OPINIONMAKER

Monday, April 28, 2014

सत्तेसाठी बेभान

जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचा अभिमान आपण बाळगत असताना या लोकशाहीत सत्तेसाठी बेताल आणि बेभान विधाने करणारे नेते बघितले की आपलीच मान शरमेने खाली जाते. याचा इलाज मतदारांच्याच हाती आहेत. लोकशाही प्रगल्भ होण्याच्या प्रक्रियेत अशा प्रवृत्ती संपून जातील असा आशावाद आपली व्यवस्था आणखी बळकट करेल.निवडणूक प्रचारादरम्यान बेताल आणि भंपक विधाने करणाऱ्या नेत्यांना पुरस्कार द्यायचे ठरले तर त्यासाठीदेखील मोठी चुरस निर्माण होईल इतकी व्देषमूलक, समाजात फूट पाडणारी आणि वैयक्तिक बाबी चव्हाट्यावर आणणारी विधाने बहुसंख्य नेत्यांनी केली आहेत. पुरस्कारासाठी नामांकन यादी करायचे म्हटले तरी ती सर्वपक्षीय आणि सर्वसमावेशक होईल. कारण बेताल विधाने करण्यात सगळ्याच पक्षाचे नेते आहेत. एकाला झाकावा आणि दुसऱ्याला पुढे करावा अशी परिस्थिती नाही. देशातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांना हात घालण्यात अपयश आले आहे आणि त्या प्रश्नांची तड लागू शकत नाही म्हटल्यावर आपले अपयश झाकण्यासाठी नेत्यांकडून बेताल विधाने होऊ लागतात. मराठी माणसाचा कैवार घेऊन लढत असल्याचे भासवणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी तर महाराष्ट्रातील विकासाच्या प्रश्नांऐवजी आरोग्यदायी सूप आणि तळकट वडे घेऊनच भांडायला सुरवात केली. त्याचे कारण म्हणजे शिवसेना वर्षानुवर्षे मुंबई महापालिकेत सत्तेवर असूनही कोणतीही ठोस विकासकामे त्यांना दाखवता येत नाहीत. तीच परिस्थिती नाशिक महापालिकेत राज ठाकरे यांची झाली आहे. मग विकासकामे दाखवता येत नाही म्हटले की दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन भावनिक साद घालण्याचा शॉर्टकट स्वीकारला जातो. पण आता जनतेला त्यातही रस नाही. कितीवेळा यांची भावनिक साद ऐकून प्रतिसाद द्यायचा असा प्रश्न जनतेला पडला आहे.

काँग्रेसचे सहारपूर येथील उमेदवार इम्रान मसूद यांनी बेफाम वक्तव्ये करण्याची सुरवात केली. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे तुकडे तुकडे करण्याची भाषा मसूद यांनी केली होती. पोलिसांनी त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांच्या कोठडीत पाठवले. मात्र यापासून कुणीही धडा घेतला नाही. विकासाचे मुद्दे सोडून बेफाम आणि व्देषयुक्त बडबड करणे नेत्यांनी चालूच ठेवले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तर शाई पुसून दुबार मतदान करण्याचा धक्कादायक सल्ला मतदारांना दिला. वर्षानुवर्षे सगळी सत्तास्थाने ताब्यात असूनही राज्यातील उसउत्पादक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रीय कृषिमंत्री न्याय देऊ शकलेले नाहीत. लिटरला वीस-पंचवीस रुपये भाव मिळणार असेल तर शेतकऱ्याच्या बायकांनी रोज शेणामुतात कशाला हात घालायचा, या राजू शेट्टींच्या प्रश्नाला पवारांना समर्पक उत्तर देता येत नाही. मग दुबार मतदानाचा जोक करण्याची पाळी त्यांच्यावर येते. गेली पंचेचाळीस वर्षे लोकांमधून निवडून येत असल्याचे पवार अभिमानाने सांगतात आणि त्याचवेळी इतक्या वर्षात त्यांना बारामती तालुक्यातील 21 गावांचा पाणीप्रश्न सोडवता आलेला नसतो. पाण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने लढा देऊन कंटाळलेले ग्रामस्थ मग पवारांच्या वाढदिवसाला काळ्या कापडाच्या गुढ्या उभारतात तेव्हा पवारांना तो अपमान वाटतो. पाण्याचा प्रश्न गांभीर्याने घेण्याऐवजी आणि निश्चित मुदतीत पाणी देण्याचे वायदा करण्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार मतदानाच्या आदल्या रात्री जाऊन ग्रामस्थांना दमदाटी करतात.

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा उजवा हात म्हणून ओळख असलेल्या अमित शाह यांनी उत्तर प्रदेशात केलेले विधान म्हणजे भाजप आजही धर्माधारित राजकारणातून बाहेर पडला नसल्याचे निदर्शक आहे. सप्टेंबर 2013 मध्ये उत्तर प्रदेशातील मुझ्झफरनगरमध्ये हिंदू-मुस्लिम दंगली झाल्या. त्यात 49 जणांना आपले प्राण गमवावे लागले. या दंगलीचा तुम्हांला बदला घ्यायचा असेल तर भाजपला मतदान करा, असे खुलेआम आवाहन त्यांनी केले होते. मुळात मतदान हे व्यक्ती किंवा पक्षाचा बदला घेण्यासाठी नव्हे तर प्रगती आणि विकासासाठी सकारात्मक विचारांनी व्हायला हवे, अशी वैचारिक मांडणी शाह यांच्या गावी नसेल. मग त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर भाषणे करण्यास बंदी घातली. अखेरीस शाह यांनी चूक मान्य केल्यावर आयोगाने त्यांच्यावरील बंदी मागे घेतली. आजच्या घडीला भाजपमध्ये नरेंद्र मोदींच्या पाठेपाठ क्रमांक दोनचे स्थान असलेल्या नेत्याच्या मनात बदला घेण्याचे विचार घोळत असतात हे कशाचे लक्षण आहे? भाजपचे आणखी एक `बुद्धीवंत` नेते गिरीराजसिंह यांनी तर निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र मोदींच्या विरोधकांना पाकिस्तानात पाठवण्याची भूमिका मांडली आहे.  एकूणच या नेत्यांचा बुद्ध्यांक तपासण्याची गरज आहे असे वाटण्यासारखी स्थिती आहे. पुन्हा या लोकांच्या मागे असे किती जनमत असते की त्यांनी वाट्टेल ती बेताल विधाने करावीत आणि पक्षाने आणि देशानेदेखील अशी निर्बुद्ध विधाने ऐकून घ्यावीत? पुन्हा लोक मागे असणे म्हणजे काहीही बरळण्याचा अधिकार मिळत नाही हेदेखील या नेतेमंडळींनी लक्षात घेतले पाहिजे.


समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव, अबू आझमी हे अजूनही सोळाव्या शतकातच असल्याप्रमाणे अकलेचे तारे तोडत असतात. बलात्कार करणाऱ्यांना पाठीशी घालताना मुलांकडून चुका होतात असे मुलायमसिंग म्हणाले होते. त्याचबरोबर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यासही त्यांनी विरोध केला होता. अबू आझमी यांनी तर बलात्कार करणाऱ्याबरोबरच या गुन्ह्यात बळी पडलेल्या स्त्रीलादेखील फासावर लटकवावे असे भंपक विधान केले होते. या दोन नेत्यांची या बेफाम वक्त्यव्यांना मुलायमसिंगांच्या सनूबाई डिंपल यादव आणि आझमींची सून अभिनेत्रा आयेशा टाकिया यांनीच विरोध केला.

तमाम भारतीयांना अभिमान वाटावा अशी भारतीय लष्कराची कामगिरी आहे. असे असताना कारगिलमधील शिखरे मुस्लिम सैनिकांनी परत मिळवली असे धार्मिक विव्देष पसरवणारे विधान समाजवादी पक्षाचे नेते आझमखान यांनी केले. आपण जातीयतेच्या चिखलात लोळत असताना लष्करालाही त्यात ओढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आझमखान यांच्या मानसिकतेत बदल होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत हे देशाचे मोठे दुर्दैव आहे.

योगगुरू रामदेवबाबा हे तसे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. पण निवडणूक लढवणाऱ्या त्यांच्या शिष्याला त्यांनी दिलेला सल्ला ऐकून तर भगव्या वस्त्रातील साधूं-संन्याशांवरील जनतेचा विश्वास उडावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. रामदेवबाबांनी बाहेर राहून सत्तेत असणाऱ्यांवर अकुंश ठेवण्याची भूमिका घेतली पाहिजे. असे असताना बाबा सध्या सक्रीय राजकारणात उतरले आहेत. राजस्थानातील अल्वर मतदारसंघात त्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा करून त्यांचे शिष्य महंत चांदनाथ यांच्यासाठी भाजपची उमेदवारी आणली. आता प्रचार टिपेला पोचला असताना मतदारसंघात पैसा येण्यात अडचणी निर्माण झाल्याचे भगव्या कपड्यातील चांदनाथ यांनी बाबांना सांगितले. दोघांच्या दुर्दैवाने आणि जनतेच्या सुदैवाने तेव्हा पत्रकार परिषदेसाठी तयार असलेल्या वृत्तवाहिन्यांचे मायक्रोफोन चालू होते. चांदनाथ यांचे ते विधान सगळ्यांना ऐकू गेल्याचे बाबांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यांना दामटले व इथे हे बोलू नका असा सल्ला दिला. म्हणजे पैशाबाबत आपण नंतर बोलू असेच बाबांनी सुचवले. काळा पैसा देशात परत आणण्यासाठी मोहिम राबवणाऱ्या रामदेवबाबांचा एक नवा चेहरा या निमित्ताने जनतेसमोर आला. पण एवढ्यावर गप्प बसतील ते बाबा कसले?  योग आणि ध्यानधारणेमुळे मानसिक संतुलन बिघडत नाही असे म्हणतात. पण बाबांचे संतुलन पूर्णपणे बिघडल्याचे निवडणुकीच्या काळात स्पष्ट झाले. संतांनी कुणाचा व्देष, मत्सर करू नये असे म्हणतात पण, बाबांना गांधी घराण्याची इतकी कावीळ झाली होती की, राहुल गांधी हे दलितांच्या घरी पिकनिक आणि हनीमूनसाठी जातात असे अत्यंत खालच्या थराचे विधान त्यांनी केले. कशापेक्षाही दलित जातीतील स्त्रीची बदनामी करणारे हे विधान होते. कुणावर टीका करताना आपण काय बोलतो आहोत याचे भान बाबांना राहिले नव्हते. दुसऱ्या दिवशी यावर मोठा गदारोळ झाल्यावर बाबांनी माफी मागण्याचे नाटक केले.

या सगळ्या नेत्यांची विधाने पाहिली की यांचे खायचे दात आणि दाखवयाचे दात वेगळे आहेत हे लक्षात येते. हे सगळे आपल्याच महान लोकशाहीतील नेते आहेत. त्यांना सुधारण्याची जबाबदारी नियतीने मतदारराजावर सोपवली आहे.


-सुहास यादव

No comments: