OPINIONMAKER

Monday, March 28, 2011

ज्योतिषांचा सायकॉलॉजिकल गेम...



ज्योतिषी नेहमी सायकॉलॉजिकल गेम खेळत असतात. समोरच्याला या गोष्टीची कल्पना नसते त्यामुळे तो बेसवाध असतो. त्यामुळेच या गेममध्ये विजय नेहमी ज्योतिषांचा होतो. मात्र, पुण्यातील  एक ज्योतिषी मोठी शेखी मारायला गेले आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताच्या पराभवाचे भाकित केले. आता पुण्यातील ज्योतिषाने सांगितल्यावर भारताचा पराभव अटळ होता. परंतु युवराजसिंग आणि रैना यांना हे मान्य नव्हते. हे कसे काय घडले....
गेल्या आठवड्यात पुण्यातील महान, जगप्रसिद्ध ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी विश्वकरंडक  क्रिकेट स्पर्धेतील भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्यापूर्व फेरीतील सामना ऑस्ट्रेलिया जिंकेल, असे  भाकित केले होते. पुण्यातील काही वर्तमानपत्रांमध्ये ते प्रसिद्धी झाले होते. पण भारताने सामना  जिंकला आणि ज्योतिषी सपशेल तोंडावर पडले.

ज्योतिषांचे मार्केटिंग तंत्र
ही ज्योतिषी मंडळी अतिशय धूर्त आणि चलाख असतात. ती कधीही नेमकेपणाने भविष्य सांगत  नाहीत. त्यांचे सगळेच मोघम असते. म्हणजे बोलणे अतिशय प्रभावी पण सांगताना गुरु या घरात  गेला तर किंवा शनी आडवा आला तर... असे सांगून समोरच्याला सांगायचे की तुमच्या आयुष्यात  असे होणार. म्हणजे झाले तर ज्योतिषाचा विजय आणि भविष्य चुकले तर पराभव भोळ्याभाबड्या  जनतेचा आणि त्या गुरु आणि शनीचा.  अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या भंपक ज्योतिषांना अनेकवेळा आव्हान दिले आहे. परंतु त्यांनी हे आव्हान कधीच स्वीकारले नाही. कारण मुळात  ज्योतिष हे काही शास्त्र नाही. काही लोकांनी आपली पोटे भरण्यासाठी चालवलेला तो धंदा आहे.  सध्याच्या खुल्या अर्थव्यवस्थेत आणि स्पर्धेच्या जगात तर सामान्य माणसाचे जगणे अतिशय  अनिश्चित झाले आहे. व्ययवसाय, उद्योग, नोकरी याठिकाणी असलेली आव्हाने, स्पर्धा, टार्गेट याला  तोंड देताना माणूस अगदी मेटाकुटीला आला आहे. नेमका याच अनिश्चिततेचा फायदा या ज्योतिषी  मंडळींनी उचलला आहे. त्यांचे मार्केटिंगचे तंत्र तर अगदी वाखणण्याजोगे आणि अभ्यासण्यासारखे  आहे. या मार्केटिंग तंत्राचा अतिशय हुशारीने वापर करत अनेक ज्योतिषांनी आणि खडेवाल्यांनी  आपली भरभराट करुन घेतली आहे.

बिच्चारा पॉंटिंग...   
तर प्रश्न  होता मारटकरांच्या अभद्रवाणीचा. त्यांनी भारताच्या पराभवाचा भाकित केले तरी  युवराजसिंग, सुरेश रैना आणि जबरदस्त जिद्दीच्या जोरावर विजय खेचून आणला आणि विश्वकरंडक  विजेतेपदाचे दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलियाला घरचा रस्ता दाखवला. आता उताणे पडलेले ज्योतिषी  म्हणतील की, भारताच्या राशीतील गुरु प्रभावस्थानी आला होता किंवा रिकी पॉंटिंगला शनी आडवा   गेला होता म्हणून ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. बिच्चारा पॉंटिंग. बरे झाले त्याचा या ज्योतिषी  मंडळींशी संपर्क आला नाही. नाहीतर सराव, तंदुरुस्ती, खेळात नव्या तंत्रज्ञानाचा वापर या गोष्टींचा  वापर बाजूला ठेऊन त्याने शनीला शांत करण्यासाठी शनिवार वाड्यासमोर अनुष्ठान घातले असते.  लोकांच्या मानसिकतेचा कसा फायदा उठवायचा हे ज्योतिषांना बरोबर कळते. माणूस हा जगात  सर्वात भित्रा प्राणी. त्याचबरोबर कुणीही कौतुक केले की माणूस सुखावतो. कमीत कमी मनातल्या  मनात तरी हुरळून जातो. अगदी सामान्य कुवतीच्या आणि आळशी व्यक्तीला एखादा ज्योतिषी  सांगू लागला की,  तुम्ही किती बुद्धीमान आहात, ऑफिसमध्ये, घरात तुम्ही किती कष्ट करता  आणि तुमच्या कष्टाचे कसे चीज होत नाही. कुणाला तुमच्या गुणवत्तेची कदर करावीशी वाटत  नाही, असे म्हटले की,  समोरची व्यक्ती मनातल्या मनात तुमच्या पूर्णपणे कह्यात आलेली असते.  कारण बुद्धीमान, कष्टाळू म्हटलेले कुणाला आवडणार नाही. अशा प्रकारे एकदा मानसिक दृष्ट्या कह्यात आलेल्या व्यक्तीला नंतर काहीही सांगितले तरी तो मान डोलवत राहतो.   त्यामुळे ज्योतिष हा एक सायकॉलॉजिकल गेम आहे. त्यात सामान्य माणूस नेहमी पराभूत होतो.  अशा प्रकारे पराभूत होतो की, आपल्याला कुणी फसवले आहे याचे भान त्याला कधीही येत नाही.  जयंत नारळीकर यांच्यासारखे वैज्ञानिक, विज्ञाननिष्ठ व्यक्ती किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे  कार्यकर्ते नेहमीच अशा सायकॉलॉजिकल गेममध्ये सरस ठरू शकतात, याची पूर्ण जाणीव असल्याने  ही ज्योतिषी मंडळी त्यांच्यापासून फटकून राहतात.

अतिरेक्यांचा ठावठिकाणा का नाही सांगत?  
खरे तर ज्योतिष हे एवढे प्रभावी शास्त्र असेल तर मग एकही ज्योतिषी भोपाळमध्ये या दिवशी  वायूगळती होणार आहे, मुंबईत अतिरेकी अमुक तारखेला घुसणार आहेत किंवा अमुक राजकीय नेता या दिवशी या ठिकाणी लाच स्वीकारणार आहे, अशी माहिती संबंधित यंत्रणांना सांगून देशाचे,  समाजाचे होणारे नुकसान, मनुष्यहानी का वाचवू शकत नाहीत? ते असे करत  नाहीत याचे कारण  याविषयीचे भाकित करण्याचे कोणतेही शास्त्र त्यांच्याकडे नाही. सामान्य माणसावर भपका,  वातावरण याचा प्रभाव टाकून आणि बोलण्यात गुंतवून फसवण्याचे कसब आणि हुशारी मात्र  यांच्याकडे असते. त्याबाबत त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही.

ज्योतिषांचे विनोद
आपल्याच कोषात मश्गूल असलेल्या या मंडळींना कधीकधी आपण काय विनोद करतो, याचेही भान  राहत नाही. एम. कटककर नावाने वावरणार्‍या पुण्यातील एका ज्योतिषाने तर 'पूना'चे पुणे झाले  आणि पुण्यात चंगळवाद वाढला असा शोध लावला आहे. यामुळे मराठीचा अभिमान बाळगणार्‍यांची  मात्र, पंचाईत होण्याची शक्यता आहे. कारण आता चंगळवाद रोखायचा तर पुन्हा 'पूना' म्हणावे  लागेल. 'पूना' असे नाव होते तेव्हा हे शहर रवी ग्रहाच्या अधिपत्याखाली होते आणि त्यामुळे इथली  कलासंस्कृती वाढत होती. शहराचे नाव पुणे झाल्यानंतर मात्र शहर शुक्राच्या अधिपत्याखाली गेले  असे त्यांचे म्हणणे आहे. मुंबईचे नाव बॉम्बे असताना शहर शनीच्या अधिपत्याखाली होते आणि ते  मुंबई असे बदलल्यानंतर मंगळाच्या अधिपत्याखाली आले आणि हिंसक घटनांमध्ये वाढ झाली, असा  हास्यास्पद शोध त्यांनी लावला आहे.

-सुहास यादव

हे सगळे पाहिल्यावर या भंपक लोकांच्या किती नादी लागायचे ते ज्याचे त्याने ठरवावे. पण एक  गोष्ट निश्चित तुमच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्हांला  कुणीही अडवू शकत नाही. असे भविष्य बदलण्याची शक्ती प्रत्येकात असते. ती शक्ती, उर्जा  सकारात्मकपणे कशी वापरायची, विज्ञाननिष्ठ विचारसरणीतून काय होऊ शकते याचे उदाहरण  म्हणजे ज्येष्ठ उद्योगपती प्रतापराव पवार. त्यांच्या आयुष्यातील एक घटना. त्यांच्याच शब्दात...
(वाटचाल या पुस्तकातून साभार)
----------------------------------- ------------------------

इच्छाशक्ती

१९७४ च्या एप्रिल-मे मधील प्रसंग. मी काही कामासाठी डेक्क्न क्वीनने सकाळी मुंबईला गेलो होतो. ऑफिसमध्ये पोचताच मला निरोप मिळाला, की तुमच्या आईंना बरे वाटत नाही आणि म्हणून  त्यांनी तुम्हांला ताबडतोब भेटायला बोलवले आहे. अर्थातच मी माझी सर्व कामे रद्द केली. तसे  संबंधितांना कळवण्याची व्यवस्था केली आणि 'सारंग' इमारतीकडे प्रयाण केले.

त्यावेळी महाराष्ट्र सरकारने मंत्र्यांसाठी एक अपार्टमेंटवजा इमारत बांधली होती. शरदराव तिथे राहत  असत. त्यामुळे आई त्यांच्याकडे वास्तव्याला होती. मी काळजीतच इमारतीच्या आवारात शिरलो.  तिथे पोलिस उभे होते.
त्यांच्याकडे चौकशी केली , ''कुणी डॉक्टर आले होते का?''
त्यांनी   नकारात्मक उत्तर दिले.
घरात गेल्यावर विचारले, की आईचे जेवण झाले आहे का? त्यावर 'होय'  असे उत्तर मिळाले.
मी थोडासा गोंधळलो. नंतर ज्या खोलीत आई होती तिथे मी गेलो.
तिच्याभोवती दोन-तीन व्यक्ती बसल्या होत्या. मी आईला विचारले, ''काय झाले तुम्हांला आणि
डॉक्टरांना का नाही बोलवले?'' त्यावर आईने बैस तिथे, अशी आज्ञा केली. ''तुझी ओळख करुन देते''  असे म्हणून तिघांची ओळख करुन दिली.  आईने सांगितले, ''हे गृहस्थ ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत  ज्ञानी आहेत. अतिशय निरपेक्ष, मदतशील असे आहेत. त्यांना तुझा हात दाखव.''

मला एकामागून एक धक्के बसत होते. कारण देवपूजा,  मुहूर्त असल्या गोष्टींवर माझ्या
आई-वडिलांचा विश्वास नव्हता. आयुष्यभर त्यांची वागणूक याच पद्धतीची होती. त्यामुळे आईच्या
सध्याच्या वागण्याचे मला आश्चर्य वाटले आणि थोडा रागही आला.

मी म्हणालो, ''तुमची तब्येत  ठीक आहे, मग मला असा का निरोप पाठवलात?'' तिचे उत्तर होते, ''त्याखेरीज सर्व कामे सोडून तू  पळत येणार नाहीस म्हणून.''

मी तिला विचारले, ''हा सगळा काय प्रकार आहे? भविष्यावर तुझा कधीपासून विश्वास बसायला
लागला आणि ते तुझ्या आतापर्यंतच्या शिकवणुकीच्या विरुद्ध आहे.''
ती म्हणाली, ''असू दे. तू त्यांना हात दाखव.''
भविष्य जाणणारे गृहस्थ-आपण त्यांना जोशी म्हणू या- या सगळ्या चर्चेने चकीत झाले होते. त्यांनी  न बोलता त्यांच्यावर लिहून आलेले अनेक लेख , वेगवेगळ्या वर्तमानपत्रातील, मासिकांमधील कात्रणे  माझ्यासमोर ठेवली. मी त्या लेखांवर नजर टाकली आणि म्हणालो, ''माफ करा, मी आपल्याला  ओळखतही नाही. आपल्यावर अविश्वास दाखवण्याचा माझा प्रयत्न नाही. विषय होता तो माझ्या  आईच्या वागण्याचा.''

(काही महिन्यानंतर आईचे निधन झाले. तिला याची चाहूल लागली असावी. मी सर्वात धाकटा
असल्याने कदाचित काळजीपोटी हे सर्व झाले असावे. )

नंतर त्यांनी माझी तर्जनी चिमटीत पकडली आणि मला सांगितले, की तुमच्या कोपरला कंप  जाणवला की,  मला इशारा करा, मला आवश्यक वाटेपर्यंत मी तुमची तर्जनी धरुन ठेवतो.
''ठिक आहे,'' मी म्हणालो आणि त्याप्रमाणे सर्व प्रक्रिया पार पडली. पाच-दहा मिनिटांनी त्यांनी आईच्या परवानगीने माझे भविष्य सांगण्यास सुरवात केली. त्यांचे सांगून झाल्यावर मला थोडेसे   हसू आले. जोशी म्हणाले, ''तुमच्या चेहर्‍यावर मिश्किल हास्य का?''

मी म्हणालो, ''तुमचे अभिनंदन करायला पाहिजे. तुम्ही माझ्या आईला खुश केलेत.''
कारण आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक अशा सर्व क्षेत्रात मी कसा उच्च पदाला पोचणार आहे,
उच्च यश मिळवणार आहे वगैरेबाबत त्या भविष्यात सांगितले होते.
मी जोशींना म्हणालो, ''कुठल्या आईला आपल्या मुलाचे भविष्य असे असावे असे नाही वाटणार? ''
त्यावर जोशी म्हणाले, ''तुमचा विश्वास बसलेला दिसत नाही.''
''होय ती वस्तुस्थिती आहे,'' मी म्हणालो.
ठीक आहे म्हणून त्यांनी आव्हानात्मक पद्धतीने विचारले की, ''तुमच्यासमोर एखादा मोठा प्रश्न  भेडसावात असेल, ज्याबद्दल तुमच्या मनात चिंता आहे. तो मला सांगा. त्याचे काय होईल ते मी  सांगतो. त्यात आपल्या दोघांची परिक्षा होईल.''
''काही हरकत नाही,'' मी म्हणालो.

मी सुरवात केली. ''मला युरोपात जायचे आहे आणि गेले महिनाभर मी धडपडतो आहे, पण मला परकीय चलन काही मिळत नाही. आपण हाच विषय घेऊ आणि त्यात काय होईल ते मला सांगा.''

जोशीबुवांनी पुन्हा माझे बोट धरले आणि पाच-दहा मिनिटांनी गांभीर्यपूर्वक सांगितले की, ''यंदा
तुम्ही परदेशी जाऊ शकणार नाही. तो योग नाही.''

मी म्हणालो, ''अहो, असे कसे शक्य आहे? मला तर जायलाच पाहिजे.''

ते म्हणाले, ''तुम्ही तुमचे सर्व मानवी प्रयत्न करा. फार तर विमानात जाऊन बसू शकाल, पण
विमानाचे उड्डाण होणार नाही.''

मी म्हणालो, ''तुमच्या अंदाजानुसार मी केव्हा परदेशात जाऊ शकेन?''
''कदाचित पुढच्या वर्षी,'' त्यांनी उत्तर दिले.

मी म्हणालो, ''बघा बरं का, मी प्रयत्न करणार आहे.''

ते म्हणाले, ''जरुर करा. हवी तेवढी धडपड करा. ती सर्व वाया जाणार आहे, एवढे लक्षात ठेवा.''

मी त्यांचा नाव आणि पत्ता लिहून घेतला.
सुमारे दीड महिन्यानंतर मी जोशीबुवांना गाठले. माझा पासपोर्ट, वापरलेले तिकिट, परकीय चलन  घेतल्याची पावती, लंडनच्या एअरपोर्टवरील शिक्का एवढ्या गोष्टी त्यांना दाखवल्या आणि म्हणालो,
''याच्यावरही तुमचा विश्वास बसत नसेल, तर हा शरद पवारांचा फोननंबर आणि पत्ता. त्यांना
तुम्ही विचारू शकता.''

जोशीबुवा पूर्णपणे चक्रावून गेले होते. थोड्यावेळाने त्यांनी पुन्हा माझे बोट धरले आणि म्हणाले,
''नाही. तुमच्या नशिबात यंदा परदेशगमनाचा योग नाहीच.''

मी सादर केलेल्या पुराव्यांकडे बोट दाखवून मी  म्हणालो, ''मग हे काय?
ते उत्तरले, ''सर्वसामान्य माणूस पहिल्या चक्राच्या बाहेर जाऊ शकत नाही. दुसर्‍या चक्राला भेदणारे
काही लोक असतात. पण तिसर्‍या चक्राला भेद देणारी तुमच्यासारखी व्यक्ती काही कोटींमध्ये
एखादीच असते. त्यामुळे आयुष्यात तु्म्हांला असा अनुभव अनेक वेळा येईल. तुमच्या मनात इच्छा
निर्माण होताच त्याची पूर्तता होईल. हे माझे शब्द ध्यानात ठेवा.'' 
-प्रतापराव पवार
--------------------------------------------------------------------- 


1 comment:

mynac said...

सुहासजी,सप्रेम नमस्कार,
ह्या वर ते उत्तरले,''सर्वसामान्य माणूस पहिल्या चक्राच्या बाहेर जाऊ शकत नाही. दुसर्‍या चक्राला भेदणारे काही लोक असतात. पण तिसर्‍या चक्राला भेद देणारी तुमच्यासारखी व्यक्ती काही कोटींमध्ये
एखादीच असते. त्यामुळे आयुष्यात तु्म्हांला असा अनुभव अनेक वेळा येईल. तुमच्या मनात इच्छा
निर्माण होताच त्याची पूर्तता होईल. हे माझे शब्द ध्यानात ठेवा.''....म्हणजे झाली का कमाल?अहो,जाता,जाता त्यांनी प्रतापरावांचे पुन्हा भविष्यच सांगितले.
आता नक्की आठवत नाही,पण बहुदा श्री.सुहास डोंगरे ह्यांचा,८० च्या दशकातील एका ग्रहांकितच्या दिवाळी अंकात अंगलक्षणानुसार भविष्य असा लेख आला होता,नि अमिताभची अंगलक्षणे त्याच्या उत्तुंग यशाशी कशी विरोधी असूनही केवळ प्रचंड ईच्छाशक्तीच्या जोरावर तो कसा प्रचंड मोठा झाला,ते वाचल्याचे स्मरले.असो.धन्यवाद.