OPINIONMAKER

Wednesday, August 6, 2014

भविष्यवेत्ते, जनमत चाचण्या तोंडघशी


मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष म्हणजे शितावरून भाताची परिक्षा असा प्रकार असतो. पण भात करताना तांदूळ एकाच जातीचा असतो, त्याला मिळणारी उर्जा, वाफ एकसारखी असते. त्यामुळे भाताची परिक्षा करता येते. पण भारतासारख्या विविध जाती, धर्म, भाषा, संस्कृती अशी बहुविधता आणि प्रश्नांचीदेखील तशीच बहुविधता असेलल्या देशात सर्वेक्षणातून मतदानाच्या निकालाचे अंदाज वर्तवणे ही मोठीच जोखिम असते.


लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जनमत चाचण्या किंवा मतदानोत्तर चाचण्या घेणाऱ्या संस्थांचे अंदाज २००४ आणि २००९ मध्ये चुकले. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीला (एनडीए) झुकते माप दिले आणि प्रत्यक्षात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीला सत्ता मिळाली. अशा प्रकारे दोनदा तोंड पोळले असल्याने यावेळी बहुतेक सर्वेक्षण संस्थांनी भाजपच्या पदरात जरा जपूनच माप टाकले होते. त्यामुळेच यावेळी भाजप आघाडीला एवढा प्रचंड विजय मिळेल असा अंदाज कोणत्याच मतदानोत्तर चाचणीत दिसला नव्हता. अपवाद फक्त न्यूज२४-चाणक्यच्या चाचण्यांचा. न्यूज २४-चाणक्यने एनडीएला ३४० जागा मिळतील आणि त्यात भाजपचा वाटा २९१ जागांचा असेल असे म्हटले होते. कॉंग्रेस आघाडीला ७० जागा मिळतील आणि त्यात कॉंग्रेसचा वाटा ५७ जागांचा असेल असे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले होते. १-२ टक्क्यांचा फरक वगळता न्यूज२४-चाणक्यच्या मतदानोत्तर चाचण्या अचूक ठरल्या आहेत.

टाईम्स नाऊ-ओआरजी संस्थेच्या मतदानोत्तर चाचण्यांमधील निष्कर्ष मोठ्या प्रमाणावर चुकले आहेत. या संस्थेने कॉंग्रेस आघाडीला १४८ जागा मिळतील आणि भाजप आघाडीला २४९ जागा मिळतील असे म्हटले होते. भाजपचा एवढा प्रचंड विजय होईल आणि कॉंग्रेसचा अतिशय दारूण पराभव होईल असे निष्कर्ष न्यूज२४ वगळगता कुठल्याही संस्थेच्या चाचण्यांमध्ये दिसून आले नाहीत.
महाराष्ट्रात कॉंग्रेसचा पूर्ण वाताहात होईल असा निष्कर्ष कुठल्याही चाचण्यांमधून स्पष्ट झाला नव्हता. अगदी न्यूज २४ ने देखील महाराष्ट्रात कॉंग्रेसला ९ जागांवर विजय मिळेल असे नमूद केले होते. महाराष्ट्रातील महायुतीचे बहुतेक सर्व विजयी उमेदवार एक लाखापेक्षा अधिक मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. विजय आणि पराजयातील अंतर एवढे मोठे असताना देखील प्रत्यक्ष मतदानोत्तर चाचण्या घेताना त्याचा अंदाज येऊ शकला नाही. बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करताना भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार नाही आणि त्यांना आणखी मित्र जोडावे लागतील असे म्हटले जात होते. प्रत्यक्षात स्वबळावर सरकार स्थापन करता येईल एवढे स्पष्ट बहुमत भाजपला मिळाले आहे. 

एवढ्या त्रुटी राहण्याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे भारतासारख्या खंडप्राय देशात मतचाचणीसाठी प्रातिनिधीक समूह निवडणे हेच मुळी जिकीरीचे काम असते. जात, धर्म या गोष्टी बाजूला ठेवल्या तरी उद्योग, शेती, मजूर, कामगार, विद्यार्थी, तरुण, महिला, व्यावसायिक पुन्हा या सगळ्यांमधील आणखी उपगट या सगळ्यांचा प्रातिनिधीक समूह निवडणे शक्य होत नाही. या प्रत्येक वर्गाच्या आशा-आकांक्षा, अपेक्षा, समस्या, मागण्या वेगवेगळ्या असतात. पुन्हा प्रत्येक वर्गात आणखी उपवर्गवारी असते. व्यावसायिक म्हटले की मोठे व्यावसायिक, छोटे व्यावसायिक अशी वर्गवारी होते. पुन्हा त्यांच्यातही कष्ट करणारे आणि बुद्धीच्या क्षेत्रातील व्यावसायिक, त्यात पुन्हा डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटन्ट असे आणखी खोलात जाता येते. अशा स्थितीत जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यत आणि कच्छच्या रणापासून अरुणाचल प्रदेशपर्यतच्या नागरिकांचे म्हणणे टिपणे, त्याचे मत जाणून घेणे आणि ते सर्वेक्षणात योग्यरित्या परावर्तित होणे यात असंख्य अडथळे असतात. त्या प्रत्येक अडथळ्यांवर मात करत भारतासारख्य खंडप्राय देशात अचूक अंदाज वर्तवणे हे खरोखच मोठे आव्हानात्मक काम असते. आपल्या देशात जनमत चाचण्या आणि मतदानोत्तर चाचण्यांचे शास्त्र हळूहळू विकसित होऊ लागले आहे. दरवेळच्या अनुभवांनी त्यात समृद्धता येत ते परिपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करू लागेल.

एनडीटीव्ही-हंसा रिसर्च यांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांच्या विश्लेषण आणि निष्कर्षांसाठी सर्वेक्षणाच्या दोन वेगवेगळ्या पद्धती अवलंबण्यात आल्या होत्या. मतदान केंद्रावरील सर्वेक्षण आणि मतदानानंतर घरी जाऊन करण्यात आलेले सर्वेक्षण. यातील मतदान केंद्रावरील सर्वेक्षणासाठी ठराविक क्रमाने मतदार निवडण्यात आले होते. त्यांची संख्या होती ६३,७४०. या पद्धतीत मतदार मतदान करून केंद्राच्या बाहेर आला की त्याने कोणत्या उमेदवाराला मत दिले हे विचारण्यात आले. मतदानानंतर घरी जाऊन करण्यात आलेल्या सर्वेक्षणासाठी ९१,७१२ मतदारांची निवड करण्यात आली होती. या दोन्ही सर्वेक्षणाच्या विश्लषणातून एनडीटीव्ही-हंसा रिसर्च यांचे निष्कर्ष पुढे आले. त्यानुसार कॉंग्रेस आघाडीला १०३ तर भाजप आघाडीला २७९ जागा मिळणार असल्याचे सांगण्यात आले. हे निष्कर्ष आणि प्रत्यक्ष निकाल यात मोठी तफावत असल्याचे दिसून येते. हंसा रिसर्चने हे सर्वेक्षण १९ प्रमुख राज्यांमधील २६५ मतदारसंघात केले. प्रत्येक मतदारसंघातील विधानसभेचे तीन मतदारसंघ ठराविक क्रमाने निवडण्यात आले. अशा ७९५ विधानसभा मतदारसंघातील ३,१५० मतदान केंद्रे निवडण्यात आली होती. देशात प्रत्यक्ष निवडणुकीसाठी ९ लाख तीस हजार मतदान केंद्रे होती. त्या तुलनेत सर्वेक्षणासाठी फक्त ३,१५० मतदान केंद्रे निवडण्यात आली होती.   सर्वेक्षणात एकूण १,५५,४५२ मतदारांचा सहभाग होता. देशात सुमारे ८१ कोटी ४० लाख मतदार आहेत. त्यापैकी ६६ टक्के मतदारांनी यावेळी मतदान केले. म्हणजेच साधारणपणे ५० कोटी मतदारांनी मतदान केले असे गृहित धरले तर त्या तुलनेत मतदानोत्तर चाचण्यांसाठी हंसा रिसर्चने केलेली मतदारांची निवड अगदीच तुटपुंजी ठरते. त्यातही पुन्हा जात-धर्म-प्रांत, प्रादेशिक अस्मिता, भाषा यानुसार होणारे मतदान, वर्गवारी आणि समस्यांच्या तीव्रतेनुसार आणि प्राधान्यानुसार होणारे मतदान या तुटपुंज्या प्रातिनिधिक सॅम्पलमध्ये परावर्तित होण्यासाठी अतिशय काटेकोर काम करावे लागते. 

एखाद्या उत्पादनाच्या सर्वेक्षणासाठी पुरेसा अवधी हाती असतो. त्यामुळे त्या उत्पादनासंदर्भात अतिशय अचूक निष्कर्ष मिळू शकतात. पण मतदानोत्तर चाचण्या आणि त्याचे निष्कर्ष जाहीर करण्याची स्पर्धा पाहिली तर विश्लेषणामध्ये विविध पातळ्यांवरील त्रुटींचा शेवटी एकत्रित हिशेब मांडला तर त्याचा मोठा परिणाम निष्कर्षांवर होऊ शकतो. त्यामुळेच भाजपचे नेते, हितचिंतक, कार्यकर्ते यांना नरेंद्र मोदींची सुनामी असल्याचा अंदाज आला होता तो बहुतेक चाचण्यांमध्ये दिसून आला नाही. उलट भाजपचे हितचिंतक स्वाभाविकपणे भावनिकतेतून ही सुनामी पहात असल्याची टिप्पणी करण्यात आली. आपल्या देशातील निवडणुकांमध्ये भावनांचा भाग मोठा असतो. भावनिक आवाहन करून लोकांवर प्रभाव टाकण्यात नेत्यांचा हात कुणी धरू शकणार नाही. अर्थात अशा या भावनिकतेने भारलेल्या वातावरणात सर्वेक्षणात सहभागी झालेले मतदार आणि सर्वेक्षण करणारे, त्याचे विश्लेषण करणारे कितपत तटस्थपणे मत मांडत असतात, कार्यरत असतात हा संशोधनाचा विषय आहे. पुन्हा या सगळ्या त्रुटींचा एकत्रित परिणाम निष्कर्षांवर होतोच. 
अगदी सीएलएसए या आशियातील आघाडीच्या ब्रोकरेज-इन्व्हेस्टमेंट ग्रुपने मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांबाबत गुंतवणूकदारांना सावधगिरीची सल्ला दिला होता. अशा चाचण्यांच्या निष्कर्षांमध्ये त्रुटी असतात हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे असे नमूद करून कंपनीने म्हटले होते की चाचण्यांचे निष्कर्ष आणि १६ मे रोजी जाहीर होणारे प्रत्यक्ष निकाल यात पाच टक्क्यांचा जरी फरक पडला तरी शेअर बाजारात मोठी पडझड होऊ शकते. सुदैवाने चाचण्यांतील निष्कर्षांपेक्षा भाजपला पाच टक्के जागा जास्तच मिळाल्याने शुक्रवारी शेअरबाजारातील तेजी कायम राहिली.

माणसाला प्रत्यक्ष निकालाआधीच मतदानयंत्रात काय दडले आहे हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. त्यातूनच मतदानोत्तर चाचण्यांचा निष्कर्षांना मोठा प्रतिसाद मिळतो. त्याचपद्धतीने निवडणुकीत काय होणार हे जाणून घेण्यासाठी अनेक उमेदवारही ज्योतिषांची मदत घेत असतात. त्यासाठी ज्योतिषीदेखील भाकिते वर्तवून स्वतःचे मार्केटिंग करत असतात. पुण्यातील कथित ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार यांनी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होऊ शकणार नसल्याचे सांगितले होते. बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष असलेल्या जकातदार यांच्या मते मंगळ आणि शनी हे मोदींच्या बाजूने नसल्याने त्यांची पंतप्रधानपदाची इच्छा पूर्ण होऊ शकणार नाही. भाजपला १५५ ते १६५ जागा मिळतील असे त्यांनी म्हटले होते तर कॉंग्रेसला ११५ ते १२५ जागा मिळतील असे सांगितले होते. तसे काहीच घडलेले नाही. गणेशास्पीक्स डॉट कॉम या भविष्यविषयक संकेतस्थळाने भाजपला २०० ते  २२५ आणि कॉंग्रेसला १०५ ते १२५ जागांचे भाकित केले होते. ते देखील सत्यात उतरले नाही. अर्थात अशा भाकितांनी फारसा आधार नसतो. त्यामुळे फक्त अंधश्रद्धाळू नेतेमंडळी स्वतःचे मानसिक संतुलन राखण्यासाठी अशा भाकितांचा आधार घेत असतात.

(२१ मे २०१४ रोजी दै. दिव्यमराठी मध्ये प्रकाशित झालेला लेख)

-सुहास यादव



No comments: