OPINIONMAKER

Sunday, March 9, 2008

जातींचे प्रकटीकरण

नुकताच मुंबईत एका चर्चासत्राला उपस्थित राहण्याचा योग आला. चर्चेचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील एका प्रख्यात विद्यापीठातील एका विभागाच्या प्रमुखांकडे होती. अर्थातच ते उच्चविद्याविभूषित आहेत. त्यांनी डॉक्‍टरेट मिळवलेली आहे. त्यांच्या पेहरावावरुन ते आर्थिकदृष्ट्या चांगलेच सुस्थितीत असल्याचे दिसत होते. महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक विषयासंदर्भात प्रसिद्धीमाध्यमातील प्रतिनिधींची जाण असा चर्चेचा विषय होता. चर्चेला प्रारंभ करतानाच त्यांनी पुण्यात झालेल्या चित्पावान ब्राह्मणांच्या संमेलनाचा उल्लेख करुन या घटनेचे विश्‍लेषण करताना....... 


किंवा त्यावर टीकाटिप्पणी करताना पत्रकार किती चुकीच्या पद्धतीने करतात, असा सूर लावला. चित्पावनांच्या आर्थिक स्थितीचा कुणी अभ्यास केला आहे, काही सर्वेक्षण झाले आहे का, असा त्यांचा प्रश्‍न होता. पुढे जाऊन त्यांनी अशी विचारणा केली की, मग चित्पावनांची प्रगती झाली आहे, असे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणता? हे सर्व जाणून घेण्याचा अधिकार मला असला पाहिजे आणि त्यासाठी माध्यमांनाही माहिती अधिकाराच्या कक्षेत आणले पाहिजे, असे ते सांगत होते. एक-दोघे अमेरिकेत गेले म्हणजे सगळ्या जातीची प्रगती झाली, असे कसे म्हणता येईल, असा त्यांचा सवाल होता. सुमारे वीस मिनिटे ते ह्या विषयावार अधिकारवाणीने बोलत होते. चर्चासत्रात सहभागी झालेल्यांना चर्चेचा विषय आणि त्या सद्‌गृहस्थांचे बोलणे याचा ताळमेळ लागत नव्हता. शेवटी विदर्भातून आलेला एक तरुण पत्रकार ( तो चित्पावन नव्हता, पण ब्राह्मण होता) हस्तक्षेप करुन म्हणाला, "" अहो सर्वसाधारणपणे चित्पावनांनी....'' पुढचे काही ऐकून न घेताच आपले सद्‌गृहस्थ म्हणू लागले, ""बघा तुम्ही सर्वसाधारणपणे म्हणता. म्हणजेच तुमचा अभ्यास नाही, संशोधन नाही. प्रसारमाध्यमांचा हाच मोठा दोष आहे, असे सांगत आणखी पंधरा मिनिटे ते तावातावाने बोलत राहिले. आपला विदर्भातील मित्र म्हणाला, अहो दोन चित्पवान अमेरिकेतील संसदेतही पोचले आहेत. त्यांना जणू चिथावणीच मिळाली. दोन गेले म्हणजे सगळ्यांची प्रगती झाली का..... असे बरेच काही ते बोलत होते।

शेवटी असह्य झाल्यामुळे मी त्यांना मधेच थांबवत म्हणालो, ""अहो काही थोड्याच लोकांची प्रगती झाली आणि समाजाती अगदी नव्वद टक्के कुटुंबियांना अद्याप प्रगतीच्या वाटेवरही येता आलेले नाही ही स्थिती केवळ चित्पावनांमध्ये नाही. पोटजातीपेक्षा अगदी केवळ ब्राह्मण जातीचा विचार केला तरी पुण्या-मुंबईच्या पलीकडे मराठवाड्यात थोडेसे डोकावले तर स्थिती आणखी गंभीर असल्याचे लक्षात येते. हे केवळ ब्राह्मण जातीबद्दलच घडते आहे असे नव्हे तर, समाजात सर्वत्र अशीच स्थिती आहे.खरे तर चर्चेचा विषय वेगळा होता. हाती आलेल्या व्यासपीठाचा उपयोग त्या सद्‌गृहस्थांनी आपली वेदना मांडण्यासाठी केला पुढे मग ती चर्चा जातींभोवतीच अधिक होत राहिली.एकविसाव्या शतकात आणि 2008 मध्ये हे घडते आहे. जातींबाबत आपण संवेदनशील होतोच, आता या ना त्या निमित्ताने त्याचे मोठ्या प्रमाणावर प्रगटीकरण होऊ लागले आहे. त्यामुळेच थोडीशी संधी मिळाली, खपली निघाली की ती संवेदना \ वेदना भळभळा वाहू लागते.जाती विसरायच्या म्हटले तरी त्या विसरल्या जात नाहीत. अगदी मुंबईसारख्या शहरात आणि प्रसारमाध्यमांमध्ये काम केलेल्यांचाही जातीच्या अस्मिता टोकदार आहेत. नव्हे प्रसिद्धीमाध्यमात काम करणाऱ्यांच्या जातीच्या अस्मिता आणखीनच टोकदार आहेत, असे अनुभवास येते.ज्ञान आणि अध्यनाच्या किल्ल्या ज्यांच्यासाठी पिढ्यानपिढ्या राखीव होत्या त्या ब्राह्मण समाजात किती अस्वस्थता आहे याचा प्रत्यय त्या सद्‌गृहस्थांच्या बोलण्यातून येत होता. दुसरीकडे या देशात मोठ्या संख्येने असलेल्या दलित, आदिवासी, मागासवर्गीयांच्या अनेक घरांमध्ये प्रगती आणि संपन्नता राहू द्या, अन्न, आरोग्य आणि शिक्षणाच्या प्राथमिक सुविधाही अद्याप पोचल्या नसतील तर त्यांच्या मनात काय चालले असेल? पुढारलेल्या जातींनाच आपली प्रगती झाली आहे, असे वाटत नाही आणि तरीही आपण महासत्ता बनणारच आहोत...

-सुहास यादव

No comments: