिकाणी चित्र-शिल्पांची नव्याने आकर्षक मांडणी करण्यात आली आहे.


-सुहास यादव

1 comment:

Neeraja Aptikar said...

Excellent information. I had been there many times.